राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ चिन्ह शरद पवारांकडून काढून अजितदादांच्या ताब्यात

संग्रहित छायाचित्र

मुंबई : शिवसेना पक्षाच्या घटनेतील त्रुटी काढून केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission of India) वर्षभरापूर्वी ज्या रितीने हा पक्ष उद्धव ठाकरेंच्या ताब्यातून काढून एकनाथ शिंदेंकडे दिला, त्याच नियमांचा आधार घेत ६ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकीही शरद पवारांकडून (Sharad pawar) काढून आयोगाने अजित पवारांच्या ताब्यात दिली. (NCP party and clock symbol to Ajit Pawar). आता शरद पवार यांच्या गटाला पक्षासाठी नवीन नाव व चिन्ह निवड करावे लागणार आहे.

२ जुलै २०२३ रोजी अजित पवार (Ajit pawar) यांनी राष्ट्रवादीत बंड करुन भाजपच्या सत्तेत स्थान मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही ताबा सांगितला. शिवसेनेच्या बाबतीत जे झाले तेच राष्ट्रवादीतही झाले. शरद पवार गटाने दादा गटाविरोधात निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यापैकी निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर झाला.

कोणत्या आधारावर घड्याळ दादांचे

  • निवडणूक आयोगासमोर झालेल्या १० सुनावण्यांमध्ये अजित पवार गटाने पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवले होते. राष्ट्रवादी पक्षातील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडी गेल्या २५ वर्षात लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत. तर शरद पवार यांनी सांगायचे अन थेट नियुक्त्या व्हायच्या, अशी पद्धत होती. जी पक्षाच्या घटनेला धरुन नव्हती, असे दादा गटाच्या नेत्यांचे म्हणणे होते. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या घटनेनुसारच सर्व प्रक्रिया करुन कार्यकारिणीने सर्व पदाधिकारी निवडीचे अधिकार शरद पवार यांना देण्याचा एकमुखी ठराव घेतला गेला होता, त्यामुळे पवारांनी केलेली निवड ही वैधच असल्याचे पवार गटाचा दावा होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी अजितदादा गटाचे आक्षेप मान्य करत राष्ट्रवादी पक्षात लोकशाही पद्धतीने पक्षांतर्गत निवडणूक होत नसल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड व त्यांनी घेतलेले अधिकार अवैध ठरवण्यात आले.
  • राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील ५४ आमदारांपैकी ४१ आमदार, नागालँडमधील ७ आमदार, दोन खासदार, एक राज्यसभा खासदार हे अजित पवारांसोबत आहेत. म्हणजे जवळपास ७५ % लोकप्रतिनिधींचा दादांच्या नेतृत्वाला पाठिंबा आहे, या निकषावर राष्ट्रवादी पक्ष दादांचा. या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह घड्याळही दादा गटाचे असा निकाल निवडणूक आयोगाने दिला.

सुप्रीम कोर्टात देणार आव्हान

सर्व संविधानिक व लोकशाही नियम पायदळी तुडवून केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिवसेनाचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या बाबतीतही असाच निर्णय येऊ शकतो, अशी शक्यता वाटत होतीच. मात्र आम्ही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे व आमदार जयंत पाटील यांनी दिली.  हे अपेक्षित असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार गटाने तातडीने कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. शरद पवार गटाने याचिका दाखल केली तर आमचे म्हणणे एेकल्याशिवाय निर्णय देऊ, नये अशी विनंती या कॅव्हेटद्वार केली आहे.

शरद पवारांना नवे नाव, चिन्ह निवडावे लागणार (Sharad Pawar will have to choose a new name, symbol)

या महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरती (Rajyasabha election) शरद पवार गटाच्या आमदारांना स्वतंत्र गट म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यासाठी त्यांना पक्षाचे स्वतंत्र नाव व चिन्ह याबाबतचे तीन पर्याय आयोगाला सादर करायचे आहेत. त्यापैकी एक नाव व चिन्हाची निवड आयोग त्यांना करुन देईल. येणाऱ्या राज्यसभा निवडणूकीच हेच नाव शरद पवार गटाला वापरता येईल.

लोकसभेतही नवे नाव, चिन्ह

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतही शरद पवार गटाला नवीन पक्षाचे नाव व चिन्ह घेऊनच लढावे लागेल. अजित पवार गट मात्र राष्ट्रवादीचे नाव व घड्याळ चिन्ह घेऊन लढू शकेल. शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर जर लोकसभा निवडणुकीआधी कोर्टाने आयेागाच्या निर्णयास स्थगिती दिली तर मात्र आयोगाला राष्ट्रवादीचे नाव व चिन्ह गोठवावे लागेल. मग शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांना नवीन नाव व चिन्हानुसार निवडणूक लढवावी लागेल. मात्र शिवसेनेची सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी पाहता शरद पवार गटाच्या याचिकेवर एवढ्या लवकर निर्णय होण्याची शक्यता वाटत नाही. तज्ञांच्या मते, लोकसभेत अजित पवार गट घड्याळावर व शरद पवार गट नव्या चिन्हावरच लढेल.

शरद पवारांनी वर्षभरापूर्वीच तयारी

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या वादात १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने शिंदेंना शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह दिले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या बाबतीतही असे घडू शकते याचे संकेत शरद पवारांना मिळाले होते. त्याचवेळी त्यांनी चिन्ह, पक्षाचे नाव महत्त्वाचे नसते. तर जनतेच्या कोर्टात खरा निकाल लागत असतो, त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यास आपण सज्ज असल्याचे पवारांनी तेव्हाच सांगितले होते.

पवार आतापर्यंत ५ वेगवेगळ्या चिन्हांवर लढले, जिंकलेही

निवडणूक चिन्ह कोणते याला फार महत्त्व नसते, तुम्ही केलेल्या कामांवर लोक निवडून देत असतात, असे शरद पवार गेले वर्षभर वारंवार सांगत होते. इतकेच नव्हे तर १९६७ पासून आतापर्यंत आपण बैलजोडी, चरखा गाय-वासरू, हाताचा पंजा, घड्याळ अशा ५ निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवली होती. चिन्ह बदलले तरी मी निवडूनही आलो होतो, अशी आठवण पवार आपल्या नेत्यांना वारंवार करुन देत होते. आगामी लोकसभा निवडणुकीस नवीन चिन्हासह सामोरे जाण्याची तयारी त्यांनी आधीच पासूनच केल्याचे स्पष्ट होते.