अशोक चव्हाण, प्रफुल पटेल, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडे, चंद्रकांत हंडोरे, मिलिंद देवरा राज्यसभेवर बिनविरोध

Maharashtra Politics- 6 Rajya Sabha candidates won unopposed

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी चार पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) व पक्षाच्या वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Dr. Ajit Gopchade) यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदेसेनेने काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora), राष्ट्रवादी अजित पवार गटाने माजी मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) व काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी दिली. या सर्वांनी शेवटच्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे.

या सर्व उमेदवारांमध्ये सर्वांना चकित करणारे नाव होते ते म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांचे. कारण पटेल यांची जुलै २०२२ मध्येच पाचव्यांदा राज्यसभेवर निवड झाली होती. म्हणजे त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत होता. तरीही चार वर्षे आधीच विद्यमान खासदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा नव्याने खासदार का होऊ इच्छित आहेत? पक्षाने त्यांना तशी परवानगी का दिली? हे प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाले

सर्वच पक्षांनी साधली समीकरणे

  • अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना राज्यसभेवर पाठवून त्यांना भाजपात घेताना दिलेला शब्द पूर्ण केला. आता चव्हाणांच्या माध्यमातून मराठवाडाभर लोकसभेला प्रचार करुन सर्व जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न.
  • डॉ. अजित गोपछडे (Dr. Ajit Gopchade) हे नांदेडचे बालरोगतज्ञ आहेत. भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्षही. अशोक चव्हाणांना पक्षात घेतल्याने नांदेडमधील भाजपचे जुने निष्ठावंत नाराज झाले होते. त्यांचा रोष वाढू नये म्हणून डॉ. गोपछडे यांच्या रुपाने त्याच जिल्ह्याला अजून एक खासदारकी दिली. गोपछडे हे संघ, अभाविपच्या मुशीत तयार झालेले स्वयंसेवक आहेत. बाबरी मशिद पाडताना अयोध्येत जे आंदोलन झाले त्यात ते आघाडीवर होते. त्यांना खासदारकी देऊन जुन्या निष्ठावंतांनाही न्याय दिल्याचा संदेश भाजपने राज्याततील निष्ठावंतांपर्यंत पोहोचवला आहे.
  • पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni)  यांना ५ वर्षानंतर पक्षाने न्याय दिला आहे. मेधा या २०१४ मध्ये कोथरुडच्या आमदार होत्या. मात्र नंतर २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याचा आदेश पक्षाने त्यांना दिला होता. त्यांनी तो मान्यही केला. बदल्यात विधान परिषदेवर वर्णी लावण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, मात्र ५ वर्षे होत आली तरी ते पाळले नव्हते. त्यामुळे मेधा नाराज होत्या. दुसरीकडे कसबा पेठ पोटनिवडणूकीत भाजपने ब्राह्मण उमेदवार देण्याची परंपरा मोडीत काढली होती. या दोन्ही घटनांमुळे भाजप आता ब्राह्मणांना डावलत असल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे समाजाचा रोष वाढत गेला. त्यामुळे कसबा पेठ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यातून धडा घेत लोकसभा निवडणुकीपूर्वी मेधा यांना खासदार करत भाजपने ही चूक दुरुस्त केली.
  • काँग्रेसमधून नुकतेच शिंदेसेनेत आलेले मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवले. अनेक निष्ठावंतांना डावलून शिंदेंनी हा निर्णय घेतला. त्यामुळे काही इच्छूक नाराज झाले. पण आगामी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ व मुंबई मनपा निवडणुकीत हिंदी भाषिक मतांसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. शिवाय देवरा यांची उद्योग जगतात चांगली उठबस आहे. त्या माध्यमातून शिवसेनेला मोठी आर्थिक रसद मिळण्याची अपेक्षा आहे.
  • काँग्रेसने मुंबईतील दलित नेते, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore)  यांना खासदार केले. ते अनेक वर्षांपासून पक्षात दुर्लक्षित होते. २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती, पण काही आमदार फुटल्याने त्यांचा पराभव झाला. ही उणिव दूर करण्यासाठी व लोकसभा निवडणुकीपूर्वी दलित व्होटबँक भक्कम करण्यासाठी पक्षाने हंडोरे यांचे नाव पुढे केले. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमधील संभाव्य फूट काही प्रमाणात रोखण्यात या निर्णयामुळे मदत होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.

अशोक चव्हाण, प्रफुल पटेल, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडे, चंद्रकांत हंडोरे, मिलिंद देवरा राज्यसभेवर बिनविरोध

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics