विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन मित्रपक्षांमध्ये आधी मुख्यमंत्रिपदासाठी लढाई सुरु झाली. त्यावर तोडगा निघाल्यानंतर मग मंत्रिमंडळ विस्ताराची चढाओढ सुरु झाली. त्यावर तोडगा निघाला तरी रुसवे फुगवे अजूनही धगधगत अाहेत. नंतर तिसरी लढाई नुकतीच संपली ती म्हणजे खातेवाटपाची. यातही नाराजीनाट्य सुरु अाहेच. यापाठोपाठ आता पालकमंत्रीपदाची रस्सीखेच सुरु होईल. दोन- चार दिवसांत त्याचाही फैसला होईल, पण कमी महत्त्वाची खाती मिळालेले मंत्री आता किमान मोठ्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंगच्या प्रयत्नात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये दोन वेगवेगळ्या पक्षांचे मंत्री असल्याने संबंधित जिल्ह्याचे पालकत्व मिळवण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु अाहे, त्याबद्दल माहिती करुन घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून
पालकमंत्रिपद वाटपाची प्रक्रिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी जिकरीचे..!
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप हे दोन टप्पे नुकतेच पार पडलेत. हे निर्विघ्न पार पडलेत असे म्हणता येणार नाही, कारण काही ज्येष्ठ नेते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज अाहेत तर काही मंत्री मनासारखे खाते न मिळाल्याने दु:खी अाहेत. पण आता पालकमंत्रिपद वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणेही मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी तेवढीच जिकरीची झाली आहे. याचे कारण म्हणजे राज्यातील ३६ पैकी किमान निम्म्या जिल्ह्यांना स्वत:च्या भागातील मंत्री मिळालेला नाही. त्यामुळे या भागात बाहेरचा पालकमंत्र येणार हे स्पष्टच झालेले आहे. पण कोणता जिल्हा कुणाला द्यायचा? यावरुन महायुतीत आधीच शितयुद्ध असल्याने खातेवाटपाच्या वेळीच पालकमंत्रिपद जाहीर करणे मुख्यमंत्र्यांना शक्य झालेले नाही. पालकमंत्रिपदाच्या वादाची सुरुवात पुण्यापासून होते. जुलै २०२२ मध्ये शिंदे सरकार सत्तारुढ झाले तेव्हा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. पण वर्षभराने अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा त्यांनी भाजपकडील अर्थ मंत्रालय व पुण्याचे पालकमंत्रिपद आपल्याकडे खेचून घेतले.
चंद्रकांत पाटलांचा पुण्यावर दावा?
आताही अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील यात शंकाच नाही, पण भाजपचे काही नेते व स्वत: चंद्रकांत पाटील पुण्यावर दावा करत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वाद उद्भवू शकतो. कोकणातील रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिंदेसेनेचे भरत गोगावले या दोघांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली आहे. शिंदे सरकारमध्येेही गोगावले यांचा मंत्रिपदावर दावा होता. प्रत्येक वेळी ते मी मंत्री झालो की रायगडचा पालकमंत्रीही होणार असे दावे करायचे. आधीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही अनेकदा त्याचा पुनरुच्चार करायचे. पण वर्षभरापूर्वी अजित पवार सत्तेत आले व त्यांच्या पक्षाच्या आमदार व सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरेंकडे रायगडचे पालकमंत्रिपद गेले. त्यामुळे गोगावले नाराज आहेत.
शिंदेसेनेचा हा जिल्हा असताना राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद कसे काय दिले? हा त्यांचा प्रश्न होता. आता तर स्वत: गाेगावलेच मंत्री झाले आहेत त्यामुळे रायगडचे पालकत्वही आपल्यालाच हवे असा त्यांचा हट्ट आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या गोगावले यांना त्यांच्या मनासारखे परिवहन मंत्रालय तर मिळाले नाही किमान रायगडचे पालकमंत्रिपद तरी मिळावे यासाठी त्यांचा हट्ट सुरु झाला आहे. शिंदे सरकारमध्ये रविंद्र चव्हाण यांच्याकडे सिंधुदूर्ग आणि पालघर पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. मात्र आता सिंधुदुर्गची जबाबदारी नितेश राणे यांना मिळू शकते.
पकंजा मुंडेंना बीडची जबाबदारी मिळणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी साताऱ्याचे शंभुराज देसाई यांच्याकडे होती. आता शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे सहाजिकच त्यांच्याकडे ठाण्याचे पालकमंत्रिपद येऊ शकते. पण भाजपचे गणेश नाईक हेही या स्पर्धेत आहेत. नाईकांना वन हे दुय्यम खाते मिळाले अाहे, त्याची भरपाई ठाणे पालकमंत्रिपद देऊन करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. पण एकनाथ शिंदे ठाणे सोडणार नाहीत, त्यामुळे गणेश नाईकांना नाराजी पत्कारावी लागू शकते. बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे भाऊ बहिण मंत्री झाले आहेत. २०१४ मध्ये भाजपच्या सत्तेत पंकजा यांच्याकडे पालकमंत्रिपद होते तर ठाकरे व शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रिपद होते. आता धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे पालकत्व राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण मस्साजोगचे संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय वादात अडकले आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद राहते की नाही याविषयी शंका आहे. त्यामुळे कदाचित पंकजा यांना बीडची जबाबदारी दिली जाऊ शकते. काहीही झाले तरी पालकमंत्रिपद एकाच घरात राहणार असल्याने या दोघांत तसे फारसे वाद होणार नाहीत. पण कालपर्यंत वेगवेगळ्या पक्षात राहणारे त्यांचे समर्थकांमध्ये मात्र वर्चस्वाची लढाई पाहायला मिळू शकते.
राजधानी मुंबईचे पालकत्व कुणाकडे?
कोल्हापूर जिल्हयातून हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबीटकर यांना मंत्रीपदी संधी मिळाल्याने पालकमंत्रीपदासाठी मुश्रीफ आणि आबीटकर यांच्यात स्पर्धा लागली आहे. शिंदे सरकारच्या काळात मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदार होती. सातारा जिल्ह्यातही शंभुराजे देसाई, छत्रपती शिवेंद्र राजेभोसले, मकरंद पाटील व जयकुमार गोरे हे चार चार मंत्री आहेत. शिंदे सरकारमध्ये शंभुराजे पालकमंत्री होते, पण आता छत्रपतींचे वंशज म्हणून शिवेंद्र राजे भोसले यांचा दावा आहे. त्यामुळे इथले पालकमंत्रिपद ठरवताना मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना कस लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजधानी मुंबईचे पालकत्व कुणाकडे जाणार? शिंदे सरकारमध्ये भाजपकडून मंगलप्रभात लोढा व शिंदेसेनेकडून दीपक केसरकर यांच्याकडे अनुक्रमेक शहर व उपविभागाचे पालकमंत्रिपद होते. आता यंदा लोढा मंत्रिमंडळात कायम आहेत पण केसरकर नाहीत. त्यामुळे फडणवीस लोढा यांना पुन्हा संधी देतात की आशिष शेलार यांच्याकडे हे पद सोपवतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर एकनाथ शिंदे हे केसरकर यांच्याजागी प्रताप सरनाईक किंवा भरतसेठ गोगावले यांची वर्णी लावू शकतात. सरनाईकांना ठाणे किंवा गोगावलेंना रायगडचे पद मिळाले तर त्यांचे मुंबईत पुनर्वसन केले जाऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरचे पालकत्व त्यांचे निकटवर्तीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालिन उर्जा मंत्री असलेल्या बावनकुळे यांच्याकडे नागपूरचे पालकत्व होते, त्याची पुनरावृत्ती आता होण्याची शक्यता अाहे.