मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारीला मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांसह करणार मुंबईकडे कूच

जालना :  सर्वच मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षणाच्या (Maratha Reservation in obc) मागणीसाठी गेली ८ महिन्यांपासून तीव्र लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी आता मुंबईकडे कूच करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २० जानेवारी रोजी आंतरवली सराटी (जि. जालना) (Antarwali sarati) येथून मोठ्या संख्येने मराठा बांधव निघतील. मजल दरमजल करत २६ जानेवारी रोजी लाखो आंदोलक मुंबईत (Mumbai) धडकतील व आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.

आंतरवली ते मुंबई या मोर्चाचा कार्यक्रम मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी १५ जानेवारी रोजी जाहीर केला. ते म्हणाले, ’२० जानेवारी रोजी आंतरवलीतून मोर्चा निघेल. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील मातोरी (ता. शिरुर) येथे होईल. २१ जानेवारीला करंजी घाट, बाराबाभळी (जि. नगर) येथे दुसरा मुक्काम असेल. २२ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे तिसरा मुक्काम असेल. २३ जानेवारी रोजी पुण्यातील खराडी बायपासजवळ तर २४ जानेवारी रोजी लोणावळ्यात मुक्काम होईल. २५ जानेवारी रोजी नवी मुंबईतील वाशीच्या मैदानावर मुक्काम केला जाईल. २६ जानेवारी रोजी वाशी किंवा चेंबूर येथून पायी निघून आझाद मैदानावर पोहोचणार आहोत. तिथे आमरण उपोषण सुरु केले जाईल, असा कार्यक्रम मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी जाहीर केला.

रोज दुपारी १२ पर्यंतच पायी चालणार

मनोज जरांगे म्हणाले, ‘दररोज सकाळी ९ किंवा १० वाजता मुक्काम स्थळापासून पायी मोर्चा पुढे निघेल. दुपारी १२ पर्यंतच आपण चालणार आहोत. त्यानंतर आपल्यासोबतच्या वाहनात बसून पुढचा रस्ता पार केला जाईल. दुपारचे जेवण रस्त्यातील गावांमध्ये केले जाईल. ठिकठिकाणच्या गावकऱ्यांनी मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र जिथे व्यवस्था होणार नाही तिथे आपल्यासोबतचे धान्य, पिठ याद्वारे आपल्याला सोय करायची आहे. पायी चालूनच मुंबई गाठली तर ५०० किमी जायला एक- दीड महिना लागेल, तेवढा वेळ आम्ही सरकारला देणार नाहीत. लोकही थकून जातील. त्यांना मुंबईत आंदोलनासाठी शक्ती राहणार नाही. आजारी पडले तर अॅडमिट करावे लागेल. म्हणून फक्त दुपारी १२ पर्यंतच पायी चालायचे व नंतर वाहनाने पुढचा मार्ग पूर्ण करायचा, असे आमचे ठरले आहे.’

आंदोलकांना सूचना

आपल्यासोबत लाखो, कोट्यवधी आंदोलक (Mumbai maratha Morcha) या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपली व आपल्या सोबतच्या लोकांच्या सुरक्षेची काळजी घ्यायची आहे. कुणीही व्यसन करुन मोर्चात सहभागी होऊ नये. आंदोलनाला गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला ताबडतोब पोलिसाच्या स्वाधीन करा. आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू सोबत ठेवा. मुंबईत आपल्या किती दिवस आंदोलन करावे लागेल, ते सांगता येत नाही. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी चला. आता आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार मनोज जरांगे (Manoj jarange patil) यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला या

पुण्यापासून मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. तेथूनच ही संख्या लाखातून कोटीत जाईल. मात्र ज्यांना मोर्चात सहभागी व्हायला जमणार नाही त्यांनी आपापल्या जिल्ह्यात मुक्कामाच्या स्थळापर्यंत तरी निरोप द्यायला यावे. आंतरवलीतही पहिल्या दिवशी माय-माऊलींनी मोठ्या संख्येने आम्हाला निरोप द्यायला यावे, असे आवाहन जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics