मुंबई : देशपातळीवरील इंडिया आघाडीला खिंडार पडत असले तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA Alliance) मात्र अजून तरी भक्कम असल्याचे दिसते. काँग्रेस, उद्धव सेना व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी जागावाटपाबाबत चर्चेच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. ३० जानेवारी रोजी मुंबईत अजून एक महत्त्वाची बैठक होत आहे, त्यात लोकसभेच्या जागावाटपावर अखेरचा हात फिरवला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मविआने मराठवाड्यातील ८ जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असल्याचे समजते. (MVA Finalised Seat Sharing In Marathwada) यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ४, काँग्रेसला ३ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
उद्धव सेनेला या ४ जागा
उद्धव सेनेकडे २०१९ च्या निवडणुकीत भाजपशी युती असताना मराठवाड्यातील ८ पैकी ४ जागा होत्या. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर त्यांचा पराभव झाला, उर्वरित ३ जागी विजय मिळवला होता. आता भाजपशी युती तोडून उद्धव सेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार आहे. पक्षात फूट पडून शिवसेना क्षीण झाली असली तरी मराठवाड्यात पूर्वीप्रमाणे ४ जागा मिळवण्यात उद्धव ठाकरेंना यश आले आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी व धाराशिव या पूर्वीच्या जागा त्यांना मिळणार आहेतच. फक्त हिंगोलीच्या जागेची अदलाबदली केली जाणार आहे. हिंगोलीत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) आहेत. मात्र ते आता शिंदे गटात असल्याने शिवसेनेकडे तिथे तगडा उमेदवार नाही. त्यामुळे ही जागा सोडून संभाजीनगर शेजारील जालना मतदारसंघ आपल्याकडे घेण्यास उद्धव सेनेने पसंती दिली आहे. तर जालन्यात पूर्वीपासून काँग्रेस लढायची, पण गेल्या ७ लोकसभा निवडणूकीत सातत्याने हा पक्ष पराभूत होत आला आहे. त्यामुळे काँग्रेस जालना उद्धव सेनेला देऊन त्या मोबदल्यात हिंगोलीची जागा घेऊ इच्छिते.
काँग्रेसला मिळतील या ३ जागा
नांदेड, लातूर व हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरु शकतात. त्यात नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan will be Congress Loksabha candidate in Naded) यांनाच मैदानात उतरवण्याची रणनिती पक्षाने आखली आहे. त्यांच्या प्रभावाचा फायदा हिंगोली मतदारसंघातही होईल, असे काँग्रेसला वाटते. या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी चव्हाणांवर असेल. जर चव्हाण मैदानात उतरले नाहीत तर त्यांचे मेहूणे भास्करराव पाटील खतगावकर (Baskarrao Patl Khatgaokar) यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र पक्षश्रेष्ठींचा आग्रह अशोक चव्हाण यांच्या नावालाच आहे. हिंगोलीत दिवंगत नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांचा प्रभाव आहे. त्यांच्या पत्नी सध्या आमदार आहेत. अशोक चव्हाण व सातव यांच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन हा मतदारसंघ जिंकण्याची रणनिती पक्षाने आखली आहे. या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी अशोक चव्हाणांवर असेल. लातूर हा दिवंगत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा जिल्हा. या मतदारसंघ सध्या अनसुचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे विलासरावांच्या कुटुंबातील कुणीही इथे उमेदवार होऊ शकत नाही. मात्र येथील उमेदवार ठरवण्याची व त्याला निवडून आणण्याची जबाबदारी विलासरावांचे पूत्र अमित देशमुख (Amit Vilasrao Deshmukh) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीला बीड मतदारसंघ
बीड हा मराठवाड्यातील एकमेव मतदारसंघ शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. मागील काही निवडणूकीत राष्ट्रवादीच या मतदारसंघातून लढते. माजी खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील (Jaysingrao Gaikwad Patil) यांनी पक्षाला इथे एकदा विजयश्री मिळवून दिली होती. मात्र त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी (Gopinath Munde) एकदा व त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांनी दोनदा राष्ट्रवादीचा इथे पराभव केला. आता राष्ट्रवादीत फूटही पडली आहे. दिग्गज नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अजितदादांकडे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपशी लढण्यासाठी तगडा उमेदवार शोधण्याचे शरद पवारांसमोर आव्हान असेल. या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ४ आमदार आहेत, पण त्यापैकी फक्त संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) हे एकमेव शरद पवारांसोबत आहेत. मित्रपक्ष उद्धव सेना व काँग्रेसचा इथे एकही आमदार नाही.