तुम्ही मोठमोठी स्वप्नं बघा, ती मी पूर्ण करेन ही मोदींची गॅरंटी : पंतप्रधानांचे आश्वासन

सोलापूर :  ‘देशातील जनतेचा विकास हाच आमच्या सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी २०१४ पासून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याची फलश्रूती म्हणजे आतापर्यंत २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले आहेत. ४ कोटी लोकांना आम्ही स्वत:चे घरकूल दिले. तुम्ही अजूनही मोठमोठी स्वप्ने पाहा, ती पूर्ण करण्याची मोदी तुम्हाला गॅरंटी (Modi Guarantee) देतो,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना दिली.

सोलापुरात ३० हजार कामगारांसाठी घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. देशातील सर्वात मोठा कामगार वसाहतीचा हा प्रकल्प आहे. त्यापैकी १५ हजार घरकुले पूर्ण झाली असून त्याचे लोकार्पण  शुक्रवारी मोदींच्या (Narendra Modi) हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. भाषणाची सुरुवात मराठीत करुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. पंढरपूरचा विठ्ठल आणि सोलापूरचे श्री. सिद्धेश्वर महाराजांना नमन करुन ते म्हणाले, ’ यापूर्वी देशात नुसतेच गरीबी हटावचे नारे झाले, मात्र त्याचे अनुदान लाभार्थ्यांना नव्हे तर दलालांकडे जात होते. कारण आधीच्या सरकारची नियत, नीती व निष्ठा संशयाच्या पिंजऱ्यात बंद होती. आमची निष्ठा मात्र गरीबांसाठी आहे. त्यामुळे आम्ही दलालांची साखळी बंद करुन योजनांचे अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यात जमा केले. जनधनच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे बँक खाते उघडून दिले.’

नवीन घरात रामज्योत लावा (Light Ramjyot at home)

२२ जानेवारीला अयोध्येत आपले श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहेत. हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे.  आज ज्या ३० हजार लोकांना स्वत:चे घर मिळाले आहे. या सर्वांनी २२ तारखेला आपल्या घरात रामज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन मोदींनी केले.

मोदी झाले भावूक (Modi became emotional) 

‘कामगारांसाठी उभारलेली ही घरे मी पाहिली. खरोखरच ती खूप छान आहेत. लहानपणी मलाही अशा घरात राहायला मिळलं असतं तर..’ हे सांगताना मोदी भावूक झाले होते. त्यांना अश्रू अनावर झाले होते. काही क्षण थांबून त्यांनी पुन्हा भाषणास सुरुवात केली.

मोदी म्हणाले, ‘या घरकूलांचे भूमिपूजन करण्यासाठी मी आलो होतो. आता तुम्हाला घराची चावी देण्यासाठीही मी आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. यापुढे तुम्ही अजून मोठमोठी स्वप्ने पाहा ती पूर्ण करण्याची मी तुम्हाला गॅरंटी (Modi Guarantee) देतो.’

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार नरसय्या आडम आदी उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते अटल अभियान (अमृत २.०) चा शुभारंभही करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics