मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लाखो मराठा बांधवांचा जनसागर घेऊन आंतरवली सराटी (जि. जालना) येथून निघालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) २५ जानेवारी रोजी रात्री उशिरा नवी मुंबईजवळील वाशी बाजार समितीच्या मैदानावर पोहोचले. तिथे मराठा बांधवांच्या
वतीने त्यांनी मुक्कामाची सोय करण्यात आली होती. २६ जानेवारी रोजी वाशीहून पायी मोर्चा काढून लाखो आंदोलकांसह आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा जरांगेंनी केली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना मुंबईबाहेरच रोखण्याची रणनिती आखली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे तसेच हायकोर्टाच्या आदेशाचे कारण देत आझाद मैदानावर उपोषण करण्याची परवानागीही जरांगे पाटलांना नाकारली आहे. (Police denied permission to Azad Maidan).
उपोषण आझाद मैदानावरच होणार : जरांगे
दुसरीकडे, जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मात्र आझाद मैदानावरच उपोषणास बसणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे २६ जानेवारी रोजी मुंबईच्या वेशीवर पोलिस व मराठा आंदोलक यांच्यात संघर्ष (Police and Maratha protestors will be in conflict) पेटण्याची शक्यता आहे.
सरकारला धडकी आंदोलनाची
२० जानेवारीपासून आंतरवली सराटी येथून लाखो मराठा बांधवांना घेऊन जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. बीड, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करत ते नवी मुंबईच्या जवळ पोहोचले आहेत. ज्या जिल्ह्यातून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुढे जात आहेत तिथे त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. तेथूनच हजारोंच्या संख्येने आणखी आंदोलक त्यांच्या मोर्चात सहभागी होत आहेत. मुंबईत मोर्चा पोहोचेल तेव्हा ही संख्या ३ कोटींवर जाईल, असा जरांगे पाटलांचा दावा आहे. ठिकठिकाणी जरांगे पाटलांच्या मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहून सरकार व पोलिसांच्या उरात धडकी भरली आहे.
पोलिसांनी बजावली नोटीस
२५ जानेवारी रोजी जरांगे पाटील लोणावळ्यात होते. तिथे पोलिसांनी त्यांना एक नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे रोज ६० ते ६५ लाख लोक नोकरीच्या निमित्ताने प्रवास करत असतात. मराठा समाजाचे आंदोलनात लाखो लोक येणार असल्याचे तुम्ही (जरांगेंनी) जाहीर केले आहे. २६ जानेवारी रोजी एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत आल्यास या राजधानीची वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावरील केवळ ७ हजार चौरस मीटर जागाच आंदोलनासाठी वापरता येईल, असे न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. एवढ्या जागेत फक्त ५ ते ६ हजार लोकच बसू शकतात. मात्र तुमच्यासोबत लाखोंच्या संख्येने आंदोलक असल्यामुळे त्यांची व्यवस्था इथे होऊ शकत नाही. तसेच त्याप्रमाणात सोयी- सुविधाही देता येणार नाहीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खारघरच्या इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कच्या मैदानावर उपोषणाला बसावे, असे पोलिसांनी मराठा संघटनेच्या समन्वयकांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.
हायकोर्टाची ढाल केली पुढे
मनोज जरांगेंनी सरकारचे आवाहन यापूर्वीच धुडकावून लावले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांना रोखण्यासाठी हायकोर्टाच्या (Mumbai High court) आदेशाची ढाल पुढे केली आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांच्या याचिककेवर सुनावणी करताना हायकोर्टाने मुंबईतील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवली होती. तसेच आंदोलनासाठी योग्य जागा सूचवण्याचेही सांगितले होते. तोच संदर्भ देत पोलिसांनी मुंबईबाहेरची म्हणजेच खारघरच्या जागेचा पर्याय जरांगेना नोटिसीतून सूचवला आहे. तसेच या मैदानासाठी प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी. आंदोलनकर्त्यांनी या निर्देशांचे पालन केले नाही तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असा इशाराही नोटिसीत दिला आहे.