ठाकरेंना दगा देऊन तनवाणींनी सोडले संभाजीनगरचे मैदान, जैस्वालांचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रमीचे औरंगाबाद हे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर विशेष प्रेम. आणि त्यातही गुलमंडी हे या शहराचे हृदयस्थान. तिथे आजवर शिवसेनेचीच सत्ता गाजत आलीय. पण अलिकडच्या काळात वातावरण बदलले अन‌् शिवसेनेही दुही निर्माण झाल्याचा फटका या शहराचे हृदयस्थान असलेला छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघ सोसत आहे. आधी २०१४ मध्ये भाजप- शिवसेना वेगळे लढले तेव्हा या मतदारसंघात एमआयएमचा आमदार निवडून आला. यावेळीही तीच परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेची दोन शकलं झाल्याने अनेक वर्षांच्या जीवाभावाचे मित्र आमदार प्रदीप जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवाणी दोन्ही शिवसेनेकडून आमने सामने होते. या लढाईत तिसऱ्यांचा फायदा होणार हे निश्चित होते. हा धोका आेळखून तनवाणी यांनी अचानक निवडणूकीतून माघार घेतली. मात्र आपल्या मित्राचा मार्ग सूकर करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना दगा दिला. िहंदुत्ववादी आमदार निवडून यावा म्हणून आपण माघार घेतल्याचे तनवाणी सांगतात. पण या माघारीमागे बरेच मोठे गूढ लपले आहे… ते कदाचित उलगडणारही नाही. जाणून घेऊ या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचा इतिहास व सध्याची परिस्थिती.. मिशन पॉलिटिक्समधून…

अन् तनवाणी भाजपात गेले होते…

किशनचंद तनवाणी हे पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक. शिवसेनेने त्यांना नगरसेवक, महापौरपद दिले. जालना- औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदारही केले. मात्र २०१४ मध्ये जेव्हा भाजप- शिवसेनेत फूट पडली तेव्हा ही संधी साधून तनवाणी भाजपात गेले, तिथे शहराध्यक्ष झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांचाच माणूस लढवायचा अशी खेळी करत भाजपने त्यांना २०१४ मध्ये तत्कालिन औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात तिकिट दिले. समोर होते तनवाणींचे जवळचे मित्र, शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून चांगले संबंध. पण आमदारकीच्या महत्त्वांकांक्षेमुळे दोघे एकमेकाविरोधात उभे राहिले. याचा फायदा तिसऱ्यालाच झाला. प्रदीप जैस्वाल यांना ४१ हजार तनवाणी यांना ४० हजार मते पडली होती. हिंदू मतांचे विभाजन झाल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील ६१ हजार मते घेऊन विजयी झाले होते. प्रथमच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुस्लिम आमदार निवडून आला. ही चूक दोघांनाही कळली, पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता.

तनवाणींनी म्हणून घेतली माघार…

२०१९ मध्ये शिवसेनेकडून पुन्हा जैस्वाल यांना तिकिट मिळाले. यावेळी भाजप- शिवसेनेची युती होती. तर प्रतिस्पर्धी म्हणून पुन्हा एमआयएमकडून नासेर सिद्दीकी हे उमेदवार होते. कारण इम्तियाज खासदार झाले होते. म्हणून एमआयएमने चेहरा बदलला होता. पण यावेळी हिंदुत्ववादी मते विभाजन न झाल्याने जैस्वाल यांनी एमआयएमचा १३ हजार मतांनी पराभव केला होता. आता २०२४ मध्ये २०१४ प्रमाणेच पेच निर्माण झाला होता. जैस्वाल शिंदे गटाचे उमेदवार आहेत. भाजपशी त्यांची युती आहे. तर उद्धव ठाकरेंकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली. पण दोघांच्या भांडणात मुस्लिम उमेदवाराचा विजय होऊ नये म्हणून अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी तनवाणी यांनी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले.

तनवाणींची महानगरप्रमुख पदावरुन हकालटपट्टी…

यावेळीही एमआयएमचे नासेर सिद्दीकीच इथे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. पण जर ही परिस्थिती उद‌्भवणार हे माहित होते तर मग तनवाणी यांनी अाधीच उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीसाठी हट्ट का धरला. विद्यमान आमदार जैस्वाल हे लढणार हे त्यांना ठाऊक असतानाही उद्धव ठाकरेंचा विश्वासघात का केला? जर माघारच घ्यायची हाेती तर हा निर्णय त्यांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना का कळवला नाही, परस्पर घोषणा का केली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘आपल्यावर कुणाचाही दबाव नाही. हिंदुत्ववादी मतांचा विजय व्हावा, त्यात फूट पडू नये म्हणून आपण माघार घेतली’ असे तनवाणी यांनी पत्रकारांना सांगितले. पण उद्धव सेना आता महाविकास आघाडीत असल्यामुळे मुस्लिम मतेही आम्हालाच मिळणार होती. त्यामुळे माघारीचा प्रश्नच नव्हता, असा दावा उद्धव सेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी तातडीने तनवाणींची महानगरप्रमुख पदावरुन हकालटपट्टी केली. तर शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगितले. पण तनवाणी यांच्या माघारीने या मतदारसंघात जैस्वाल यांच्याविरुद्धचे आव्हानच संपुष्टात आले आहे.