नेतृत्वाची परीक्षा : ठाकरेंना व्हायचंय सीएम, पवार साधणार डाव

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा महायुती व महाविकास अाघाडीच्या माध्यमातून प्रथमच सहा प्रमुख राजकीय पक्ष व त्यांच्या नेतृत्वाची परीक्षा आहे. ‘मिशन पॉलिटिक्स’च्या यापूर्वीच्या व्हिडिओत आपण महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वासमोर काय आव्हाने आहेत हे जाणून घेतले. आता या महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव सेना व शरद पवार गट या तीन पक्षांच्या नेतृत्वाची कशी कसोटी लागणार अाहे, त्यात कोण सरस ठरेल हे जाणून घेऊ…

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणून उदयाला आलेले उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपण सर्वप्रथम माहिती घेऊ या…

बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची समर्थपणे धुरा सांभाळणारे उद्धव ठाकरे २०१९ मध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शिवसेनेने विधानसभेची निवडणूक भाजपसोबत युतीत लढवली खरी, पण भाजपच्या दबावाखाली काम न करण्याच्या इर्षेने त्यांनी या मित्रपक्षाची ३० वर्षांपासूनची युती तोडून काँग्रेस- राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत आघाडीचे सरकार आणण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंचे नाव देशभर पोहोचले. भाजपला अंगावर घेणारा नेता म्हणून त्यांची भाजपविरोधी गटात ख्याती झाली. तिन्ही पक्षांना सांभाळून घेत ठाकरेंनी सरकार चालवायला सुरुवात केली खरी पण मध्येच दोन वर्षे कोरोनाचे संकट आल्याने त्यांच्या कामगिरीसमोर मर्यादा आल्या. तरीही कोरोना काळातही उत्तम कामगिरी केल्याची शाबासकी ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाली. पण २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र एक- एक शिलेदार ठाकरेंना सोडून गेले व ते एकाकी पडले.

एकीकडे तब्येच्या तक्रारी व दुसरीकडे ढासळलेल्या पक्षाची पुनर्बांधणी ही आव्हाने त्यांच्यासमोर होती. पण जराही खचून न जाता ठाकरेंनी राज्यभर फिरुन पुन्हा शिवसेनेची बांधणी करण्याचा प्रयत्न केला. अापल्या पाठीत कसा खंजीर खुपसला गेला हे सांगून त्यांनी जनतेची सहानुभूतीही मिळवली. म्हणजे दोन वर्षांपूर्वी आता हा पक्ष संपला अशा वल्गना करणाऱ्यांना त्यांनी सणसणीत उत्तर दिले. सोबत राहिलेल्या मोजक्याच निष्ठावंतांच्या साथीने नव्याने पक्षबांधणी केली. इतर पक्षातूनही दिग्गज नेते आयात केले. त्यामुळे महाशक्तीशाली भाजपसमोर ठाकरेंचे पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. लोकसभेत त्यांनी भाजपला महाराष्ट्रात जमिनीवर आणले. ठाकरेंच्या पक्षाला फारसा फायदा मिळाला नसला तरी त्यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर रसातळाला गेलेला काँग्रेस पक्ष मात्र भरभरुन वाढला. आता याच काँग्रेसशी विधानसभेच्या जागावाटपावरुन उद्धव ठाकरेंना झगडावे लागत आहे.

या विधानसभेत सर्वाधिक जागा निवडून आणून पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव ठाकरे यांचे ध्येय आहे. प्रसंगी कमी जागा पदरात पडल्या तरी चालतील पण पुन्हा मुख्यमंत्री होऊन भाजपला सणसणीत चपराक देण्याचा त्यांचा मानस आहे. यात शरद पवार त्यांच्या पाठीशी आहेत. पण लोकसभेत चमत्कारिक यश मिळवलेली काँग्रेस मात्र अडथळे आणत आहे. कारण त्यांनाही आपला मुख्यमंत्री बनवायचाय. राहुल गांधी, सोनिया गांधींना महाराष्ट्रात भाजपविरोधी लढणारा खंबीर नेता म्हणून ठाकरेंची साथ हवी आहे. त्यामुळे कदाचित निवडणूक निकालानंतर ते ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाची अट मान्यही करतील. पण जर भाजपप्रमाणे काँग्रेसही ताठर राहिली तर त्यांनाही दूर लाेटण्यास ठाकरे मागेपुढे पाहणार नाहीत. विधानसभेत त्रिशंकू अवस्था निर्माण झालीच तर ठाकरे पुन्हा नव्या समीकरणांची बांधणीही करु शकतात. पण काहीही झाले तरी ते भाजपसोबत जाणार नाहीत, हे तितकेच खरे. पण जर लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महायुतीत सर्वात कमी जागा उद्धव सेनेला जिंकता आल्या तर मात्र ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. युतीचे सरकार आले व शिंदे किंवा फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री बनले तर ठाकरेंचे राहिलेले शिलेदारही त्यांची साथ सोडून सत्तेच्या वळचणीला लावून बसतील.

दुसरे नेतृत्व आहे ते म्हणजे शरद पवार यांचे…

२०१९ मध्ये ठाकरेंना भाजपपासून दूर करण्याच्या रणनितीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची होती. उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यास काँग्रेस नेतृत्वाचे मन वळवण्याचे काम त्यांनी केले म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार तेव्हा अस्तित्वात येऊ शकले. पण वर्षभरापूर्वी भाजपने त्यांच्याही पक्षाला सुरुंग लावला व अजित पवारांना महायुतीत अाणले. २५ वर्षांपूर्वी शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांनी पळवला. पण ८३ वर्षीय पवार त्यामुळे खचून गेले नाहीत. त्यांनी या वयातही निर्धाराने पक्षबांधणी केली. पक्षाचे नवे नाव चिन्ह सोबत घेऊन त्यांनी लेाकसभेत चमकदार कामगिरी करुन दाखवली. पवारांच्या या चमत्काराचा साक्षात्कार झाल्याने अजित पवारांच्या तंबूतील व भाजपच्या तंबूतील काही जुने साथीदार विधानसभेपूर्वी त्यांच्याकडे परत येऊ लागले. त्यामुळे शरद पवारांची ताकद वाढलीय. लोकसभेत अजित पवारांनी पवारांची मुलगी सुप्रियांना बारामतीत आव्हान दिले होते. पण तिथे अजितदादांच्या पत्नीला हरवून पवारांनी बारामतीत अजूनही आपलाच शब्द प्रमाण मानला जातो हे सिद्ध करुन दाखवले. त्यामुळे अजितदादाही हारदले आहेत. आता बारामतीकरांसमोर सातव्यांना आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे जाताना पवारांनी अजितदादांसमोर त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्रला उभे केले आहे.

उमेदवार युगेंद्र असले तरी खरी लढाई शरद पवार व अजित पवारांचीच आहे. ज्या अजित पवारांनी २०१९ मध्ये दीड लाखांच्या मताधिक्याने आमदारकी जिंकली तिथेच नुकत्याच झालेल्या लोकसभेत त्यांच्या पत्नीपेक्षा सुप्रियांना ४८ हजार मते जास्त पडली. हे मताधिक्य विधानसभेतही कायम राखण्याचे शरद पवारांसमोर आव्हान आहे. जर बारामती जिंकून राज्यातही ६०-७० आमदार निवडून आणण्याचे कसब पवारांनी दाखवले तर ते पुन्हा किंगमेकर होऊ शकतात. आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे स्थान पुन्हा महत्त्वाचे राहिल. पण जर पवारांची आमदार संख्या ४० पर्यंत घसरली व आघाडीचे सरकारही येऊ शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली तरी पवार दुसरा डाव खेळून स्वत:चे महत्त्व सिद्ध करु शकतात. यापूर्वी २०१४ व २०१९ मध्येही त्यांनी भाजपशी हातमिळवणीचा प्रयत्न केला होताच. त्यामुळे सत्ता कुणाचीही येवो पवार स्वत:चे महत्त्व मात्र कमी होऊ देणार नाहीत. पण जर महायुतीतील तिन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले तर मात्र पवारांच्या नेतृत्वाला ओहेाटी लागू शकते.

आघाडीतील तिसरा पक्ष आहे काँग्रेस, या पक्षात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नेतृत्व आक्रमक आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेवरुन काँग्रेसची खासदार संख्या १ वरुन १३ पर्यंत वाढली. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणूनही ते समोर आले. याचे श्रेय अर्थात प्रदेशाध्यक्ष म्हणून नानांनाच जाते. पण विधानसभेला मित्रपक्षांशी जुळवून घेण्यात ते अपयशी ठरत आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी टोकाचा वाद घातल्यामुळे काँग्रेसचा हातातोंडाशी आलेले घात हिरावला जात असल्याचे चित्र आहे. म्हणूनच तर हायकमांडने बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला या तडजोडीच्या चर्चेत उतरवले व त्याचा फायदाही होऊ लागला आहे. उद्या काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले व महाविकास आघाडीची सत्ता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र मुख्यमंत्रिपदासाठी पटोले की थोरात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

काँग्रेस हायकमांड निष्ठावंतांच्या बाजूने म्हणजे थोरातांच्या बाजूने झुकते माप टाकू शकते. पण नानांसारखा आक्रमक नेताही त्यांना हवाच आहे. त्यामुळे नानांनाही महत्त्वाचे पद दिले जाईल.पण पुन्हा महायुतीचेच सरकार आले तर नाना अपयशाचे खापर स्वपक्षीयांसोबत ठाकरेंवर फोडतील. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. बाळासाहेब थोरात मात्र पक्षाची सत्ता आली अन‌् नाही आली तरी काँग्रेसशी निष्ठा कायम राखतील. म्हणूनच सर्वांशी जुळवून घेणाऱ्या थोरातांच्या नेतृत्वाला पक्षात अच्छे दिन येतील यात शंकाच नाही.