सक्षम उमेदवार मिळत नसल्याने शिवसेना, काँग्रेसची मुंबईत अखेर सेलिब्रिटींनाच पसंती; गोविंदा, स्वरा भास्कर लोकसभेच्या मैदानात

मोदींना सातत्याने विरोध करणारी स्वरा उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार

महायुती व महाविकास आघाडीमुळे आधीच महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा कमी मतदारसंघ येत आहेत. ज्या जागा मिळत आहेत तिथेही एकापेक्षा जास्त इच्छूक असल्याने मित्रपक्षांमधूनच बंडखोरीचे संकट उद‌्भण्याची डोकेदुखी आहे. मात्र काही मतदारसंघात प्रतिस्पर्ध्याला टक्कर देऊ शकेल असा तगडा उमेदवारच तिन्ही राजकीय पक्षांकडे नसल्याने यंदाही सेलिब्रिटींचा आधार घेण्याची वेळ शिवसेना व काँग्रेस या दोन राजकीय पक्षावर आली आहे.

अमोल किर्तीकर मैदानात amol kirtikar loksabha election

उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिवसेेनेकडून निवडून आले असून सध्या शिंदेगटात आहेत. त्यांचे वय झाल्यामुळे यावेळी तिथे उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. वडिलांनी शिवसेनेशी बंडखोरी केली असली तरी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणारे किर्तीकर यांचे पूत्र अमोल यांना उद्धव सेनेने याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यावेळी वडिलांना उमेदवारी मिळणार नसल्याने अमोलनेही आधीपासूनच जय्यत तयारी केली होती. शिंदेसेेनेत असले तरी गजानन किर्तीकरांचे बळही मुलाच्याच पाठीशी उभे राहणार, याविषयी शिंदे गटालाही शंका नाही. त्यामुळे अमोल किर्तीकर यांना फाईट देऊ शकेल, असा तगडा उमेदवार शोधण्याचे आव्हान शिंदेसेेनेसमोर होते. भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचे डावपेच आखले होते, मात्र शिंदेसेनेने त्यांची ही मागणी मान्य केलेली नाही. मात्र अमोल किर्तीकरांना टक्कर देऊ शकेल असा एकही उमेदवार शिंदेसेनेकडे नाही. त्यामुळे त्यांनी बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले आहेत. सध्या प्रसिद्धीपासून काहीसे दूर गेलेले गोविंद आहुजा यांनी २२ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले अाहे.

गोविंदा… काँग्रेसचा माजी खासदार govinda loksabha election

गोविंदा यांच्यामागे तशी फारशी राजकीय पार्श्वभूमीवर नाही. मात्र २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अचानक त्यांचा राजकारणात प्रवेश झाला व तेव्हाच्या लोकप्रियतेच्या लाटेवर काँग्रेसच्या तिकिटावर तो उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आला होता. भाजपचे दिग्गज नेते व ५ वेळा निवडून आलेले खासदार राम नाईक यांचा गोविंदाने ५० हजार मतांनी पराभव केला होता. मात्र ५ वर्षांत त्यांची खासदार म्हणून फारशी समाधानकारक कामगिरी राहिली नाही. राजकारण हे क्षेत्र त्याला फारसे पटलेही नाही, म्हणून हा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गोविंदाने पुन्हा राजकारणाकडे पाठ फिरवली. आता २० वर्षानंतर तो पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. आता त्याने पक्ष व मतदारसंघही बदलला. उत्तर पश्चिम मुंबईतून व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर तो प्रयत्न करत आहे. या आधी भाजपकडून अक्षयकुमार, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांनाही किर्तीकरांविरोधात उभे राहण्यासाठी विचारणा झाली होती, पण या सेलिब्रिटींना त्यास नकार दिला होता.

मोदींना सातत्याने विरोध करणारी स्वरा उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार swara bhaskar loksabha election

रोखठोक वक्तव्यांसाठी चर्चेत असलेली प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिला उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच तिने काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेऊन राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मतदारसंघात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन १० वर्षांपासून येथील खासदार अाहेत. त्यापूर्वी म्हणजे २००४ ते २०१४ या दहा वर्षात काँग्रेसचे अनुक्रमे एकनाथ गायकवाड व प्रिया दत्त यांना येथील जनतेने निवडून दिले होते. यावेळी भाजप पूनम महाजन यांचे तिकिट कापून नवीन चेहरा देण्याच्या तयारीत आहेत. तर काँग्रेसकडून पुन्हा प्रिया दत्त यांच्या नावाची चर्चा होती. मात्र २०१९ मध्ये पराभूत झाल्यापासून प्रिया पक्षात व मतदारसंघात फारशा सक्रिय नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये अभिनेते राज बब्बर यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता प्रसिद्ध अभिनेत्रा स्वरा भास्कर हिच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांनी सांगितले.

न्याय संकल्प यात्रेत सहभागी

सोशल मीडियातील अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे स्वरा नेहमीच चर्चेत असते. विशेषत: सत्ताधारी नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी तिच्या निशाण्यावर असतात. त्यामुळे भाजपप्रेमींकडून ती सतत ट्रोलही होत असते. राहूल गांधी यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या मुंबईतील न्याय संकल्प यात्रेत ती सहभागी झाली होती.२०१९ च्या लो कसभा निवडणुकीत तिने दिल्लीत आम आदमी पक्षाचा, बिहारमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा प्रचार केला होता.

स्वरा दिल्लीची

स्वरा भास्करने फहाद अहमद याच्याशी लग्न केले. १६ फेब्रुवारी रोजी तिने सोशल मीडियावर ही घोषणा केली फहाद समाजवादी पक्षाच्या ‘युवाजन सबा’ या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्याचा रहिवाशी आहे. स्वरा आणि फहादची ओळख २०१९- २०२० दरम्यान सीएएविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने झाली होती. या दोघांचाही आंदोलनात सहभाग होता. स्वरा मुळची दिल्लीची. तिचे वडील सी. उदय भास्कर हे नौदलातील माजी अधिकारी असून, सुरक्षा आणि रणनितीक विषयातील तज्ञ आहेत. तर स्वराची आई ईरा भास्कर या दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सिनेमा विषय शिकवतात.

2008 साली आली मुंबईत

2008 साली स्वरा बॉलीवूडमध्ये नशिब आजमावण्यासाठी मुंबईत पोहोचली. 2009 साली ‘मधोला किप वॉकिंग’ नावाच्या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी संजय लीला भन्साळींच्या ‘गुजारिश’मध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं. पुढे तनू वेड्स मनू, रांझना, वीरे दी वेडिंग, प्रेम रतन धन पायो… यांसारख्या सिनेमांमधील स्वरा भास्करच्या भूमिका चाहत्यांच्या लक्षात राहिल्या.

https://missionpolitics.com/maharashtra-politics-now-mns-also-in-nda/

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics