गणित व विज्ञान हे विषय अनेेक विद्यार्थ्यांना खूपच अवघड वाटतात. पूर्वीच्या काळी शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटायची. पण आता इंग्रजी शाळांचे वारेमाप पीक आल्यापासून नव्या पिढीतील मुलांची इंग्रजीची भीती दूर पळाली. आता ते गुड मॉर्निंगपासून ते गूड इव्हिनिंगपर्यंत सारेच अस्सखलित बोलू लागलेत. इतकेच काय तर इंग्रजीच्या या भडीमारामुळे काही मुलांना मराठी शब्दही आठवत नाहीत, ही आपल्या मराठी राज्यातील अभिजात मराठीची शोकांतिका अाहे. पण ते जाऊ द्या.. इंग्रजीची भीती दूर पळाली असली तरी अजूनही गणित विषय म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण घाबरु नका… केवळ तुम्हीच नव्हे तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही लहानपणा गणितात कच्चे होते. पण त्यामुळे त्यांची प्रगती काही थांबली नाही. अर्थशास्त्र विषयात अभ्यास करुन त्यांनी या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. राजकारणाच्या अनुभवातून इतरांचे राजकीय गणिते बसवण्यातही तरबेज झालेल देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. स्वत: फडणवीस यांनीच एका जाहीर कार्यक्रमातून आपला हा इतिहास सांगितलाय.. खोटं वाटतंय तुम्हाला.. चला जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून..
फडणवीसांकडून शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा…

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते अलिकडेच नागपुरात जगदगुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांनी लिहिलेल्या गणिताच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘वैदिक मॅथेमॅटिक्स बेसिक टु ॲडवान्स लेवल 1, 2 अँड 3 आणि वैदिक गणित सूत्र अरिथमॅटिक’ असे या पुस्तकाचे नाव आहे. अलिकडेच बेसिक मॅथ, वैदिक मॅथ वगैरे यासारखे अनेक पर्याय गणितातही शिकण्यासाठी मुलांना उपलब्ध झाले आहेत. पूर्वीच्या काळी फक्त गणित किंवा बीजगणित एवढेच मर्यादित पर्याय होते, त्यातच अनेकांची विकेट पडायची. तर या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘शाळेत असताना मला गणिताची भीती वाटायची. गणिताच्या भीतीपोटी मी अकरावीत इकॉनॉमिक्स घेतलं. मात्र त्यावेळी वैदिक गणित कळले असते तर कदाचित मला गणिताची भीती वाटली नसती.
देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन…

“खगोलीय तथ्यांना आमच्या पूर्वजांनी गणिताद्वारे शोधले. अत्यंत उच्च दर्जाचे गणित असल्याने हे होऊ शकले. आमच्या संस्कृतीत सर्व शास्त्रांचा पाया गणित आहे. इंग्रजांच्या नव्या शिक्षण पद्धतीने अल्जेब्रा आला. ते शिकलो. सनातन संस्कृतीने जगाच्या कल्याणासाठी अखंडित ज्ञान दिले. जग अल्गोरिथमकडे जात आहे. सूक्ष्म ज्ञानाकडे जात आहे. आमचे ज्ञान अल्गोरिथम पेक्षा वेगळे नाही”, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आता वैदिक गणित हा विषय गेला पाहिजे. त्यासाठी वैदिक गणितासाठी केंद्र सुरू करा, महाराष्ट्र सरकार मदत करेल. सेंटर ऑफ एक्सेलन्स सुरू करू. राज्य आणि केंद्रीय शाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान कसे पोहोचेल ते करण्याचा मी प्रयत्न करेन”, असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मोहन भागवतांची प्रांजळ कबुली…

आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच जाहीरपणे आपण गणितात कच्चे असल्याचे मान्य केल्यानंतर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही धाडस करुन आपणही लहानपणी गणितात कच्चे असल्याची कबुली याच कार्यक्रमात दिली. भागवत म्हणाले मीही गणिताच्या भीतीने दहावीत गणित सोडले होते. परंतु गणित आपला पिच्छा काही सोडत नाही हे पुढे जेव्हा लक्षात आले, अशी प्रांजळ कबुली दिली. कारण गणिताचा संबंध सृष्टीच्या उत्पतीशी आहे. तेव्हापासून गणित सुरू आहे. गणित हे केवळ आकड्यांचे शास्त्र नाही. तसे मानून चाललो तर गणिताचा दुरूपयोगही होतो. भारतीय गणिताचा विचार विश्व कल्याणाच्या दृष्टीने झाला आहे. भारतीय शास्त्रांनुसार सर्व सामान्यांचे आचरण असते. नवीन विज्ञानात भौतिक सृष्टीचा विचार आहे.
अन् तरीही दोघांची दिग्गज म्हणूनच गणना…

परंतु आध्यात्मिक विचार नाही. अध्यात्म आधारित जीवन पद्धती हवी. साधन संपन्नता वाढत आहे. पण, संतोष व समाधान कमी होत आहे. आध्यात्मिक दृष्टीच्या आधारावर ज्ञानाची पुनर्रचना करायला हवी, अशी अपेक्षाही भागवत यांनी व्यक्त केली. या दोन मान्यवरांनी आपले गणित कच्चे असल्याची कबुली दिली. मात्र असे असतानाही आपापल्या क्षेत्रात दिग्गज म्हणून या दोघांची गणना होते. त्यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनीही गणिताविषयी फार धास्ती बाळगू नये किंवा आपल्याला दहावीत गणितात कमी मार्क होते असा न्यूनगंड मनात असेल तर तो काढून टाकावा. आयुष्याचे गणित सोडवण्याची कला मात्र प्रत्येकाच्याच अंगात असते, हेच अंतिम सत्य.