सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला अभय दिल्याचा आरोप असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर ४ मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याचे फोटो समोर आल्यामुळे मन व्यथित झाल्याने सद्सद्विवेकबुद्धीला स्मरुन आपण राजीनामा देत असल्याचे कारण मुंडे यांनी पुढे केले. त्याला आजारपणाचीही जोड दिली. पण देशमुखांची हत्या ९ डिसेंबर रोजी झाली तेव्हाही त्यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आले होते तेव्हा मुंडेंची नैतिकता कुठे गेली होती? हा प्रश्न आता विचारला जात आहे. काय आहे यामागचे राजकारण.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
मुंडेंचा राजीनामा अन् अजित दादांची हतबलता

गेले तीन महिने राज्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन रान पेटले होते. मात्र मुंडे यांनी राजीनाम्यास स्पष्ट नकार दिला होता. एखाद्या निर्ढावलेल्या राजकारण्याप्रमाणे त्यांचे वागणे संपूर्ण महाराष्ट्र बघत होता. त्याबद्दल जनतेच्या मनात चीड तर होतीच. पण दुसरीकडे पारदर्शी कारभाराचे वारंवार दावे करणारे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मात्र मित्रपक्षाच्या दबावामुळे मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नव्हते, त्यांची ही हतबलता जास्त चीड आणणारी होती. मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील, म्हणून फडणवीस जी टोलवाटोलवी करत होती ते कदापिही जनता मान्य करत नव्हती. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ३ महिने धनंजय मुंडेंची पाठराखणच केली. इतके गंभीर आरोप झालेले असतानाही आपल्या पक्षातील कनिष्ठ सहकाऱ्याचा राजीनामा अजित पवार घेऊ शकले नाहीत, ही त्यांचीही हतबलता म्हणावी लागेल.

कायमच आरोपांचे वार झेलण्याची सवय झाल्याने कदाचित संवेदनशीलता हरपलेल्या अजित पवारांना मुंडेंवरील आरोपात तितकेचे गांभीर्य वाटले नसेल. पण मुंडेंच्या पाठिंब्याने वाल्मीक कराड बीड जिल्हयात जी दहशत माजवत होता, त्याची कल्पना त्यांना बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यावर आली असावी. संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे वास्तव सरकारचे प्रतिनिधी म्हणून पोलिस व जनतेच्या आधी अजित पवार व फडणवीस यांना माहिती झाले असेलच. तरीही या क्रूरकर्म्यांना अभय देणाऱ्या धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवण्याची… नव्हे मंत्रिमंडळात सहभागी करुन घेण्याचीच चूक फडणवीस व अजित पवारांनी केली आहे त्याला जनता माफ करणार नाही.
मुंडेंचा राजीनामा नैतिकतेमुळेच..?

अखेर कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर व त्यात नंबर वनचा आरोपी म्हणून वाल्मीक कराडचे नाव आल्यानंतर मात्र आता आपली यातून सुटका नाही, याची खात्री धनंजय मुंडेंना पटली असावी. म्हणूनच विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ४ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पीएमार्फत राजीनामापत्र पाठवले. राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे’, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्यांच्या या मेसेजवरुन धनंजय मुंडेंची नैतिकता तीन महिन्यानंतर कशी जागी झाली? हा प्रश्न उपस्थित होत अाहे.
तर लागला नसता ‘आकाचा आका’ असा ठपका…

६ मार्च रोजी बीड जिल्ह्यात आवाद कंपनीच्या व्यवस्थापकाला २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. या खंडणीखोर टोळीचा म्होरक्या वाल्मीक कराड होता, जो मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बसून त्यांचा सर्व कारभार पाहात होता, हे समोर आल्यानंतर तेव्हाच धनंजय मुंडे यांची नैतिकता कशी जागी झाली नाही? ९ मार्च रोजी सरपंच संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. खंडणीखोरांना विरोध केल्यामुळे ही हत्या झाली होती, हेही तेव्हाच उघड झाले होते. यानंतर पोस्टमार्टेममध्ये देशमुख यांच्या पाठीचे अक्षरश: सालपटं निघालेले फोटो समोर आले होते, इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचे व्हिडिओ शूटिंग करुन आरोपींनी वाल्मीक कराडला फोनवरुन दाखवले होते, हेही तेव्हाच समोर आले होते. याबाबत धनंजय मुंडे अनभिज्ञ असतील असे एखादा अडाणी माणूसही सांगू शकणार नाही. मग तेव्हा मुंडे यांनी नैतिकता कुठे गेली होती? आपल्या जवळचा माणूस, आपल्या मंत्रिपदाचा कारभार बीड जिल्ह्यात हाकणारा माणूस जर या हत्येमागे असल्याचे आरोप झाले तेव्हाच धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा का दिला नाही? तेव्हाच त्यांनी ही नैतिकता दाखवली असती तर ‘आकाचा आका’ हा ठपका त्यांच्यामागे लागला नसता. खंडणीखोर वाल्मीक कराडला फरार होण्यात मदत केल्याचा कलंकही त्यांच्या माथी लागला नसता. पण तेव्हा मात्र मुंडे यांची नैतिकता बहुदा झोपी गेली असावी?
अनेक नेते देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी…

या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मात्र जीवावर उदार होऊन जो पाठपुरावा केला, त्याला यश आले असेच म्हणावे लागेल. देशमुख कुटुंबीयांच्या लढ्याला आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बळ दिले. बीड जिल्ह्यातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे धनंजय मुंडेंना झुकावे लागले. पण जर अारोप झाले तेव्हाच मुंडे यांना नैतिकता आठवली असती तर कदाचित हा मुद्दा राज्यस्तरीय आंदोलनाचा विषय बनला नसता, जाती- जातीत तेढ निर्माण होण्याचे प्रसंग या मुद्द्यावरुन निर्माण झाले नसते. पण आता केवळ धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याने हा विषय संपणारा नाही. तर देशमुख खून प्रकरणात व खंडणीप्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी पुढे येत आहे. आता धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांची पाठराखण करायला सरकारला तितके तत्परतेने पुढे येईल असे वाटत नाही. आवादा कंपनीला २ कोटी रुपये खंडणीची मागणी करणारे फोन धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावरुन गेले होते, या आरोपाचा आमदार सुरेश धस वारंवार पुनरुच्चार करत आहेत. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. धनंजय मंुडे कृषी मंत्री असताना बोगस पीकविमा घोटाळ्यात ५०० कोटींचा आरोप झाल्याचा धस यांचा आरोप आहे. कृषी साहित्य खरेदीत मुंडेंनी मोठा घोटाळा केल्याचे अंजली दमानिया यांनी पुराव्यानिशी समोर आणले आहे, त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
आमदारकी रद्द होईपर्यंत लढण्याचा इशारा…

अशा एक ना अनेक प्रकरणात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जात आहे. त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचा इशारा दमानिया यांनी दिला आहे. त्यात त्या कितपत यशस्वी होतात? फडणवीस सरकार इतर घोटाळ्यांचीही चौकशी लावते का? की मुंडेंना पाठशी घालते? हे भविष्यात दिसून येईलच. एकूणच देशमुख प्रकरणामुळे मुंडे यांच्या राजकीय कारर्किदीला मात्र उतरती कळा लागली आहे हे मात्र तितकेच खरे. जाता जाता… धनंजय मुंडे यांच्या बहिण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ या. संताेष देशमुख यांची ज्या क्रुरतेने हत्या करण्यात आली त्याबद्दल खेद व्यक्त करताना पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची माफी मागितली अाहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास उशिर केला, किंबहुना मुख्यमंत्र्यांनी- उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता, असेही त्यांनी सुचवले. इतकेच नव्हे तर धनंजय यांनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती, म्हणजे हे प्रकरण इतके वाढले नसते असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. पण हेही तीन महिन्यानंतर… जोपर्यंत धनंजय यांच्यावर आरोप होत होते तेापर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या. त्यावर काहीही भाष्य करत नव्हत्या. ज्या देशमुख कुटुंबीयांची त्या आज इतकी माफी मागत आहेत, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत त्या कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन करण्याची गरजही त्यांना वाटली नाही. आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मात्र ‘देर आए दुरुस्त आए’ असे बोलून पंकजा मुंडे आपल्याविषयी जिल्ह्यात असलेला रोष कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसून आल्या.