अजितदादांना भाजपचे बळ, एकनाथ शिंदेंची खळखळ

राज्यातील फडणवीस सरकारला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात सरकारने भरीव कुठले काम केले किंवा एखादा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असे नाही. मात्र हा काळ राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन व महायुतीतील विसंवादावरुन प्रचंड गाजला. विरोधकांची संख्या तोकडी असल्याने ते सरकारला फारसे कोंडीत पकडू शकले नाहीत, पण सत्ताऱ्यांमधील धुसूफूस काही लपून राहिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका बाजूला व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला अशी दुफळी सरकारमध्ये दिसतेय. अलिकडेच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी पवार व फडणवीस यांच्याबाबत चर्चा केल्याची बातमी बाहेर आली अन‌् या सरकारमधील विसंवादाचे वातावरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. मिशन पॉलिटिक्समधून जाणून घेऊ या कशी होतेय एकनाथ शिंदे यांची या सरकारमध्ये कोंडी… अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजप शिंदेंचे खच्चीकरण करतेय का?

तेव्हा मात्र शिंदे म्हणतील ती पूर्व दिशा…

गेल्या दोन टर्मपासून राज्यात महायुतीचे सरकार आले. पण मागच्या व सध्याच्या सरकारमध्ये फार मोठा बदल दिसून येते आहे. दोन्ही सरकार भाजपच्या नेतृत्वातच कार्यरत आहेत, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजप बचावात्मक पवित्रा घेऊन मैदानात होती. त्यावेळी शिंदे म्हणतील ती पूर्वदिशा होती. शिंदेंच्या निर्णयाला भाजपमधून फारसा विरोध करण्याची धमक कुणी दाखवत नव्हते. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजप निर्णायक स्थितीत आहे. दोन्ही मित्रपक्षांचा तसूभरही दबाव न घेता फडणवीस काम करत आहेत. उलट एकनाथ शिंदेंना फारशी किंमत न घेता तिसऱ्या क्रमांकावरील अजित पवार गटाला जवळ करुन भाजपने महायुतीतील मित्रपक्षांमध्ये आपला व परका अशी भावना निर्माण केली आहे. एक तर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे नाराज आहेत. त्यातही गृहमंत्रालयाचाही त्यांचा हट्ट फडणवीसांनी पूर्ण केला नाही. तरीही उपमुख्यमंत्रिपदावर बोळवण झाली तरी नाईलाजाने का होईना शिंदे मिळेल त्यावर समाधान मानताना दिसत आहेत. पण एवढ्यावरच त्यांचा त्रास थांबलेला नाही. भाजपकडून शिंदेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवशीपासून सुरु आहेत. सध्या फडणवीस व अजित पवार यांच्यात चांगलेच गूळपीठ निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदेंना फारसे महत्त्व न देता पवारांशी जवळीक वाढवून सरकारचा कारभार चालवण्यावर फडणवीस यांचा भर दिसतोय.

नाशिक व रायगड पालकमंत्रीपदाचा वाद कायम…

अजित पवार हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्नही भाजपाकडून होत आहे. शिंदे यांच्या नगरविकास मंत्रालयासह शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातील खर्चाला चाप लावण्याचे काम अजित पवार करताना दिसतात. सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देऊन ते शिंदेसेनेच्या खात्याचा निधी कपात करत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर, शिंदेसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री अाहेत. त्यांच्या खात्याने घेतलेले काही निर्णय फडणवीस यांनी रद्द करायला लावले. या खात्यांतर्गत असलेल्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री असतात, असा अलिखित नियम आहे. पण फडणवीस यांनी तिथे आयएएस अधिकाऱ्याची वर्णी लावून सरदेसाइंना या पदापासून दूर ठेवले. नंतर शिंदेसेनेने दबाव वाढवल्यावर मात्र सरदेसाईंकडे अध्यक्षपद देण्यात आले. तसाच प्रश्न रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा. तीन महिने झाले तरी अद्याप हा वाद मुख्यमंत्री सोडवू शकले नाहीत. पहिल्या यादीत नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची निवड झाली होती. या देान्ही ठिकाणी शिंदेसेनेचा दावा होता. वाद विकोपाला गेल्यावर तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही पदांना स्थगिती दिली, पण अजूनही या जागी नवीन नियुक्त्या झालेल्या नाहीत.

शिंदेंनी अमित शाहांकडे मांडले गाऱ्हाणे..?

शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यातही मुख्यमंत्री कार्यालय व अर्थखात्याचा हस्तक्षेप वाढला असल्याच्या तक्रारी आहेत. शिंदे समर्थक ठेकेदारांची कोट्यवधींची बिले अजित पवारांच्या अर्थखात्याने थांबवली आहेत. अशा एक ना अनेक रितीने फडणवीस व अजित पवारांकडून शिंदे यांची कोंडी होत आहे. आता राज्यात स्पष्ट बहुमताचे सरकार असल्याने शिंदेंच्या उपद्रवाची भाजपला जराही चिंता नाही त्यामुळे शिंदेसेने महत्त्व कमी करण्याचे उद्योग केले जात असल्याची भावना शिंदेसेनेचे नेते व कार्यकर्त्यांत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शाह नुकतेच रायगडावर येऊन गेले. तेथून मुंबईत आले. काही वेळाने ते दिल्लीत जाणार होते. ते काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री नागपुरात व अजित पवार बारामतीत गेले होते. ही संधी साधून एकनाथ शिंदे यांनी आपल्याच सरकारमध्ये आमची कशी कोंडी सुरू अाहे, याबाबत अमित शाह यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्याची माहिती आहे. मात्र अमित शाह यांनीही शिंदे यांच्या तक्रारीकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. तिघे मिळून समन्वयाने काम करा, एवढा संदेश शाह यांनी शिंदे यांना दिल्याचे बोलले जाते. यावरुन आता शाह यांच्याकडे तक्रार करुनही काही उपयोग नाही, हे शिंदे यांना कळून चुकले आहे.

चंद्रकांत पाटलांचा शिंदेंच्या नाराजीला दुजोरा..?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मात्र आपण अमित शाह यांच्याकडे कोणतीही तक्रार नसल्याचे माध्यमांना सांगितले. शिंदे म्हणाले, “महायुतीत धुसफूस नाही तर सारे काही खूश खूश आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत आणि काम करणारे लोक तक्रारींचे रडगाणे गात नाहीत. काय असेल ते बसून चर्चेतून सगळे सुटेल’ असे सांगून शिंदे यांनी जास्त बोलणे टाळले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल, तर ते शाह यांच्याकडे तक्रार करतील, अस वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील. आमचे संबंध तेवढे चांगले आहेत’, असे सांगून पवारांनी शिंदे नाराज नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नेते, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या बोलण्यातून मात्र शिंदेंच्या मनात भाजपविषयी खळखळ असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे. ते म्हणाले की, ‘ एका रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात तिथेही भांड्याला भांडं लागतं. सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत.

महायुती सरकारमध्ये शिंदेंची कोंडी कायमच..?

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. आणि अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक जेव्हा एकत्र येतात. अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पहावी लागतील की जिवंत आहेत की गेली आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते व्यक्त होत आहेत. त्यामुळे खळखळ व्यक्त करायची असते जर ती व्यक्त केली नाही तर माणसं आजारी पडतात’ असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या मित्रपक्षात सारे काही आलबेल नसल्याचे एकप्रकार मान्यच केले आहे. एकूणच, महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची दोन्ही बाजूंनी कोंडी केली जातेय हे आता लपून राहिलेले नाही. भाजपकडे अाता इतके भक्कम बहुमत आहे की शिंदे असले काय अन‌ नसले काय फडणवीस सरकारला फारसा फरक पडणार नाही. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आता कमी झाली आहे. त्यामुळेच त्यांना दाबण्याचा प्रकार भाजपकडून होताना दिसतो.

शिंदे फडणवीस कॉल्डवॉरमध्ये अजितदादा कोणाच्या बाजूने..?

भाजप मित्रपक्षाचा वापर ‘यूज अॅन्ड थ्रो’ असा करतेय असा आरोप सर्वच राज्यांमध्ये होत आहे. इथे महाराष्ट्रात ठाकरेंच्या हातातून सत्ता हिसकावून भाजपकडे सुपूर्द करण्यात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर भाजप अन्याय करतेय असे चित्र निर्माण होऊ नये म्हणून पाहूण्याच्या काठीने साप मारण्याचा प्रयोग भाजपचे नेते करताना दिसतात. याचाच अर्थ असा की, अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून शिंदेसेनेची कोंडी करण्याचे डावपेच भाजपकडून टाकले जात आहेत. शिंदे- फडणवीस यांच्या कोल्डवॉरमध्ये अजित पवार फडणवीस यांच्या बाजूने आहेत. शिंदे यांचे महत्त्व जेवढे कमी होईल तेवढे राष्ट्रवादीचे सरकारमध्ये महत्त्व वाढेल, हे अजित पवार जाणून आहेत. म्हणूनच या शितयुद्धात ते फडणवीसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. सत्ता हेच साध्य, हे राष्ट्रवादीचे धोरण आहे. शिंदे- फडणवीस यांच्या वादात आपला फायदा कसा करवून घ्यायचा, हे त्यांना चांगलेच माहितीय. पण भाजपचे डावपेच पाहता आज शिंदेसेना जात्यात असली तरी सध्या सुपात असलेली राष्ट्रवादी कधीही जात्यात जाऊ शकते, याचे भान अजित पवारांना ठेवावे लागेल, हेही तितकेच खरे.