महाराष्ट्राच्या राजकारणाला घराणेशाही नवीन नाही. पाच वर्षे ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर नेते- पक्ष उड्या मारतात, तोच पक्ष व नेत्यांना निवडणुकीच्या वेळी तिकिट वाटपात मात्र या कार्यकर्त्यांचा विसर पडतो. अापल्याच घरात उमेदवारी कशी राहिल यासाठी नेतेमंडळी प्रयत्न करत असतात. आता मात्र वेगवेगळ्या पक्षातून अापल्याच घरात आमदार- खासदारकी मिळवण्याचा ट्रेंड राज्यात सुरु झालाय. या विधानसभा निवडणुकीत त्याची तीन प्रमुख उदाहरणे आपल्याला दिसून येतील. कोणती आहेत ही राजकीय घराणी, कोणकोणत्या पक्षात आहे त्यांचा वावर…
संदीप नाईकांचा शरद पवार गटात प्रवेश!
भाजपच्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत नवी मुंबईचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांना पक्षाने एेरोलीतून तिकिट दिले आहे. मात्र त्यांचे धाकटे पूत्र संदीप नाईक यांनाही उमेदवारी हवी होती, तीही भाजपच्याच विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बेलापूर मतदारसंघातून. अाता एका घरात एक उमेदवारी दिली तरी जर समाधान होत नसेल तर पक्ष तरी काय करणार. म्हणून भाजपने संदीप यांना उमेदवारी नाकारली. मात्र त्यांची आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा इतकी दाट आहे की त्यांनी ज्या भाजपने आपल्या वडिलांना आमदारकीची उमेदवारी दिली त्याच पक्षाला सोडून शरद पवार गटात प्रवेश केलाय. या पक्षातर्फे ते आता मंदा म्हात्रे यांच्याविरोधात लढतील.
मंदा म्हात्रेंचा पराभव गणेश नाईकांचेच ध्येय?
खरं तर संदीप यांच्या या बंडखोरीला गणेश नाईकांचा पाठिंबा नसेल, असे कुणी सांगितले तर खरे वाटणार नाही. हे शंका रास्तही आहे. आता गणेश नाईक वरवर कितीही सांगत असले की मी मुलाचा प्रचार करणार नाही, तरीही मंदा म्हात्रेंचा पराभव करणे हे मुळाच गणेश नाईक यांचेच ध्येय आहे. आता आपल्या मुलाकरवी ते हे ध्येय साध्य करुन घेत आहेत. भाजपलाही हे माहिती आहेच, पण तरीही नाईकांवर कारवाई करण्याचे किंवा त्यांची उमेदवारी रद्द करण्याचे धाडस दिल्लीची महाशक्तीही दाखवू शकत नाही. हे झाले एक उदाहरण.. माझ यंदाच्या निवडणुकीत राज्यात अशी चार- पाच उदाहरणे आहेत ज्या राजकीय घराण्यांनी आपापल्या सोयीसाठी वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून एकापेक्षा जास्त आमदारकी आपल्याच घरात कशी राहिल, सर्वच पक्षात आपले कुटुंबीय कसे राहतील याची काळजी घेतलेली आहे.
दुसरे उदाहरण तर फारच इंटरेस्टिंग आहे…
समीर भुजबळांचा शरद पवार गटात प्रवेश?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे स्वत: कॅबिनेट मंत्री अाहेत. आता येवला मतदारसंघातून अजित पवारांनी त्यांना पुन्हा उमेदवारीही दिली आहे. भुजबळ यांचे पूत्र पंकज यांची नुकतीच विधान परिषदेवर अजितदादांनीच नियुक्ती केली. एवढ्यावरही भुजबळ कुटुंबीयांचे समाधान झालेले नाही. आता भुजबळांचे पुतणे समीर हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढू इच्छित आहेत. खरे तर या मतदारसंघात सध्या शिंदेेसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत. म्हणजे भुजबळांच्या पक्षाच्या मित्रपक्षाचाचा हा आमदार आहे. मात्र त्याला पाडायचं असे भुजबळांनी ठरवलंय. आता अजित पवार महायुतीच्या बंधनामुळे तिथे समीरला उमेदवार देऊ शकत नाहीत. तर मग ज्या शरद पवारांशी बंड करुन छगन भुजबळ बाहेर पडले त्याच पवारांच्या पक्षात पुतण्या समीरला पाठवण्याची तयारी केली जातेय. या पक्षांतराशी आपला संबंध नसल्याची आवई छगन भुजबळ उठवतीलही. पण त्यांच्या आशीर्वादाशिवाय समीर इतके मोठे धाडस करु शकतो का? हे न कळण्याएवढी जनता खुळी नाही. पण समीर यांनी बंड केल्यावर छगन भुजबळांवर कारवाईचे धाडस अजित पवार तरी करु शकतील का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल.
निलेश राणेंच्या हाती शिवधनुष्य…
तिसरे उदाहरण कोकणातील राणे कुटुंबीयांचे…गेल्या २० वर्षात चार पक्ष फिरुन आलेले कोकणातील राणे घराणे आता भाजपमध्ये स्थिरावले आहे. स्वत: नारायण राणे सिंधुदुर्गचे खासदार झालेत. त्यांचा धाकटा मुलगा नितेश कणकवलीचा आमदार आहे. दोघेही भाजपातच आहेत. आता थोरला मुलगा नीलेश यालाही आमदारकीचे वेध लागले आहेत. पण कोकणात भाजपचा कोटा फुल झालाय. त्यामुळे राणेंनी नीलेशला शिंदेंच्या शिवसेनेत पाठवून कुडाळची उमेदवारी पदरात पाडून घेण्याची शक्कल लढवली. ज्या शिवसेनेतून १९ वर्षांपूर्वी राणे बाहेर पडले होते, व जी शिवसेना आपण कोकणातील संपवल्याच्या वल्गना राणे करत होते त्याच शिवसेनेला शरण जाण्याची नामुष्की पूत्राचा आमदारकीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी राणेंवर आलीय. पण राजकारण्यांना भूतकाळावर लक्ष द्यायला वेळ नसतो. जनता मात्र काहीही विसरलेली नसते. त्यामुळे आता कुडाळची जनता नीलेश राणेंना कितपत साथ देते हे निवडणूक निकालानंतर कळेलच. अनेक मतदारसंघात स्वकीय आपसात लढत आहेत. मात्र या तीन- चार राजकारण्यांनी आपल्याच घरात पदे राहण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघांची व वेगवेगळ्या पक्षाची निवड करण्याचे जी शक्कल लढवली आहे, त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणारा निष्ठावान कार्यकर्ता मात्र उपेक्षितच राहतोय.