लोकसभेत पराभूत उमेदवारांना आता आमदारकीचे डोहाळे

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार किंवा तिकीट कापलेल्या सत्ताधारी भाजप व शिंदेसेनेच्या काही माजी खासदारांचा आता आमदारकीचे डोहाळे लागले अाहेत. गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, मनोज कोटक, हिना गावित, सुजय विखे पाटील या माजी खासदारांनी आता विधानसभेचे तिकिट मिळवण्यासाठी फिल्डींग लावली आहे. प्रसंगी आपल्याच पक्षाच्या विद्यमान आमदारांचे तिकिट कापा, पण आम्हाला उमेदवारी द्या असा त्यांचा हट्ट आहे. कोणकोणत्या मतदारसंघात आहे असा पेच….

१. उत्तर मुंबईतून २०१९ मध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले गोपाळ शेट्टी यांना भाजपने २०२४ च्या लोकसभेत उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देत निवडूनही आणले. त्यामुळे शेट्टी आता बाेरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या ठिकाणी सध्या भाजपचेच सुनील राणे आमदार आहेत. त्यांचे तिकीट कापून शेट्टी लढण्याची तयारी करत आहेत.

२. शिंदेसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य मुंबईतून पराभव झाला होता. तिथे उद्धवसेनेचे अनिल देसाई विजयी झाले. त्यामुळे आता शेवाळेंनी चेंबूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या या मतदारसंघात उद्धवसेनेचे प्रकाश फातर्फेकर हे आमदार आहेत. त्यांनी लोकसभेला देसाईंना आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे या ठिकाणी शेवाळे विरुद्ध फातर्फेकर यांच्यात सामना होऊ शकतो.

३. उत्तर मुंबईतून लोकसभेला इच्छूक असलेले संजय निरुपम यांना यंदा काँग्रेसने तिकीट दिले नव्हते. त्यामुळे ते शिंदेसेनेत गेले. आता ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या इथे उद्धवसेनेचे सुनील प्रभू आमदार आहेत. त्यामुळे प्रभू विरुद्ध निरुपम यांच्यात लढाई होऊ शकते.

४. ईशान्य मुंबईतून भाजपने मावळते खासदार मनोज कोटक यांचे तिकीट कापून मुलुंडचे अामदार मिहिर कोटेचा यांना संधी दिली होती. मात्र उद्धवसेनेचे संजय दीना पाटील यांच्याकडून कोटेचा पराभूत झाले. त्यामुळे आता मुलुंडमध्ये कोटेचा यांच्या जागेवर मनोज कोटक दावा करत आहेत.

५. २०१९ मध्ये उत्तर मध्य मुंबईतून पराभूत झालेल्या प्रिया दत्त यांच्या जागी यंदा काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्या विजयीही झाल्या. त्यामुळे आता वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा प्रिया दत्त यांनी लढावी, अशी गळ काँग्रेसने त्यांना घातली आहे. तिथे भाजपचे आशिष शेलार आमदार आहेत.

६. नंदुरबारमधून १० वर्षे खासदार असलेल्या डॉ. हिना गावित यांचा यंदा काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी पराभव केला. त्यामुळे डॉ. हिना यांनी आता अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. त्यातच त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून अनुकूल वातावरणनिर्मिती केली अाहे. सध्या इथे काँग्रेसचे अॅड. के. सी पाडवी हे आमदार आहेत. खासदार झालेले गोवाल हे त्यांचेच पुत्र आहेत.

७. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने मावळत्या खासदार पूनम प्रमोद महाजन यांचे तिकीट कापले होते. तिथे अॅड. उज्ज्वल निकम यांना तिकीट दिले होते. पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे आता पक्षाने आपल्याला विधानसभेला तरी संधी द्यावी, यासाठी पूनम महाजन प्रयत्नशील आहेत.

८. नगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले सुजय विखे पाटील हे संगमनेर किंवा राहुरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राहुरीत भाजपचे शिवाजी कर्डिले तर संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आमदार आहेत. आठ वेळा विजयी झालेल्या थोरातांना शह देऊ शकेल असा उमेदवार भाजपकडे नाही, त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखेंचे पुत्र असलेल्या सुजय यांना भाजप संगमनेरमधून मैदानात उतरवू शकते. विखे व थोरातांचे अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे.