मोदींच्या रोड शोमध्ये अजित पवार शिंदेंच्या मागे दडल्याने दादा समर्थक नाराज
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी नाशकात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे भव्य ‘रोड शो’ने स्वागत करण्यात आले. जय श्रीरामच्या घोषणा, फुलांचा वर्षाव आणि हजारो मोबाईलधारी युवकांच्या चमकणाऱ्या फ्लॅशने मोदींच्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
या रोड शोसाठी अहमदाबादहून ओपन डेक विशेष बस आणण्यात आली होती. पंतप्रधान मोदींसोबत (Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या वाहनाच्या अग्रभागी उभे राहून नाशिककरांच्या स्वागताचा स्वीकार करत होते, त्यांना अभिवादन करत होते. माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या हे तीन नेतेच झळकत होते. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) मात्र मोदी- शिंदेंच्या मागे उभे होते, त्यामुळे ते फारसे कॅमेऱ्यांच्या नजरेत येत नव्हते. त्यामुळे अजितदादांचे समर्थक मात्र नाराज झाले. सोशल मीडियावर त्याबाबत प्रतिक्रियाही उमटल्या. मात्र मुंबईतील विकास कामांच्या उद्घाटनावेळी अजितदादांना मोदींसमोर भाषणाची संधी देऊन नाशिकमधील नाराजी दूर करण्याचा भाजपने प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.