लोकसभा निवडणुकीत बंपर यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना आता विधासभेतही आपलीच सत्ता येणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत. तशी त्यांच्यासाठी अगदीच प्रतिकूल परिस्थिती नसली तरी सत्ताधाऱ्यांना चितपट करण्यासाठी त्यांना मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र जर उद्या सगळे डावपेच यशस्वी ठरले अन् स्पष्ट बहुमताने महाविकास आघाडी सत्तेवर आलीच तर मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न अजुन अनुत्तरीतच आहे. सर्वाधिक जागा लढवून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसचे दोन नेते मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत खरे? पण त्यांच्या हायकमांडच्या मनात काही वेगळेच अाहे. कोण असेल मविआचा मुख्यमंत्रिपदाचा खरा चेहरा जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
उद्धव सेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच..?
महाविकास आघाडीत विधानसभेसाठी जागावाटपाची चर्चा अाता अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीच्या तुलनेत आघाडीत जागावाटपावरुन फारसे वाद नाहीत. फक्त मुंबई व विदर्भातील काही मतदारसंघावरुन उद्धव सेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. निवडणूक जाहीर झाली की हे वादही मिटतील व महायुतीच्या आधी आघाडीचे जागावाटप व उमेदवार जाहीर होतील, अशी तयारी तिन्ही पक्षांनी केली आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महायुतीविरोधात समाजात रोष असल्यामुळे विधानसभेला काहीही झाले तरी आपलीच सत्ता येणार असे आडाखे महाविकास आघाडीने बांधले आहेत. केवळ आडाखेच बांधलेले नाहीत तर उद्धव ठाकरे व शरद पवार यांना जनतेतून मिळणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेवर सत्ता मिळवण्याची रणनितीही तिन्ही पक्षांनी तयार केली आहे. त्यादृष्टीने त्यांचे कामही सुरु झाले आहे.
अन् काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री पदासाठी आत्मविश्वासी…
लोकसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने विधानसभेच्या जागावाटपातही काँग्रेसच मोठा भाऊ असेल हे उद्धव सेना व शरद पवार गटानेही मान्य केले आहे. त्यानुसारच जागावाटप होईल. मग सर्वाधिक आमदार आपलेच निवडून अाले की मुख्यमंत्रीही आपल्याच पक्षाचा होणार, असा आत्मविश्वास काँग्रेसचे नेते बोलून दाखवत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात ही दोन नावे काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धेत आहेत. नाना पटोले हे आक्रमक नेते. एक ओबीसी चेहरा. जेव्हा देशात सगळीकडे भाजपची लाट हाेती तेव्हा त्याच भाजपच्या खासदारकीवर पाणी सोडून ते काँग्रेसमध्ये आले. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी राज्यभर जोमाने कामही केले. पक्षातही गटबाजी संपवण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळातही काही नेते पक्ष सोडून गेले, पण काँग्रेसला परत अच्छे दिन आणण्याचे श्रेयही नाना पटाेले यांनाच जाते, हे नाकारुन चालणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी ते आपल्या नावाची हायकमांडकडे लॉबिंग करताना दिसतात.
काँग्रेसला संधी मिळाल्यास बाळासाहेब थोरात असतील चेहरा?
नुकत्याच एका पत्रकार परिषदेत तर नानांनी ही इच्छा व्यक्त केली. ‘भंडाऱ्याचा भूमिपूत्र मुख्यमंत्री होणार असेल तर प्रफुल पटेल यांनीही आशीर्वाद द्यावेत’ असे म्हणून त्यांनी भविष्यात गरज पडलीच तर अजित पवार गटाकडे मदतीची अपेक्षाही व्यक्त केलीय. दुसरीकडे, निष्ठावंत म्हणून विचार केला तर सध्या बाळासाहेब थोरात यांचे नाव पक्षात अग्रस्थानी येते. शांत, संयमी व्यक्तीमत्व. एक- दोनदा नव्हे तर तब्बल ७ वेळा संगमनेर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले थोरात गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू नेते आहेत. आजवर त्यांना अनेकदा पक्षांतराच्या ऑफर आल्या असतील, पण काँग्रेसची विचारसरणी सोडून कुठेही जायचे नाही हे बाळासाहेबांनी मनोमन ठरवलेले आहे. त्यामुळे पडत्या काळातही ते काँग्रेसच्या सोबतच राहिले. सहकार क्षेत्राचा त्यांचा दांगडा अभ्यास आहे. मतदारसंघात अनेक विकास कामेही केली आहेत. त्यामुळे उद्या काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालीच तर बाळासाहेब थोरातांचे नाव सर्वात पुढे असेल, असे निष्ठावंत काँग्रेसचे नेते सांगतात. पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव तिसऱ्या क्रमांकावर येते. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेल्या पृथ्वीराजबाबांच्या नावालाही कुणाचा विरोध असू शकत नाही. पण काँग्रेसने त्यांना एकदा संधी दिली होती, त्यामुळे आता थोरातांचेच पारडे जड वाटतेय.
ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास पवारांचा हरकत?
अाता हा झाला सगळा जर तरचा खेळ. महाविकास आघाडीची सत्ता आली तरी त्यांचे दोन्ही मित्रपक्ष असलेले उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षालाही मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागलेले आहेतच ना. एकवेळ तिसऱ्या क्रमांकाच्या जागा लढवणाऱ्या शरद पवारांचे फारसे आमदार निवडून आले नाही तर ते या पदासाठी हट्ट करणार नाहीत. मात्र उद्धव ठाकरे यांचा अजूनही मुख्यमंत्रिपदावर दावा आहेच. एकनाथ शिंदे यांनी पक्षात फूट पाडल्याने अवघ्या अडीच वर्षात ठाकरेंना खुर्चीवरुन पायउतार व्हावे लागले. या अपमानाचा बदला घेण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा नुकतीच त्यांनी दसरा मेळाव्यात केली आहे. त्यांनी स्क्रीनवर आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याचे पाच वर्षांपूर्वीचे रेकॉर्डिंग दाखवून आपली महत्त्वाकांक्षाच परत एकदा जाहीर केली आहे. भाजपचे मनसुबे उधळून लावण्यासाठी ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करायला शरद पवार यांचीही काही हरकत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
राहुल गांधींची ठाकरेंच्या नावाला अधिक पसंती?
उद्धव ठाकरेंनी तशी तयारीही सुरु केली आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांनी मुलगा आदित्यसह दिल्ली दौरा करुन सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. प्रसंगी आम्हाला काँग्रेसपेक्षा कमी जागा द्या पण मुख्यमंत्री पदासाठी माझ्याच नावाला संमती द्या, अशी गळ ठाकरेंनी राहुल गांधींकडे घातल्याचे सांगितले जाते. दगाफटका करुन ज्या भाजपने महाविकास आघाडीचे सरकार घालवले त्यांच्या नाकावर टिच्चून मला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचेय, यासाठी तुमची मदत लागणार आहे असेही ठाकरेंनी त्यांना पटवून दिल्याचे सांगितले जाते. आणि ठाकरेंचे हे म्हणणे गांधी परिवाराने मान्य केल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिलीय. त्यामुळे उद्या काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले तरी बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापेक्षा राहुल गांधी हे मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्याच नावाला पसंती देणार असल्याची माहिती दिल्लीतील वर्तुळातून मिळत आहे. प्रसंगी ठाकरेंचे पद अडीच वर्षांसाठी असेल, नंतर काँग्रेसला दुसऱ्या टप्प्यात संधी मिळू शकेल. पण भाजपला धडा शिकवायचा असेल तर ज्या ठाकरेंना अपमानित करुन खुर्चीवरुन खाली उतरवले त्यांना पुन्हा सन्मानाने तिथे बसवायचे, यावर गांधी परिवाराने संमती दिल्याचे सांगितले जाते.