मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा खासदारकीसाठी शिंदेसेनेत, मात्र मिळणार नाही लोकसभेची उमेदवारी
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होतील, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे भाकित दोनच दिवसात खरे ठरले. काँग्रेसचे मुंबईतील युवा नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी १४ जानेवारी रोजी सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व लगोलग दुपारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
२००४ व २००९ साली काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेलेले मिलिंद देवरा (Milind Deora) हे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री, गांधी घराण्याचे विश्वासू राहिलेले दिवंगत मुरली देवरा यांचे सुपूत्र आहेत. काँग्रेसने २०१४ व २०१९ मध्येही त्यांनी दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला. आता उद्धव ठाकरेंची (Udhav Thackeray) शिवसेना व काँग्रेसची युती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे या सूत्रानुसार दक्षिण मुंबई मतदारसंघ देवरा (Milind Deora) यांना मिळणे मुश्कील होते. उद्धव सेनेने या जागेवर सुरुवातीपासूनच दावा केला होता. त्यामुळे देवरा आपल्याच पक्षावर नाराज होते. अखेर १० वर्षांपासून रखडलेले खासदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला.
देवरा राज्यसभेवर जाणार
शिवसेना- भाजप युतीत गेल्या १५ वर्षांपासून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. २००९ मध्ये मोहन रावले हे तेथून शिवसेनेचे उमेदवार होते. तर मागील दोन टर्ममध्ये अरविंद सावंत खासदार आहेत. आताही शिवसेना फुटली असली तरी महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येईल त्यामुळे देवरा (Milind Deora) यांनी शिंदेसेनेचा पर्याय निवडल्याचे सांगितले जात होते. मात्र लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या भाजपने आता या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. शिंदेंनाही (Eknath Shinde) नाईलाजाने ‘महाशक्ती’चे हे आदेश पाळावेच लागतील. मग देवरांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण कसे होणार हा प्रश्न होता. त्यावर मध्यम मार्ग असा काढण्यात आला, की आता पुढच्या चार महिन्यात महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. त्यात शिंदेंच्या (Eknath Shinde) कोट्यातून मिलिंद देवरा (Milind Deora) यांची राज्यसभेवर वर्णी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला आहे. या बोलीवरच देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
शिंदेंना काय फायदा?
उद्धव ठाकरेंशी (Udhav Thackeray) बंड करुन एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपद मिळवले. महाशक्तीच्या पाठिंब्यावर शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हही मिळवले. मात्र अजूनही महाराष्ट्रातील जनता शिवसेना ठाकरेंचीच मानते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Udhav Thackeray) मिळणारी सहानुभूती कमी झालेली नाही. विशेषत: मुंबईत शिंदेंपेक्षा (Eknath Shinde) ठाकरेंचे वर्चस्व जास्तच आहे. या परिस्थितीत आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्यासारखा आर्थिकदृष्ट्या सक्षम व चांगला जनसंपर्क असलेला नेता मिळाला आहे. त्याचा या निवडणुकीत निश्चित फायदा होईल, असे शिवसेनेला वाटते.