अडीच वर्षांपूर्वी शिवसेेनेत बंड करुन मुख्यमंत्रिपद पटकावणारे एकनाथ शिंदे अल्पावधीत राज्यातील एक बलाढ्य नेते म्हणून समोर आले आहेत. महायुतीसाठी लोकसभेत प्रतिकूल परिस्थिती असताना व सर्वशक्तीमान भाजपही महाराष्ट्रात पराभूत झालेला असताना याही अडचणीच्या काळात शिंदे यांनी आपल्या पक्षाची आब राखली. मुख्यमंत्री म्हणून जनतेत फिरताना त्यांनी जनसामान्यांचा नेता अशी एक प्रतिमाही तयार केलीय. याच जोरावर ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहात आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याएवढेच दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनाही शिंदे दैवत मानतात. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणूक याच दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी- पाचपाखडी मतदारसंघातून उभे केले आहे. त्यामुळे लढत भावनिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते.
दिघे घराण्याने ठाकरेंशी राखली निष्ठा…
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी एकनाथ शिंदे यांची ओळख होती. २०२२ पर्यंत ठाणे जिल्ह्याच्या बाहेर कधी आपले कार्यक्षेत्र विस्तारावे असे शिंदेंना वाटले नाही. एक सच्चा शिवसैनिक म्हणून ते आयुष्यभर काम करत राहिले. ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या तालमीत शिंदे तयार झालेले. त्यामुळे त्यांच्यावर दिघेंचा प्रभाव होता अन् अजूनही आहेच. ठाण्याचे नगरसेवक, सभागृह नेतेपद, दिघेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशा स्थानिक पातळीवरील अनेक पदांवर काम करत शिंदे यांनी संघटन वाढवले. २००४ मध्ये सर्वप्रथम त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली, तेव्हापासून आतापर्यंत ते सलग निवडून येत आहेत. ठाण्यातील कोपरी- पाचपाखडी हा त्यांचा मतदारसंघ. २०१४ मध्ये फडणवीस यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सर्वप्रथम मंत्री होण्याचा मान शिंदेंना मिळाला. मात्र नंतरच्या साडेसात वर्षातच त्यांनी थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. उद्धव ठाकरेंशी बंड ते भाजपच्या हायकमांडचे अतिशय विश्वासू असा प्रवास त्यांनी अगदी दोन- अडीच वर्षात कष्टाने यशस्वी केला. दरम्यानच्या काळात आपला मुलगा श्रीकांत यांनाही त्यांनी तिसऱ्यांदा खासदार बनवत घराणेशाहीचा वारसा कायम ठेवला. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी स्वत:ला कायदेशीरदृष्ट्याही सिद्ध केले. लोकांमध्ये फिरणारा नेता, लेाकांची कामे झटपट करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. धर्मवीर चित्रपटातून त्यांची प्रमोशनही जोरदार सुरु आहे. याच चित्रपटाचे नायक असलेेले आनंद दिघे यांना शिंदे दैवत मानतात. मात्र शिवसेनेत जेव्हा शिंदेंनी फूट पाडली, तेव्हा याच दिघे घराण्याने मात्र शिंदेंची साथ देण्याएेवजी ठाकरेंशी निष्ठा राखणे पसंत केले.
अन् ठाकरेंनी केदार दिघेंना आणले प्रकाशात…
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे ठाण्यात शिवसेनेच्या राजकारणात होते. पण तितकेसे सक्रिय नव्हते. आनंद दिघे यांनी कधीच घराणेशाहीचे राजकारण केले नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीपेक्षा त्यांना खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसैनिक जास्त जवळचे वाटायचे. म्हणून आनंद दिघे यांनी शिंदेंसारख्या अनेक शिवसैनिकांना मोठे केले. त्यामुळे केदार दिघेंसारखे निकटवर्तीय कधी फारसे प्रकाशझोतात येऊ शकले नाही. मात्र शिंदेंनी पक्षात बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी केदार दिघे यांना प्रकाशात आणले. त्यांच्याकडे ठाण्याचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली. शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अनेक आरेाप केले. त्यात आनंद दिघेंशी संबंधित काही गंभीर आरेापही आहेत. मात्र हे आरोप झूट आहेत हे जनतेला पटवून देण्यासाठी व दिघेंचे वारसदारच आपल्यासोबत असल्याचे सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केदार दिघे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला.
केदार दिघेंचे शिंदेंना आव्हान…
आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी- पाचपाखडी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. दिवगंत शिवसेना नेते आनंद दिघेंचे पुतणे असलेले केदार यांनी २००६ साली शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे व पालघर जिल्ह्यात त्यांनी पक्षाचे काम करायला सुरुवात केली. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे काम जोमाने सुरू अाहे. २०१३ मध्ये युवासेनेच्या निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठाण्यात शिंदेंच्याच नेतृत्वात त्यांचे काम चालायचे. पण २०१७ मध्ये त्यांनी युवा सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून केदार हे पुन्हा राजकारणापासून थोडेस अलिप्त झाले. मात्र २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणून थेट ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. आता हेच केदार दिघे एकनाथ शिंदेंना आव्हान देत आहेत. एकीकडे शिंदेंचा वाढलेला प्रभाव, जनमाणसात असलेली प्रतिमा व दुसरीकडे दिघेंच्या नावाचा वारसदार व उद्धव ठाकरेंचे पाठबळ असलेले केदार दिघे… या लढतीत कोण विजयी होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सद्यस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांचे पारडे जड आहेच, यात काही शंका नाही. पण जर सहानुभूतीच्या लाटेवर जर केदार काही चमत्कार करु शकले तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांचे नाव होईल, यात शंका नाही. पण… ही आशा ठेवणे स्वप्नवतच आहे…