मराठ्यांच्या सगे- सोयऱ्यांचे आरक्षण कायद्याने टिकणार नाही : भुजबळ
मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला सग्या-सोयऱ्यांसह ओबीसी आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या पातळीवर टिकणारा नाही, असे परखड मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bujbal) यांनी व्यक्त केले.
सरसकट सर्वच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या निर्णयाला भुजबळांचा तीव्र विरोध आहे. आपल्याच सरकारवर टीका करताना भुजबळ म्हणाले, ‘आजच्या निर्णयाने मराठा समाजाच्या लढ्याचा विजय झाला असे मला तरी वाटत नाही. कारण आता ८० टक्के समाज हा ओबीसी आरक्षणात येईल. त्यामुळे मराठ्यांना इडब्ल्यूएसमधून (EWS Reservation) आरक्षण मिळणार नाही. खुल्या प्रवर्गातून जे ४० टक्के आरक्षण मिळत होते तीही संधी मिळणार नाही. केवळ शपथपत्र दिले म्हणजे जात मिळवता येत नाही. जात ही जन्माने येते, बॉन्डपेपरवर मिळत नाही.
सरकारने काढलेला आदेश हा जीआर किंवा अध्यादेश नाही. तो एक मसुद आहे. त्यावर १६ फेब्रुवारपर्यंत आक्षेप, हरकती नोंदवता येतील. ओबीसी संघटना, कायदेतज्ञांनी अभ्यास करुन या मसुद्यावर हरकती नोंदवाव्यात. आम्ही कोर्टातही त्याला आव्हान देऊ. ( Bhujbal will go to court on Maratha Reservation) उद्या अजून कुणी लाखो लोक घेऊन मोर्चा काढला तर तुम्ही त्यांनाही आरक्षण देणार का? असा प्रश्न भुजबळांना मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.
सदावर्ते म्हणाले, सोमवारपर्यंत वाट पाहा
अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratn Sadawarte) यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. हा निर्णय कायद्याच्या पातळीवर टिकणारा नाही. आता तुम्ही सोमवारपर्यंत वाट पाहा, असे सूचक वक्तव्य करुन त्यांनी पुन्ह कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १६ टक्के आरक्षणाला सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आव्हान दिल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हे आरक्षण रद्दबातल केले होते.
जरांगे लढ्यात जिंकले, तहात हरले : राठोड
माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या मावळ्यांनी बारा बलुतेदार, वंचित बहुजन यांच्या ताट्यातील भाकरीमध्ये वाटेकरी होऊन कुठला न्याय मिळवला आहे? जरांगे लढ्यात जिंकले असले तरी तहात मात्र हरले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाचा धक्का लावणार नाही असे म्हणणाऱ्या सरकारने ओबीसींना भूकंपाचे धक्के दिले आहेत. छगन भुजबळ (Chagan Bhujbal), प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी संघटनांच्या लढाईला मात्र अपयश आले आहे.’