राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोक्यावर अजितदादा पवारांच्या प्रचाराचे ‘ओझे’

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले की भाजप नेत्यांची पावले संघाच्या कार्यालयाकडे वळू लागतात. चार दिवसांपूर्वी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरच्या संघ कार्यालयात जाऊन ‘मार्गदर्शन’ घेतले. एरवी निवडणुकांत कोणते मुद्दे हायलाईट करायचे, जनसंपर्क कसा वाढवायचा याबाबत संघ भाजपला पडद्याआडून मार्गदर्शन करत असतो. मात्र यावेळी महायुतीत नव्याने सामील झालेल्या अजितदादांचा (Ajit pawar) प्रचार कशा पद्धतीने करायचा? यावर भाजप व संघ नेत्यांमध्ये खल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही अराजकीय संघटना असली तरी त्यांच्या भक्कम पाठबळवरच भाजपचे राजकारण चालते हे लपून राहिलेले नाही. संघाचे देशभर लाखो स्वयंसेवक आहेत. ते थेट भाजपचा प्रचार करत नसले तरी भाजपला हवे असलेले मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचे मतदान भाजपच्या झोळीत कसे पडेल हे काम ते बिनबोभाट करत असतात. त्यामुळे भाजपच्या प्रचाराचा अजेंडा ठरवताना त्यावर संघ विचाराचा पगडा असतो. इतकेच नव्हे तर ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे तेथील कारभारही संघाच्या (RSS) मार्गदर्शनाखाली चालत असतो.

नागपुरात बंदद्वार खलबते (Door Closed Meeting in Nagpur)

चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयात जाऊन तेथील पदाधिकाऱ्यांची बंदद्वार चर्चा केली. यात प्रचाराच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा तर झाली. पण चर्चेचा मुख्य मुद्दा होता तो अजित पवारांबाबतचा (Ajit Pawar). २०१४ च्या निवडणुकीत राज्यात प्रथमच भाजपच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले. त्या निवडणुकीपूर्वी सर्व भाजप नेत्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकावर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केले. यात प्रामुख्याने राष्ट्रवादीवर व त्यातही अजित पवारांच्या भ्रष्टाचारावर सर्वांचा रोख होता. सिंचन घोटाळ्याचे (Irrigation Scam) बैलगाडीभर पुरावे फडणवीसांनी सादर केले. त्यातचे यश म्हणजे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. नंतर आपल्या सत्तेत मात्र ते अजितदादांवर कारवाई करु शकले नाहीत.

२०१९ मध्ये तर नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) या केंद्रीय नेत्यांनीही शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवारांच्या (Ajit Pawar) भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले. असे असताना ‘राजकीय तडजोड’ म्हणून अजितदादा गटाला महायुती सहभागी करुन घेण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. मात्र आजवर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांचाच प्रचार करायचा? असा प्रश्न भाजप नेत्यांना आता पडला आहे. त्यासाठी संघाने मदत व मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा भाजप नेत्यांनी (BJP) नागपूरच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे.

अजितदादांवर भाजप नेतेही नाराज (BJP leaders angry with Ajit Dada)

खरे तर अजित पवार यांना महायुतीत घेण्यास प्रदेश भाजप नेत्यांचा व शिंदे सेनेचाही विरोध होता. त्याचे कारण म्हणजे अजितदादा गटाच्या रुपाने सत्तेत अजून एक वाटेकरी वाढणे दोन्ही पक्षांना परवडणारे नव्हते. शिंदे सेनेने बंड करुन मुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र अजूनही त्यांचे अनेक आमदार मंत्रिपदापासून वंचित आहेत. तसेच इतका मोठा खटाटोप करुन सत्ता मिळाली खरी पण आपले नेते देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रिपदावर बोळवण झाली हे भाजप नेत्यांना पटलेले नव्हते. मात्र हायकमांडच्या निर्णयापुढे बोलण्याचे धाडस नसल्याने भाजप नेत्यांनी गप्प बसून हे निर्णय मान्य केले. अजितदादा गटाला मात्र महायुतीत येताच ९ मंत्रिपदे देण्यात आली. ही पदे भाजप व शिंदेसेनेच्या वाट्याची होती. पण दादांमुळे त्यांना या पदांचा ‘त्याग’ करावा लागला. दुसरीकडे, विधानसभा, लोकसभा, विधान परिषदेतही अजितदादा गटाला वाटा द्यावा लागणार. त्यामुळे आपसुकच भाजप व शिंदेगटाची संधी हिरावली जाणार. भाजप व शिंदेसेनेकडे बहुमत असताना अजितदादांची गरज काय? असा प्रश्न भाजप नेते विचारत असतात. मात्र त्याचे उत्तर मोदी- शहांकडे मागण्याचे धाडस या नेत्यांमध्ये नाही.

कोणत्या तोंडाने प्रचार करायचा? (Ajitdad’s campaign unacceptable to Rss)

आता एप्रिलमध्ये लोकसभा तर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत. त्याची प्रचार रणधुमाळी सुरु झाली आहे. मतदारांना सामोरे जाताना शिंदेसेनेसोबत केलेल्या युतीचे समर्थन करणे भाजपसाठी अजिबात अवघड नाही. कारण गेली ३० वर्षे समविचारी पक्ष म्हणून शिवसेना (Shiv sena) व भाजप नैसर्गिक युती मतदारांना मान्य आहेच. मात्र अजितदादांना सोबत घेण्याचे कारण काय? असा प्रश्न भाजप्रेमी मतदारांनी विचारला तर त्याचे उत्तर मात्र कोणत्याच ‘प्रचारका’कडे नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मते द्या, असे आवाहन जनतेला कोणत्या तोंडाने करायचे? असा प्रश्न बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांकडून प्रदेशच्या नेत्यांना मेळाव्यातून विचारले जातात. त्यावर ‘वरचा आदेश माना’ एवढेच उत्तर देऊन नेतेमंडळी वेळ मारुन नेत आहेत. मात्र मतदारांना काय उत्तर द्यायचे? हा प्रश्न प्रचारकांसमोर आहेच.

याच चक्रव्यूहातून कसे बाहेर पडायचे? व अजितदादांना सोबत घेण्याची कारणे आपल्या मतदारांना कशी पटवून द्यायची? याबाबत संघाचे मार्गदर्शन भाजप नेत्यांना अपेक्षित आहे. मात्र भ्रष्ट वृत्तीला कधीही थारा न देणाऱ्या संघ परिवाराने यात हात वर केले असून, ‘निर्णय तुम्ही घेतलाय, तुम्हीच निस्तरा’ असा संदेश भाजप नेत्यांना दिल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics