लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा देत काँग्रेसने उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये भाजपची विजयी घोडदौड रोखली. आता हे राष्ट्रीय मुद्दे बाजूला पडून महाराष्ट्र विधानसभेत स्थानिक मुद्दे चर्चेला येतील, अशी अपेक्षा होती. पण लोकसभेला हिट झालेला संविधान बचावचाच फॉर्म्युला काँग्रेसने पुन्हा एकदा पुढे केला आहे. भाजपने मात्र आता या नॅरेटिव्हला आक्रमक उत्तर देण्याची तयारी ठेवली असून त्यासाठी शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावर आरोपांचा धुरळ उडवायला सुुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या मैदानात आता संविधान बचाव जिंकतेय की शहरी नक्षलवादाचा नॅरेटिव्ह भाजपच्या मदतीला धावून येतोय.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
राहुल गांधींचे आव्हान…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा पहिला महाराष्ट्र दौरा नुकताच झाला. नागपूरमध्ये काही मोजक्या लोकांच्या उपस्थित त्यांनी संविधान परिषद घेऊन आपल्या प्रचाराची दिशा दाखवून दिली. नंतर सायंकाळी मुंबईत मविआच्या पाच गॅरंटीची घोषणा करताना राहूल यांनी पुन्हा संविधान बचावचा नारा दिला. ‘राज्यघटना अधिक बळकट करण्यासाठी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेची भिंत पडणारच आहे. तसेच जातनिहाय जनगणनाही मंजूर होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते रोखून दाखवावेच,’ असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना ते म्हणाले, ‘देशाच्या संवैधानिक संस्था राज्यघटनेनुसार चालतात. पण, आरएसएसला हे मान्य नाही. पण ते या संस्थांवर सरळ आक्रमण करायला घाबरतात. समोरून हल्ला केला तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. म्हणून ते विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून लपून हल्ला करुन संविधान धोक्यात आणण्याचे काम करतात. ते रोखण्यासाठीही जातगणना करणे, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे हे दोन उद्दिष्ट आम्हाला साध्य करायचे आहेत,’ अशी राहूल गांधी यांनी जाहीर केले. तेलंगणा व कर्नाटकात काँग्रेची सत्ता आल्यावर तिथे जातनिहाय जनगणना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आघाडीचे सरकार अाले जातनिहाय जनगणना सुरु करणार असल्याचे राहूल गांधी म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचे आरोप…
आता जातनिहाय जनगणना हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा आहे. कारण इंडिया आघाडीच्या मागणीनंतरही केंद्रातील मोदी सरकारने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. लोकसभेत काँग्रेसने हाच मुद्दा उपस्थित करुन दलित मतदारांना आपल्याकडे खेचून घेतले. महाराष्ट्रातही विधानसभेला हाच फॉर्म्युला वापर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपची अडचण झालीय. त्यामुळे भाजपने राहुल गांधी यांच्या संविधान बचाव या नॅरेटिव्हला काउंटर करण्यासाठी शहरी नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राहूल गांधी यांनी नागपूर व मुंबईच्या सभेत संविधानाची प्रत दाखवत भाषण केले. यापूर्वीही अनेक सभेत ते हीच कृती करतात. आता भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर आक्षेप घेतला अाहे. एका मुलाखतीत फडणवीस म्हणाले, ‘राहुल गांधी यांना शहरी नक्षलवादी आणि अराजकवादी शक्तींनी घेरले आहे. त्यांचे विचार अति-डाव्या विचारसरणीत बदलले आहेत. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्हरमध्ये असते. पण राहुल हे लाल रंगातीलच कव्हर घातलेलीच प्रत का दाखवतात? त्यांची लोकशाही मूल्ये पोकळ आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या १८० संघटना विध्वंसक कृत्यात सहभागी असणाऱ्या होत्या. त्याची नोंदही आहे. राहुल एका हातात संविधान असल्याचे सांगतात आणि आपल्या कृत्यांमधून अराजकतेचा प्रचार करतात. राज्यघटना हा एक आदेश आहे, अराजकता ही अव्यवस्था आहे. म्हणूनच त्यांच्या कायद्याची प्रत लाल रंगाची आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
नाना पटोलेंचे प्रत्त्युत्तर…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही फडणवीसांना चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. ‘ हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तोही अपवित्र वाटू लागला आहे. संविधानाच्या पुस्तकाचा रंग लाल, पिवळा का काळा असावा हे ठरविण्याचा अधिकार संविधानविरोधी लोकांना नाही. संविधान वाचवणे भाजपा व फडणविसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत चालणारी मराठी माणसे शहरी नक्षलवादी आहेत का? असा आरोप करणाऱ्या फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची माफी मागावी. राहुल गांधी यांच्या पहिल्याच कार्यक्रमाने भाजप व फडणवीसांची पळता भुई थोडी झाली. घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पटोले म्हणाले. एकूणच आता विधानसभेच्या प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला पडून संविधान व शहरी नक्षलवाद या मुद्द्यावर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. यात पाणी, रस्ते, रोजगार, विकास या मुद्द्यांची मात्र ना युतीला आठवण येतेय ना आघाडीला..