निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर; फेब्रुवारीअखेरच वाजणार लोकसभेचा बिगूल
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूका (Loksabha elections) कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. त्यादृष्टीने रणनिती ठरवण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. २०१४ व २०१९ च्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा मात्र ८ ते १० दिवस आधीच निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Budjet) फेब्रुवारीच्या अखेरीस सादर होईल. दरवर्षी २८ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होत असतो. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकांमुळे संपूर्ण अर्थसंकल्प सादर करता येणार नाही, त्याएेवजी अंतरिम बजेट सादर करावे लागले.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा अंतरिम अर्थसंकल्प यंदा २८ फेब्रुवारीच्या आधीही सादर केला जाऊ शकतो. त्यानंतर लगेचच केंद्रीय निवडणूक आयेागाकडून (election commission) लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
२०१४ मध्ये ५ मार्च रोजी तर २०१९ मध्ये १० मार्च रोजी निवडणुकांची घोषणा झाली होती. यावेळी २९ फेब्रुवारीपर्यंतच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त ७ जानेवारीपासून राज्यांचा दौरा करणार आहेत. तेथील निवडणूक तयारीचा आढावा घेऊन त्यांना पुढील कामे तातडीने करण्याचे निर्देशही दिले जातील. एकूणच या हालचाली पाहता फेब्रुवारीअखेरीस निवडणूका जाहीर करुन संपूर्ण एप्रिल महिन्यात मतदानाचे ५ किंवा ७ टप्पे पार पाडले जातील, अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर मे च्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो.
महाराष्ट्रातही अंतरिम बजेट
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२४ मध्ये संपत आहे. म्हणजेच आताच्या सरकारला नवीन आर्थिक वर्ष पूर्ण करता येणार नाही. म्हणूनच शिंदे सरकारलाही यंदा संपूर्ण अर्थसंकल्प सादर न करता अंतरिम बजेटच मांडावे लागेल. फेब्रुवारीच्या अखेरीस राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येईल, त्यात हे बजेट मंजूर केले जाईल. आचारसंहितेच्या तारखांचा अंदाज घेऊन राज्याचे बजेटही दरवर्षीपेक्षा लवकरच सादर केले जाऊ शकते.