दिशाच्या मृत्यूचे भूत पुन्हा ठाकरेंच्या मानेवर

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. खरं तर हे प्रकरण पाच वर्षांपूर्वीचे. त्यावेळी दिशाचा मृत्यू झाला नसून तिचा खून करण्यात आला, तिच्यावर अत्याचार झाले होते, असे आरोपही करण्यात आले. मात्र त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळून आले नाही. या प्रकरणात तेव्हा काही राजकीय नेते व बाॅलीवूड सेलिब्रिटिजची नावे घेतली जात होती, पण तपासात कुणाचाही सहभाग स्पष्ट झाला नाही. आता पुन्हा ५ वर्षांनी या प्रकरणाचे भूत बाहेर आले आहे. दिशाच्या वडिलांनीच आता हायकोर्टात याचिका दाखल करुन थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. पाच वर्षे या प्रकरणात शांत असलेल्या दिशाच्या वडिलांना इतक्या उशिरा का जाग का आली, आदित्य ठाकरे यांचे नाव यात घेण्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव टाकलाय का ? की खरंच आदित्य यांचे या प्रकरणाशी काही संबंध आहे? याबाबत जाणून घेऊ या मिशन पाॅलिटिक्समधून…

सुशांतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय दिशा…

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सालियन कार्यरत होती. ८ जून २०२० च्या रात्री मुंबईत मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केल्यानंतर दिशाच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. दिशा सालियनच्या महाविद्यालयीन मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्या रात्रीचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनच्या घरात मित्र आणि तिचा प्रियकर पार्टी करत होते. त्या रात्री पार्टीत दिशाने मद्य प्राशन केले होते. ती करिअरबाबत थोडीसी निराश होती, असे तिच्या मित्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर ती अचानक आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने आतून दरवाजा बंद केला. थोड्यावेळाने मित्रांनी दरवाजा ठोठावला तरी काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे मित्रांनी आणि तिच्या प्रियकराने दरवाजा तोडला. तेव्हा दिशा बाल्कनीतून खाली पडल्याचे त्यांना दिसले. मित्रांनी तातडीने इमारतीच्या खाली धाव घेतली आणि दिशाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

भाजपा नेते नारायण राणेंचा खळबळजणक दावा…

पार्टीला उपस्थित असलेल्या एका मित्राने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला होता. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली, तेव्हा या घटनाक्रमात तथ्य असल्याचे सांगितले गेले. दिशाच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी सुशातसिंह राजपूतनेही आत्महत्या केली. काही जणांकडून दोघांच्याही मृत्यूचा संबंध जोडून वाद उपस्थित केला गेला गेला. यात तत्कालिन मंत्री आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्नही झाला. भाजपा नेते नारायण राणे यांचा असा दावा होता की, दिशावर बलात्कार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला. दिशाने तिच्यावर झालेला अत्याचार सुशांत राजपूतला सांगितला होता. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतलाही धमक्या दिल्या जात होत्या. त्यातच १४ जूनला सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाल्याचे सांगून दोन्ही घटनांचा संबंध जोडला गेला. राणेंचा आरोप व प्रत्यक्ष घटनाक्रम याची पोलिसांनी कसून चौकशी केली. पण या आरोपात काहीही तथ्य दिसून आले नाही. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व आदित्य ठाकरे विरोधी पक्षात गेले. यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एसआयटीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही.

पुन्हा एकदा दिशाच्या वडिलांची हायकोर्टात धाव…

मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर म्हटले की, दिशा राहत असलेल्या इमारतीची सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. यात कोणतीही वेगळी बाब नजरेस आलेली नाही. ज्यादिवशी मृत्यू झाला त्यावेळी दिशा केवळ एकदाच इमारतीबाहेर आलेली दिसत आहे. तेही तिचे पार्सल घेण्यासाठी ती खाली आली होती. तसेच ती गर्भवती असल्याचाही मुद्दा उत्तरीय तपासणीनंतर फेटाळून लावण्यात आला होता. त्यावेळी दिशाच्या वडिलांनीही तिच्यावर अत्याचार झाल्याचे मान्य केले नव्हते. मात्र आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आता आदित्य ठाकरे यांच्यासह काही बॉलीवूड सेलिब्रिटिजची नावे घेऊन त्यांचा यात सहभाग आहे का? याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाच वर्षांनी का होईना पण दिशाला न्याय मिळवून देण्यासाठी पाऊले उचलली जात अाहेत हे स्वागतार्हच आहेत. पण या प्रकरणाच्या माध्यमातून भाजप व शिंदेसेनेचे काही नेते आपले ठाकरेंविषयीचे हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे भाजपचे मंत्री नितीश राणे यांच्या हाती पुन्हा एकदा कोलित सापडले आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करत त्यांचे ८ जून रोजीचे कॉल रेकॉर्डिंग, मोबाईल लोकेशन तपासण्याची मागणी केली आहे.

राणेंचे बेछूट आरोप अजूनही सुरुच…

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या एसआयटीने राणे हे आरोप करत असलेले पुरावे दाखल करण्यासाठी नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा मात्र राणे तिथे गेले नाहीत. त्यावरुन राणे यांचे आरोप हे बिनबुडाचे व कुठल्याही पुराव्यानिशी केले जात असल्याचे उघडकीस आले हाेते. पण अजूनही राणेंचे बेछूट आरोप सुरुच अाहेत. या प्रकरणात अजूनही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 5 ऑगस्ट 2021 रोजी दिशाचे वडील सतिश सालियन यांनी मुंबई पोलिसांना पत्र यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात की, “माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे. या बातम्या पूर्णत: चुकीच्या आणि फेक आहेत. यात काहीच तथ्य नाही. चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत. दिशाचा राजकीय नेत्याशी संबंध आणि बॉलिवुडमधील मोठ्या अॅक्टरसोबत पार्टीच्या बातम्या पूर्णत: बनावट आहेत,’ असे त्यांनी म्हटले होते, मग आता पाच वर्षांनी सतिश यांनी पुन्हा हायकोर्टात जाऊन या प्रकरणाच्या चौकशी करण्यामागे काय कारण असावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे २०२१ मध्ये आपल्या मुलीचे कुठल्याही राजकीय नेत्याशी संबंध नसल्याचे सांगणारे सतीश आता थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन याचिका कशी काय दाखल करत आहेत? त्यांना यामागे कुणाची फूस आहे का? हा प्रश्न आहेच.

शिंदेसेनेच्या आमदाराकडून शंका व्यक्त…

अजून एक महत्त्वाचे म्हणजे, भाजप व शिंदेसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर बेछूट आरोप करत आहेत. पण २०२२ पासून राज्यात याच शिंदेसेना व भाजपचे सरकार आहे. मग ते या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यात आदित्य ठाकरेंचा सहभाग का स्पष्ट करु शकले नाहीत, अशी शंका शिंदेसेनेच्याच एका आमदाराने व्यक्त केली आहे. या प्रश्नाचे सत्ताधाऱ्यांकडे, विशेषत: राणेंकडे काय उत्तर आहे? असाही प्रश्न आहेच. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, हे खरंच आहे. पण त्यासाठी कोर्ट आहेत, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी नक्कीच ते तपास यंत्रणांसमोर सादर करावे. पण सध्या तरी या मुद्द्याचे केवळ राजकारण केले जात असल्याचे दिसून येते. ठाकरेंविरोधातील आपला राग व्यक्त करण्यासाठी राणे कुटुंबीय व शिंदेसेनेचे नेते असे बेछूट आरोप करत असल्याची शंका उद्धव सेनेकडून व्यक्त केली जात अाहे, त्यात तथ्य असल्याचे जाणवते.