नाना पटोलेंचा राजीनामा, नवा प्रदेशाध्यक्ष अमित देशमुख की विश्वजित कदम?

लोकसभा निवडणुकीत राज्यात नंबर वन पक्ष बनलेल्या काँग्रेसचा विधानसभेत मोठा पराभव झाला. राज्यात 20 नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्या. संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना त्यांचा मतदारसंघ राखण्यात दमछाक झाली. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतील नाना पटोले अवघ्या 208 मतांनी निवडून आले. या निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तसे पत्र त्यांनी पक्षाध्यक्षांना पाठवले आहे. या राजीनाम्यामागे विधानसभेतील अपयशाबरोबरच काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी व खेचाखेचीचे राजकारण असल्याचेही सांगितले जाते.. आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, राहुल गांधी जुन्या ज्येष्ठ नेत्यालाच पुन्हा पसंती देतील की नवीन तरुण तडफदार नेत्याच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे देतील याविषयी जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

अपयशाचे खापर पटोलेंच्या डोक्यावर…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अनपेक्षित यश मिळाले तेव्हा कुणीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्याचे श्रेय द्यायला तयार नव्हते. हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा किंवा काँग्रेसच्या संघटीत शक्तीचा विजय असल्याचे ज्येष्ठ नेते सांगत होते. पण विधानसभेत जेव्हा हा पक्ष सपाटून आपटला तेव्हा मात्र या अपयशाचे खापर सर्वांनीच प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटाेलेंच्या डोक्यावर फोडायला सुरुवात केली. अनेक मतदारसंघात नाना पटोले व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये कधीही सुर जुळले नाहीत. आपापले गट-तट सांभाळण्यात हा पक्ष बिझी होता, त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनी घेतला. याच अंतर्गत गटबाजीला कंटाळून नाना पटोले यांनी आता प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिला आहे.

काठावरचा विजय नानांच्या जिव्हारी!

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नाना विधानसभा अध्यक्ष होते. मात्र मंत्रिपदाच्या आमिषाने त्यांनी हे अध्यक्षपद सोडले. नंतर पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. प्रदेशाध्यक्ष व मंत्रिपद हे दोन्हीही पटोलेंना दिले जाईल, असे हायकमांडकडून सांगण्यात आले होते. पण त्यांना मंत्रिपद काही मिळाले नाही. उलट नानांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्याची किंमत महाविकास आघाडीला सरकार गमावण्यापर्यंत करावी लागली, असे सांगून पुन्हा नानांच्याच डोक्यावर खापर फोडण्याची अंतर्गत स्पर्धाच काँग्रेसमध्ये लागली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, नाना पटोले सध्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. मी त्यापेक्षा मतदारसंघात राहीन. लोकांची कामं करीन, गावातील शेती पाहीन, अशी त्यांची मनस्थिती असल्याची माहिती नानांच्या निकटवर्तींयांनी दिलीय. विदर्भातील साकोली या नानांचा मतदारसंघ. पण यावेळी त्यांचा आपल्याच मतदारसंघात काठावर म्हणजे अगदी २०८ मतांनी विजय झालाय. त्याची सत्ताधारी व स्वपक्षातील नेतेही खिल्ली उडवत अाहेत. हा काठावरचा विजय नानांच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे आगामी काळात मतदारसंघात अधिक वेळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. स्थानिक कामांचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमात जास्तीत जास्त उपस्थिती राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मतदारसंघासोबतच विदर्भात आपले स्थान अधिक बळकट करण्याचा ते प्रयत्न करतील.

नानांची राहुल गांधी व खरगेंची भेट?

नाना पटोलेंचा राजीनामा सध्या काँग्रेस हायकमांडनी स्विकारलेला नाही. त्यांना पक्षश्रेष्ठींनी पुढील प्रदेशाध्यक्ष निश्चित होईपर्यंत जबाबदारी सांभळण्याचे निर्देश दिले आहेत. नानांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीत पराभवाची जबाबदारी नानांची एकट्याची नसून ती सामूहिक असल्याचं नानांना सांगण्यात आलं, अशी माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत एक खासदारावरून 13 वर गेलो हा विजय सामूहिक होता तसाच हा पराभव देखील सामूहिक आहे, या शब्दांत त्यांना समजावले आहे. पक्षांतर्गत महत्वाकांक्षी नेत्यांनी विरोधकांची भूमिका घेतली आहे आणि त्यांना दिल्लीतील काही नेते समर्थन करताहेत, ही नानांची जुनी तक्रार आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. नागपूरचे पराभूत उमेदवार बंटी शेळके हे ताजे उदाहरण आहे. नाना पटोले वैयक्तिक पातळीवर बंटी शेळके यांना फारसे महत्त्व देत नाहीत. मात्र शेळके यांनी सार्वजनिकपणे प्रदेश अध्यक्षाला उद्देशून ते संघाचे एजंट असल्याचे आरोप केले होते. बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. मात्र, प्रदेश काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी दिल्लीकडून मिळालेली नाही. उलट काँग्रेसमधील नाना पटोले यांच्या विरोधकांतर्फे आपल्या कार्यक्रमात बंटी शेळके यांना मानाचे स्थान देण्यात येत आहे.

बाळासाहेब थोरातांना पु्न्हा संधी?

नाना पटोले यांनी उघडपणे EVM बाबत आमची तक्रार नसून निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराच्या विरोधात आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्याचवेळी रविवारी नागपूरमध्ये काँग्रेसकडून EVM विरोधात आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पोस्टरवर विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासह बंटी शेळके यांचाही फोटो आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याची तक्रार दिल्लीला कुणीही केली तरी त्यावर कित्येक वेळा संबंधित नेत्याचे स्पष्टीकरण मागवण्यात येत नाही, त्याला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही, अशी नानांची तक्रार आहे. महाराष्ट्रातून कोणीही नेता दिल्लीला जाऊन पत्रपरिषद घेतो आणि प्रदेश कमिटीला माहिती नसते, साधी सूचना नसते. हे प्रकार घडू नयेत. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली पाहिजे. त्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर अधिक सुसूत्रता हवी, अशी नानांची मागणी आहे. एकूणच, जर राहुल गांधी यांनी नानांच्या राजीनामा स्वीकारला तर मात्र नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याविषयी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ नेत्याला पुन्हा संधी द्यायची का? यावरही चर्चा सुरु आहे. विदर्भातील विजय वडेट्टीवार हेही संधीच्या शोधात आहेत. मात्र सांगलीतील विश्वजित कदम किंवा लातूरचे अमित देशमुख यांच्यासारख्या तरुण नेत्याच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकण्यात राहुल गांधी यांची जास्त पसंती असेल, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते.