मविआचे लोकसभेच्या ४० जागा वाटपावर एकमत, मात्र ८ जागांवरुन पेच कायम
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यंमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपावरुन तीन बैठकांत चर्चा झाली. यात ४८ पैकी सुमारे ४० मतदारसंघांच्या वाटपावर काँग्रेस (Congress), शरद पवारांची राष्ट्रवादी (NCP Sharad pawar) व उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shiv sena Udhav Thackeray) या तीन पक्षांची जवळपास एकमत झाले आहे. मात्र ८ मतदारसंघांवरील दाव्यांवरुन हे जागावाटप पूर्णत्वाला गेलेले नाही. आता २ फेब्रुवारी रोजी मविआची अजून एक बैठक होणार आहे, त्यात या अडचणीवर तोडगा निघण्याची आशा तिन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटतेय. (Maharashtra Politics-Seat Sharing of MVA stuck from eight seats).
उद्धव सेनेकडून खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात या चर्चेत सहभागी होत आहेत. समन्वय समितीतील या नेत्यांचे जागावाटपावर एकमत झाल्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रभारी यांच्यात अंतिम बैठक होऊन जागावाटपाची अधिकृत घोषणा होईल. मात्र त्याला फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडू शकतो.
उद्धव सेनेला १५ मतदारसंघ (Shiv sena gets 15 seats)
नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मावळ, संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बुलडाणा, वाशिम- यवतमाळ या १५ जागा उद्धव सेनेला देण्यावर एकमत झाले आहे.
राष्ट्रवादीला ९ जागा (NCP gets 9 seats)
बारामती, जळगाव, रावेर, दिंडोरी, बीड, अहमदनगर, शिरुर, सातारा, माढा हे ९ मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाला मिळणार आहेत.
काँग्रेसला १४ जागा (Congress gets 14 seats)
नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार, पुणे, सोलापूर, सांगली, उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई या जागा काँग्रेसला देण्यावर मतैक्य झाले आहे.
मित्रपक्षांना दोन जागा (Only 2 setas for small alliance parties)
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (vanchit bahujan aaghadi gets akola seat )अकोला व राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले हा मतदारसंघ सोडण्यास आघाडी तयार झाली आहे. कदाचित राजू शेट्टींचे एका मतदारसंघावर समाधान होईल. (Raju Shetty can contest in Hatkanangale) पण प्रकाश आंबेडकर मात्र एका मतदारसंघावर एेकणार नाहीत. सोलापूर, लातूर किंवा अन्य अनुसुचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांवर त्यांचा दावा असेल. शेकापचे भाई जगताप यांनीही रायगडसह २ जागांची मागणी केली आहे. पण शेकापसह माकप, भाकप, जदयू, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष या मविआत समाविष्ट झालेल्या मित्रपक्षांना लोकसभेसाठी एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. विजयी होऊ शकेल असा सक्षम उमेदवार देण्याची ताकद या पक्षांमध्ये नसल्याचे आघाडीतील नेते जाणून आहेत.
तिढा या ८ जागांवरुन
उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, भिवंडी, शिर्डी, जालना, हिंगोली, वर्धा आणि रामटेक या आठ मतदारसंघांमध्ये काँग्रेस व शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरु आहे. यापैकी भिवंडी, जालना व वर्धा मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर पाचही मतदारसंघांमध्ये सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी या ठिकाणी काँग्रेसचा पराभव केला होता. म्हणजे इथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे २०१९ प्रमाणे ताकद राहिलेली नाही. शिवसेनेचे हे पाचही खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांवर काँग्रेस नेते दावा करत आहेत. तर मुळ शिवसेना आमचीच असून शिवसेनेवर प्रेम करणारे व बाळासाहेबांवर निष्ठा असणारे मतदार अजूनही आमच्यासोबत असल्याचा दावा करत हे मतदारसंघ सोडायला उद्धव ठाकरे तयार नाहीत. त्यामुळे हा तिढा वाढत चालला आहे.
जालन्याच्या बदल्यात हिंगोली
भिवंडी, जालना व वर्धा या मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार आहेत. भिवंडी हा मुस्लिमबहुल मतदारसंघ असल्याने तो आपल्याला सुटावा अशी मागणी मविआत समाविष्ट झालेला घटक पक्ष समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) केली आहे. तर जालना मतदारसंघात सातत्याने पराभव पदरी येत असल्यामुळे काँग्रेसने हिंगोलीच्या बदल्यात जालन्याची जागा उद्धव सेनेशी अदलाबदल करण्याची तयारी दर्शवली आहे. पण विद्यमान खासदार असल्याने उद्धव सेना हिंगोली मतदारसंघावरचा दावा सोडायला तयार नाही.