उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अलिकडेच दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, असे भाकित वर्तवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजकारणात जे जे अनपेक्षित होते ते सर्व झालेले गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय नवीन घडामोडी घडतील, याविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसले तरी त्याकडे अगदीच दुर्लक्ष करुनही चालणार नाही. शिरसाट यांच्यासारख्या अनेक शिवसैनिकांना दुभंगलेली शिवसेना पुन्हा एक व्हावी, असे मनापासून वाटते. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे देान भाऊ एकत्र यावेत असेही त्यांना वाटते. पण ठाकरे बंधूंमध्ये जो इगो ठासून भरलेला आहे, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून जे बंड केले आहे ते पाहता ना दोन्ही शिवसेना एकत्र येतील ना दोन्ही ठाकरे बंधू. एक वेळ अजित पवार व शरद पवार एकत्र येऊ शकतील. कारण हे दोन्ही नेते प्रॅक्टीकली विचार करणारे व सत्ता हेच अंतिम ध्येय मानणारे आहेत. मात्र अगदी भावकीच्या वादाप्रमाणे राजकारणाकडे पाहणारे उद्धव ठाकरे मात्र कदापिही एकनाथ शिंदेंसह शिवसेनेला पुन्हा आपलेसे करतील असे वाटत नाही. तरीही मग तरीही अशा का झडतात.. खरंच ही सामान्य शिवसैनिकांची भावना आहे की काही उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जाणीवपूर्वक अशा चर्चा घडवून आणल्या जातात, याबद्दल जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून
भाजप शिंदेंना पूर्वीसारखे महत्त्व देत आहे का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळालेल्या भाजपने आता शत- प्रतिशत मोहिम सुरु केलीय. त्याचा मित्रपक्ष शिंदेसेनेलाही धसका वाटू लागलाय. उद्धव ठाकरेंशी बंड करताना भाजपने एकनाथ शिंदे यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीची सत्ता पाय उतार करण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्रीही केले. गेली अडीच वर्षे शिंदे म्हणतील ती पूर्वदिशा भाजपने मानली. त्यांच्या इशाऱ्यावर नाचलेही. मात्र आता भाजपची इच्छापूर्ती झालीय. राज्यात अचानक उदयाला आलेली महाविकास आघाडी विधानसभेत केवळ औषधापुरतीच उरलीय. याउलट शिंदेसेनेच्या नेतृत्वात महायुती सरकारने जी कामे केली त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झालाय. त्यांचे १३२ आमदार निवडून आलेत. अर्थात ते अपेक्षितच होते. सरकार जरी शिंदेंचे असले तरी ते स्थापन करण्यापासून ते चालवण्यापर्यंत सर्व कामे भाजपच्या नेतृत्वानेच केली होती, त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील यशाचे सर्व श्रेयही भाजपलाच जाते. पण आपल्यामुळेच हे यश मिळाल्याच्या गोड गैरसमजात शिंदेसेना अजूनही आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भाजपने जे खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय ते शिंदेसेनेच्या अजूनही पचनी पडत नाहीत. म्हणूनच अधूनमधून गृहखाते असो की रायगडचे पालकमंत्रिपद… अशा कारणावरुन ते आपल्याच सरकारशी भांडताना दिसतात. आता भाजपही शिंदेंना पूर्वीसारखे महत्त्व देताना दिसत नाही.
संजय शिरसाटांचे मत जाणीवपूर्वक?

पूर्वी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस शिंदेंशी चर्चा करायला ‘वर्षा’वर जायचे. त्यांचे मत विचारात घेतले जायचे. आता मात्र शिंदे रुसून दरे या गावी गेले तरी त्यांची समजूत घालायला तिकडे कुणी जात नाही, यावरुनच आता महायुती सरकारमध्ये आपले काय स्थान राहिले आहे याची जाणीव शिंदे व त्यांच्या शिवसैनिकांना झाली असावी. याच नैराश्यातून किंवा भाजपला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी अलिकडेच दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, असे मत व्यक्त केले असावे. या चर्चेची सुरुवात होण्याचे कारणही भाजपच ठरले आहे.भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. तिथे मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये एक मिश्कील संवाद झाला. नार्वेकर यांनी चंद्रकांतदादांना ‘काय मग कधी होतेय युती?’ असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर हजरजवाबी पाटील यांनीही ‘मी ही त्याच सुवर्णक्षणाची वाट पाहतोय’ असे मिश्कील उत्तर दिले. ही कुजबूज एेकून उद्धव ठाकरेंनी चंद्रकांतदादांना काय म्हणताय अशी विचारणा केली असता दादांनी पुन्हा ‘सुवर्णक्षणाची वाट पाहतोय’ असे उत्तर दिले. झालं… सूतावरुन स्वर्ग गाठणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना चघळायला एक विषय मिळाला.
संजय राऊतांची खदखद व्यक्त…

आता उद्धव सेना व भाजप पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा पसरवायला टीव्ही चॅनल्सनी सुरुवात केली. मग कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यास सज्ज असलेले खासदार संजय राऊत तरी यात मागे कशी राहतील. ‘चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. त्यांची जी भावना आहे तशीच भाजपमधील अनेकांची आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्याचं कारणही भाजपमधील काही लोकच होते. आमची मूळ शिवसेना सोडून तयार झालेल्या नवीन ‘डुप्लिकेट शिवसेनेला’ भाजपने पूर्ण पाठिंबा दिला आहे. आमचा जो अधिकार होता तो एकनाथ शिंदे यांना देण्यात आला’ अशी आपल्या मनातील खदखद राऊतांनी बोलून दाखवली. आता यावर कडी मंत्री संजय शिरसाट यांनी केली. ते म्हणाले, ‘शिवसेना फुटल्याचं आम्हालाही दु:ख झालं. ठाकरे व शिंदे यांनी एकत्र यावे असे आम्हाला वाटते. तसे झाले तर आम्हाला आनंदच होईल. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय ठाकरे व शिंदे यानंा घ्यायचा आहे, मी त्यांना सल्ला देणारा कोण?’ हे सांगण्यासही शिरसाट विसरले नाहीत.
ठाकरेंचा जास्त राग शिंदे नव्हे तर भाजपवर?

संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय. म्हणूनत शिरसाट जे बोलतात ती शिंदेंची भूमिका असते असे मीडियावाले समजतात. प्रत्यक्षात तसे काहीही नसते. शिंदेंच्या मनात काय चालले आहे ते कुणालाही फारसे कळत नाही. आणि शिवसेना फोडल्यामुळे ठाकरेंच्या मनात शिंदे यांच्याविषयी इतका द्वेष निर्माण झालेला आहे की ते कोणत्याही परिस्थितीत पुन्हा शिंदेंना स्वीकारतील, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. ठाकरेंना शिंदेंपेक्षाही जास्त राग भाजपवर आहे. विशेषत: भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मेहनतीने उभारलेला पक्ष भाजपने फोडला, आमचे चिन्हही चोरले, ही सल ठाकरेंच्या मनात आहे. त्यामुळेच तर प्रत्येक सभेत उद्धव ठाकरे मोदी- शाह यांचा समाचार घेत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या मनात राग तसा कमी असतो, पण शाह व मोदींचा समाचार घेताना त्यांच्या वक्तव्याची धार जी वाढते, ते पाहता पुन्हा भाजप व उद्धव सेना एकत्र येतील याविषयीही शंका वाटतेय.
ठाकरेंच्या राजकारणाचे पुढे काय होणार?

आता भाजपलाही उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची गरज वाटत नाही. त्यांनी उद्धव सेनेचे इतके मोठे नुकसान केले आहे की अाता भाजपशी थेट दोन हात करण्याची उद्धव सेनेत हिमत राहिलेली नाही. महाविकास आघाडीची ताकद म्हणून एकवेळ आघाडी भाजपशी लढू शकेल, पण या आघाडीतील एकही घटक पक्ष आता एकटा बलाढ्य भाजपशी लढू शकेल इतक्या ताकदीचा राहिलेला नाही. म्हणून भाजप- उद्धव सेना एकत्र येणार, शिंदे व ठाकरे एकत्र येणार या चर्चांना काहीही अर्थ नाही. पुढील पाच वर्षे तरी बलाढ्य भाजप सांगेल तीच पूर्वदिशा म्हणून शिंदेसेनेला त्यांच्या मागे फरफटत जावे लागेल.

उद्धव सेनेलाही विरोधी बाकावर ज्या बोटावर मोजण्याइतक्या जागा मिळाल्या अाहेत त्या सांभाळून ठेवण्याचे आव्हान पेलावे लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या जशा वर्षानुवर्षे चर्चा होत्या, ज्या फक्त चर्चाच राहिल्या तशा पुढील ५ वर्षे तरी शिंदे सेना व ठाकरे सेना एकत्र येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. एकवेळ शरद पवार व अजित पवार राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणतील. कारण हे दोन्ही नेते प्रॅक्टीकल आहेत. भावकीच्या वादाप्रमाणे ते राजकारणाकडे पाहात नाहीत. जिथे सत्तेचा लाभ मिळेल तिकडे जाणारे नेते म्हणून त्यांचा इतिहास आहे. म्हणूनच एकवेळ दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील पण दोन्ही शिवसेना मात्र एकत्र येण्याची सूतराम शक्यता दिसत नाही.