December 26, 2024

शरद पवारांची आता मारकडवाडीत ठिणगी

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करत सोलापूर जिल्हयातील मारकडवाडी या छोट्याशा गावाने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला आव्हान देत मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा प्रयोग आखला होता, पण प्रशासनाने बळाचा वापर करुन तो उधळून लावला. प्रशासकीय दडपशाहीपुढे ग्रामस्थ हरले. पण या ग्रामस्थांच्या लढ्याला बळ देण्यासाठी आता शरद पवार या गावात आले होते. त्यांच्यापाठोपाठ राहुल गांधीही येणार असल्याची चर्चा आहे. एकूणच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरु असलेल्या आंतरवली सराटीत शरद पवार जाऊन आल्यानंतर तशी आंदोलनाची ठिणगीचे वणव्यात रुपांतर झाले तशीच व्यूहरचना मारकडवाडीतील आंदोलनातून आखली जात आहे का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

आंतरवली सराटीसारखीच ठिणगी पडू शकते का? Markadwadi Update

सुमारे वर्षभरापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर सरकारविराेधात आक्रोश असताना जालना जिल्हयातील आंतरवली सराटी या छोट्याशा गावात मनोज जरांगे पाटील नावाचा एक युवक आमरण उपोषणाला बसला होता. वडीगोद्रीच्या महामार्गावर रास्ता रोको करुन जरांगे यांच्यासह शेकडो मराठा बांधवांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तिथे या आंदाेलकांवर लाठीमार करुन प्रकरण अधिकच चिघळवले. या लाठीमारात अनेक आंदोलकांचे डोके फुटले, यात काही महिलांचाही समावेश होता. तर पोलिसांच्या मते, आंदोलकांनीच आमच्यावर हल्ला चढवला. आता काय खरे काय खोटे ते चौकशीतून समोर येईलच. पण राजकीय सोयीसाठी सरकारने चौकशीही दडपून टाकलीय. मात्र त्यावेळी शरद पवारांनी आंतरवली सराटी या गावात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील व इतर आंदोलकांची भेट घेतली. तेव्हापासून राज्यात मराठा आंदोलन आणखी तीव्र झाले, त्याचा फटका भाजपला लोकसभेत बसला, असे मानले जाते.

आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. या पराभवातून आपल्या पक्षाला व महाविकास आघाडीला बाहेर काढण्यासाठी व भाजपविरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देण्याची गरज शरद पवार यांना वाटतेय. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यासाठी गावकऱ्यांनी सुरु केलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी दस्तुरखुद्द पवार या छोट्याशा गावात गेले होते. त्यांच्या भेटीने ईव्हीएमविरोधातील या गावची लढाईत आता मोठा बळ मिळाले असून मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाचे अभियान सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर शरद पवारांनी आंतरवली सराटीप्रमाणे मारकडवाडी या छोट्याशा गावात जाऊन पेटवलेल्या ठिणगीने वणवा पेटण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता जास्त दिसत आहे.

अन् गावकऱ्यांनी गुंडाळला मॉक व्होटिंगचा प्रयोग..

रविवारी शरद पवार यांनी या गावात जाऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील हे ३ हजार लोकवस्तीचे गाव. शरद पवार समर्थक आमदार उत्तमराव जानकर इथून निवडून आलेत. पण राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे जो राज्यभर सफाया झाला व महायुतीला जर भरभरुन यश मिळाले त्याविषयी शंका व्यक्त होत असताना या गावानेही आमच्याकडून उत्तम जानकरांना जेवढे मतदान झाले त्यापेक्षा जास्त मतदान भाजपच्या उमेदवाराच्या पारड्यात कसे पडले? असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यामुळे या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या मदतीने गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेऊन भाजपला किंवा व राष्ट्रवादीच्या बाजूने किती मतदान आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हेाता. पण निवडणूक प्रक्रियेत या चाचणी मतदानाला कुठलाही थारा नाही, असे सांगत निवडणूक अधिकारी व प्रशासनाने गावकऱ्यांचा हा डाव उधळून लावला. गावात जमावबंदी लावली. काही गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करुन यापुढे असे धाडस कुणी करणार नाही, याची खबरदारीही घेतली. त्यामुळे गावकऱ्यांना आपला मॉक व्होटिंगचा प्रयोग गुंडाळून ठेवावा लागला. मात्र आता शरद पवार यांनी या गावात भेट देऊन गावकऱ्यांचे मनोबल वाढवले आहे.

जानकर आणि सातपुतेंच्या समर्थकांमध्ये राडा..!

अशी दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी गावकऱ्यांनी पवारांच्या उपस्थितीत एक लाँग मार्चही काढला. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे. आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ. हे कशासाठी? तर निवडणूक यंत्रणांचा काळ सोकू नये म्हणून आपल्याला हा लढा द्यायचा आहे.’ शरद पवार या गावात येणार असल्याचे कळताच भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनीही या गावात उपहासत्मक होर्डिंगबाजी करुन शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या फलकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो लावले होते. हे फलक हटवण्याच्या कारणावरुन उत्तमराव जानकर व सातपुते समर्थकांमध्ये राडाही झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन प्रकरण मिटवले.

‘आय लव्ह मारकडवाडी’चे बोर्डही झळकले…

एकूणच, मारकडवाडी गावातील चाचणी मतदानावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. सत्ताधारीही यात उतरले आहेत, तो संदर्भ घेऊन पवार म्हणाले, ‘जोपर्यंत गावकऱ्यांच्या मनातील शंकांचे निरसन होणार नाही ताेपर्यंत आम्ही हा विषय लावून धरु. मुख्यमंत्र्यांनीही या गावात येऊन गावकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते एेकून घ्यावे. त्यात वावगं ते काय? लोकांच्या मनात निवडणूक आयोगाविषयी संशय व्यक्त होत आहे, त्याचे निराकारण केले पाहिजे.’ दरम्यान, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनीही मारकडवाडीचा आदर्श घेऊन गावागावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांच्यानंतर राहुल गांधीही या गावात येऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेणार असल्याचे सांगितले जाते. विधिमंडळ अधिवेशनात ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करुन विरोधकांनी गदारोळ घातला. त्यावेळीही ‘आय लव्ह मारकडवाडी’ असे बोर्ड त्यांनी झळकवले होते. एकूणच या मुद्द्यावरुन या छोट्याशा गावाचे नाव देशपातळीवर झळकले आहे. आणि सरकारविरोधी व ईव्हीएमविरोधी आंदोलनाची ठिणगी याच छोट्याशा गावातून पेटवण्याचे काम शरद पवारांनी सुरु केलेले दिसतेय. बघूया आता त्याचा वणवा कुठपर्यंत पेटतोय ते..