भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या एक आक्रमक व अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत. भाजपने प्रत्येक निवडणुकीपूर्वी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांचा उपयोग करुन घेतला आहे. पूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेत्यांच्या काळ्या पैशावर, बेनामी संपत्तीवर पुराव्यानिशी हल्लाबोल करुन सोमय्यांनी अनेकांच्या मागे ईडी लावली. काहींना तर तुरुंगातही पाठवले. या बदल्यात भाजपने त्यांना काय दिले? हा प्रश्न आहेच. पण त्याची जराही पर्वा न करता सोमय्या आपल्या कार्यात तत्पर असतात. आता लोकसभा व विधानसभा निवडणुका संपल्यावर त्यांनी राज्यातील बांगलादेशी- रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करुन राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे? सोमय्यांचे हे मिशन नेमकं कशासाठी आहे? जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
अन् भाजपला झाला फायदा…

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात भाजपच्या पदरी अनपेक्षितपणे मोठे अपयश आले. मुस्लिम, दलित व मराठा समाजाची मते विरोधात गेल्यामुळे या पक्षाला मोठ्या प्रमाणावर अपयश आले. मालेगाव, धुळे, मुंब्रा यासारख्या भागात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे तिथेही भाजपला मोठा फटका बसला. आपल्या या अपयशामागे जनतेत असलेला भाजपविरोधी रोष हेच एकमेव कारण नाही तर व्होट जिहादचा मुद्दाही तितकाच प्रभावी असल्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितले. भाजपविरोधी मतदानासाठी मालेगावसारख्या भागात मोठ्या प्रमाणावर बोगस मुस्लिम मतदार वाढवण्यात आले, त्यांना बाहेरच्या देशातून फंडिंग झाले. हा व्होट जिहादचाच प्रकार असल्याचे फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात सांगून हिंदू मतदारांना पुन्हा आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा भाजपला झाला व विधानसभेत त्यांना चांगले यश मिळाले.
तेव्हापासून सोमय्यांना घुसखोरांचा शोध…

पण केवळ या निवडणुकीपुरता हा मुद्दा चर्चेत न ठेवता सत्तेत आल्यानंतर भाजपने त्याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. राज्यात बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या असल्यामुळे व्होट जिहादसारखे देशविघातक कृत्य होत आहेत, गुन्हेगारी वाढली असल्याच्या निष्कर्षापर्यंत सरकार आले. मग या घुसखोरांना शोधून काढण्याची जबाबदारी भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सोपवली. तेव्हापासून सोमय्या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील कागदपत्रांची तपासणी करुन कोणत्या जिल्ह्यात किती बांगलादेशी घुसखोर आहेत हे सरकारला पुराव्यानिशी कळवत आहेत. गेल्या महिन्यात राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून काही बांगलादेशींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हे लोक १० ते १५ वर्षांपासून इथे अवैधरित्या राहात आहेत, इतकेच नव्हे तर आता चांगले सेटलही झाले असल्याचे उघड झाले. बनावट जन्मप्रमाणपत्राच्या आधारे आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, पासपोर्ट आदी कागदपत्रे मिळवून त्यांनी महाराष्ट्राचे नागरिकत्व मिळवले आहे. या राज्यातील सरकारी सवलतींचा अवैधरित्या ते फायदाही घेत असल्याचे समोर आले आहे. मग अशा बांगलादेशींना सेटल करण्यात सर्वात उपयोगी ठरते ते म्हणजे जन्मप्रमाणपत्र. या मुळ प्रमाणपत्राच्या आधारे सर्व महत्त्वाची कागदपत्रे काढता येत असतात. या घुसखोरांनी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरुन, त्यांना पैसे देऊन अशी हजारो बनावट जन्मप्रमाणपत्र तहसील, नगर पालिकांतून काढली आहेत असे सोमय्यांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. आता ही प्रमाणपत्रे रद्द करण्याचे अभियान सरकारने हाती घेतले आहे.
राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त घुसखोर?

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. हा आरोपी सापडल्यानंतर अधिक चौकशी केली तेव्हा तोही बांगलादेशी घुसखोर असल्याचे समोर आले आहे. अशा घटनांमधून या घुसखोरांकडून आपल्या राज्याला किती मोठा धोका आहे हे दाखवून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे मिशन सोमय्यांच्या हाती सोपवले आहे. आपल्या राज्यात २ लाखांपेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर असल्याचा सोमय्यांचा दावा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या अल्पसंख्यांक बहुल भागात या घुसखोरांना आश्रय दिला जातो. विशेष म्हणजे या सर्वच ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाचे आमदार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हे घुसखोर राहात असल्याचे सोमय्यांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिले अाहे.

सोमय्यांनी नुकताच सिल्लोडचा दौरा केला. शिंदेसेनेचे अब्दुल सत्तार या मतदासंघाचे आमदार अाहेत. सोमय्यांच्या मते, सिल्लोड तालुक्यात ४७३० बांगलादेशी व रोहिंगे राहतात. येथील शासकीय कार्यालयातून देण्यात आलेल्या बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे हे घुसखोर अधिकृत रहिवाशी म्हणून राहू लागले आहेत. त्यामुळे या सर्व प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. भिवंडी, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, पुणे अशा राज्याच्या वेगवेगळ्या शहरात जाऊन सोमय्यांनी तेथील शासकीय कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी मोहिम सुरु केली आहे.
बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाईची मागणी…

शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवून बांगलादेशी घुसखोरांबद्दल कठोर कारवाईची मागणी केली होती. या दोघांच्याही पाठपुराव्यामुळे अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. आता दिल्लीतूनच आदेश आले म्हटल्यावर सरकारही तातडीने कामाला लागले आहे. एका एसआयटीची स्थापना करुन या घुसखोरांचा शोध घेण्याचे काम सुरु करण्या आले आहे. तसेच या घुसखोरांना बनावट कागदपत्र उपलब्ध करुन देण्याचा जो आरोप सोमय्यांनी केला होता त्याचीही चौकशी करुन मालेगावचे तत्कालिन तहसीलदार नितीनकुमार देवरे व नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. ही झाली एका तालुक्यातील कारवाई. आता सोमय्यांनी ज्या ज्या जिल्ह्यात अशा बनावट प्रमाणपत्र वाटपाचा आरोप केला आहे तिथे जाऊन एसआयटी बांगलादेशी घुसखोर व त्यांना आश्रय देणाऱ्या किंवा बनावट कागतदपत्र देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
घुसखोरांच्या मुळापर्यंत जाणे सरकारसमोरचे आव्हान…

आतापर्यंत प्रत्येक सरकारने केलेल्या डोळेझाकीमुळे हे घुसखोर इतक्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईतील कामाठीपुऱ्यात ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली, त्यातील एक महिला तर बनावट प्रमाणपत्राच्या आधारे चक्क सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा लाभही घेत असल्याचे उघड झाले आहे, अाता बोला. म्हणजेच या घुसखोरांचे प्रमाण इतके वाढले आहे की त्याच्या मुळापर्यंत जाऊन समूळ उच्चाटन करणे हे सरकारसमोर एक आव्हानच असेल. त्यासाठी एक दीर्घकालीन मोहिमच हाती घ्यावी लागेल. आता किरीट सोमय्यांनी हाती घेतलेले हे मिशन केवळ राजकीय फायद्यासाठी आहे की राज्याच्या हितासाठी ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण एखाद्या राजकीय नेत्याच्या हाती हे मिशन देण्यापेक्षा सरकारने स्वत:च ते हाती घेऊन एसआयटीमार्फत त्याची पाळेमुळे खोदून काढली तरच राज्यासमोर निर्माण झालेला हा धोका दूर करणे शक्य होईल. अन्यथा केवळ एखाद्या सैफवर हल्ला झाला किंवा एखाद्या रॅकेटमध्ये असे घुसखोर सापडले की तेवढ्यापुरती कारवाई करुन नंतर निवडणुकीच्या काळातच या मुद्द्याला हवा देण्याचे धोरण ठेवण्यात आले तर मात्र या घुसखोरांच्या विळख्यातून महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही, हे मात्र खरे.