आपल्या नेत्यासोबत सावलीसारखा राहणारा, प्रति पालकमंत्रीच्या अविर्भावात वावरणारा, अधूनमधून समाजसेवेची झुल पांघरणारा पण त्याआड लपून गुन्हेगारी कारवाया करणारा वाल्मीक कराड तुरुंगात गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. वाल्मीकवर केवळ खंडणीचेच आरोप नाहीत तर सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातही त्याच्या सहभागाचे संशय आहेत. गेली १० ते १५ वर्षे हा कराड धनंजय मुंडेंसोबत वावरतोय, त्यांचे ऑफिस सांभाळतोय, अनेक व्यवसायात त्यांची पार्टनरशीप आहे. त्या वाल्मीकचे काळे धंदे धनंजय मुंडेंना माहिती नसतील, हे कुणालाही पटणारे नाही. म्हणूनच ‘पार्टर्नर इन क्राईम’ने नैतिक जबाबदारी स्वीकारुन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र आपल्या नैतिकतेनुसार आपण निर्दोषच आहोत, अशी टिमकी वाजवून मंत्रिपद टिकवण्याचे मुंडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पाणी डोक्यावरुन जाऊ लागलेय.
एकापाठोपाठ एक अनेक घोटाळेही समोर येऊ लागल्याने मुंडेंचा बचाव करणे अजित पवारांनाही आता फारकाळ शक्य होणार नाही हे लक्षात आल्यावर मुंडे यांनी राजसत्ता राखण्यासाठी थेट धर्मसत्तेचा आधार घेतला. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवान गडावर जाऊन मुंडेंनी तेथील महंत नामदेवशास्त्री यांचा भक्कम पाठिंबा मिळवला. मात्र त्यामुळे मुंडेंचे मंत्रिपद वाचणार नसले तरी महंत मात्र बदनाम झाले. धनंजय मुंडेंसारख्या राजकारण्याची पाठराखण केल्याची महंतांची कृती समाजाला पटलेली नाही. पण महंतांनी ही भूमिका घेण्यामागेच काय असावे कारण… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
अन् अजित दादांनी भरला दम…
धनंजय मुंडेंच्या समर्थकांचे अनेक कारनामे समोर आल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्रिपद मुंडेंना देण्यास नकार दिला. एकट्या धनंजय मुंडेंनाच नव्हे तर पंकजा मुंडेंनाही देण्यास नकार दिला. कारण भावाला झाकून बहिणीला जबाबदारी दिली तरीही कारभार पुन्हा मुंडेच करणार आणि पुन्हा बीडची बदनामी होणार याची बहुता त्यांना खात्री असावी. सरपंच हत्या प्रकरणाच्या निमित्ताने बीडमधील जी गुंडगिरी बीडच्याच सर्वपक्षीय आमदारांची उजेडात आणली त्यामुळे पुन्हा मुंडेंच्या हाती बीडचा कारभार देणे येाग्य नसल्याची अजित पवारांनाही खात्री पटली, म्हणूनच या बहुचर्चित जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांनी घेतले. आता अजितदादा आपलेच नेते आहेत, नाव त्यांचे पण कारभार मात्र आपलाच असेल, या अविर्भावात धनंजय मुंडे होते. पण दादाच्या कामाची स्टाईलच वेगळी असते. धनंजय मुंडेंचा हा भ्रम त्यांनी पहिल्याच दौऱ्यात दूर सारला. डीपीसी बैठकीच्या निमित्ताने बीडमध्ये प्रथमच आलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन धनंजय मुंडेंसमोर या सर्वांची कानउघाडणी केली. ‘कालपर्यंत तुमच्या चुकांवर पांघरुन घालून आता माझेच पांघरुन फाटलंय, यापुढे चुकीचे वागणाऱ्याची गय करणार नाही’ असा दम अजित पवारांनी समोर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना भरला असला तरी त्यांचा सर्व रोख शेजारीच उभ्या धनंजय यांच्याकडे होता हे लपून राहिलेले नाही.
धनंजय मुंडेंच्या काळातील कामांची लागली चौकशी…
आता बीडमधील राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत का? तर याचे उत्तर नाही असेच येईल. पण सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटक झालेल्या आराेपींपैकी एक विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा केज तालुकाध्यक्ष होता, दोन कोटीच्या खंडणी प्रकरणात अटक झालेला वाल्मिक कराड हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता, त्याच्याकडे राष्ट्रवादीने लाडकी बहिण योजनेचे समन्वयक पद दिले होते हे विसरुन कसे चालेल? आरेापींमध्ये राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आढळले ते मंत्री धनंजय मुंडेंचे समर्थक निघाले. यामुळे केवळ धनंजय मुंडेंची बदनामी झाली नाही तर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही बदनाम झाला. म्हणूनच यापुढे बीडमध्ये अशी दादागिरी, दबंगगिरी सहन करणार नाही हे अजित पवारांनी सुनावले. इतकेच नव्हे तर धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाच्या दोन वर्षाच्या काळात बीड जिल्ह्यात झालेल्या ८०० कोटींच्या कामाची चौकशीही अजितदादांनी लावली.
धनंजय मुंडेंचा अखेरचा हुकमी एक्का…
अजित पवारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे धनंजय मुंडेंची पायाखालची वाळू सरकली. आता आपल्या राजकीय करिअरची ‘राख’ होतेय की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. अजित पवारांचाही नाईलाज झालाय. कारण मुंडेंवर आता केवळ राजकीय आरोप होण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर केतन तिरोडकर, अंजली दमानिया यांनी वेगवेगळ्या घोटाळ्याचे पुरावे समोर आणून थेट न्यायालयीन लढाईची तयारी दर्शवली आहे. पीक विमा घोटाळा, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासारखी मुंडेची प्रकरणेही बाहेर आलीत. या सर्व प्रकरणामुळे महायुती सरकारची बदनामी होतेय, त्यामुळे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अस्वस्थ आहेत. धनंजय त्यांचेही निकटवर्तीय असले तरी आता त्यांना अभय देता येणार नाही, अशी भूमिका घेत फडणवीस यांनी अजित पवारांकडे निर्णय सोपवला. उद्या कोर्टाने आदेश दिल्यास आणखी नामुष्की होईल त्याआधी धनंजय यांनी मंत्रिपद स्वत:हून सोडावे, अशी अजितदादांचीही भूमिका आहे. पण धनंजय मात्र मंत्रिपद सोडण्यास तयार नाही. चोहोबाजूने कोंडी होत असताना अखेर धनंजय मुंडे यांनी अखेरचा हुकमी एक्का बाहेर काढला.
धनंजय मुंडेंचा अप्रत्यक्षरित्या इशाराच…?
बीडमधील अजित पवारांचा दौरा संपताच धनंजय मुंडे यांनी रातोरात भगवान गड गाठला. तिथे मुक्काम करुन महंत नामदेवशास्त्री यांच्याशी मनमोकळा संवाद केला. आपल्याला कसे टार्गेट केले जात आहे ही व्यथा मांडली. महंत नामदेवशास्त्री हे संत माणूस. एका भक्ताच्या भावनांमुळे त्यांचे मन हेलावले व संपूर्ण गड तुमच्या पाठीशी आहे, अशी घोषणा करुन ते मोकळे झाले. या मागचे राजकारण कदाचित महंतांना माहित नसावे. संपूर्ण भगवान गड भक्कमपणे पाठिशी असल्याची महंतांकरवी घोषणा करुन घेत धनंजय मुंडेंनी त्या माध्यमातून अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. माझा राजीनामा घ्याल तर भगवान गडाला मानणारा लाखो वंजारी, ओबीसी समाज आपल्या महायुतीविरोधात जाईल, भविष्याता त्याचा फटका बसू शकतो, असा अप्रत्यक्ष इशारा मुंडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देण्याचा प्रयत्न केला असे मानले जाते. आता त्यांच्या या इशाऱ्याला फडणवीस व अजित पवार बधणारे नाहीत. उलट असे डावपेच टाकल्यामुळे ते मुंडेंवर नाराज होतील. चौकशी यंत्रणांवरही त्याचा काही परिणाम होणार नाही.
अन् महंत सापडले अडचणीत…
पण धनंजय मुंडेंची पाठराखण करुन महंत नामदेवशास्त्री मात्र अडचणीत आले आहेत. कालपर्यंत महंतांच्या पाया पडणारे लोक आता त्यांच्या या भूमिकेकडे संशयाने पाहू लागले आहेत. ज्या महंतांनी पंकजा मुंडे यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवल्यानंतर त्यांना आश्रय देण्याएेवजी गडाची दारे बंद केली त्यांनी राजकीय आरेापांनी अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना भक्कमपणे पाठिंबा कसा काय जाहीर केला? असा प्रश्न आता समाज विचारु लागला आहे. गडावर राजकारणाला जागा नाही, असे म्हणणारे महंत आरेापीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या धनंजय मुंडेंना कसे काय अभय देत आहेत? असा जाब जनता विचारु लागली आहे. इतकेच नव्हे तर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची मानसिकता काय होती हे अाधी मीडियाने समजून घ्यावे. या आरोपींनाही पूर्वी मारहाण झाली होती, असे सांगून महंत अप्रत्यक्षपणे हत्येच्या कृतीचे समर्थन तर करत नाहीत ना? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित करत आहेत.
राजकीय कारस्थानाचे महंत बळी पडले?
धनंजय मुंडे व महंतांचे शिष्य- गुरुचे नाते आहे, यात शंका नाही. पण एखादा शिष्य चुकीचे वागत असेल तर कान धरुन त्याला त्याची चूक लक्षात आणून देणे गुरुचे काम असते. मात्र त्याच्या चुकांवर पांघरुन घालण्याची महंतांनी जी कृती केली त्याला जनता मान्य करणार नाही. ज्या धनंजय मुंडेंचे पक्षप्रमुख अजित पवार आता त्यांच्या चुकांवर पांघरुन घालण्यास तयार नाहीत त्या चुकांवर महंतांनी पांघरुन घालण्याची चूक का करावी ? ज्या देशमुख कुटुंबीयांनी पितृछत्र गमावले त्यांनी फोडलेला टाहो एेकण्याएेवजी आपले मंत्रिपद वाचवण्यासाठी गडाच्या मागे लपण्याचे डावपेच आखणाऱ्या एका राजकारण्याच्या कुटिल कारस्थानाचे महंतांनी बळी का पडावे? हा जनतेचा प्रश्न आहे. याचे उत्तर महंताना द्यावे लागेल. माणूस कुणीही असो, तो चूकत असतो. धनंजय मुंडे चुकले असतील तर त्यांनी मंत्रिपदापासून दूर होण्याची नैतिकता दाखवावी. व नामदेवशास्त्री चुकले असतील तर त्यांनीही अापल्या भूमिकेत दुरुस्ती करावी, एवढीच यानिमित्ताने अपेक्षा आहे.