December 26, 2024

नाशिकच्या पालकत्वाचा कुंभ हाती घेण्याची स्पर्धा

छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसेपैकी कोण?

राज्यात भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आले. आता मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील तिन्ही पक्षांना किती पदे मिळतात, कोणकोणती खाते मिळतात यावर मोठ्या प्रमाणावर खल सुरू आहे. यासोबतच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणाला मिळणार? याबाबतही चर्चा सुुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असा आहे ज्याचे पालकमंत्रिपद यावेळी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या जिल्ह्याचे नाव आहे नाशिक. याचे कारण म्हणजे २०२७ या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. या निमित्ताने केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर विकासनिधी या जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. या विकासाचे ‘पुण्य’कर्म आपल्या हातून व्हावे, या विकास निधीचा खर्च आपल्या ‘हातू’न व्हावा यासाठी भाजप, उद्धव सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात स्पर्धा लागली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गिरीश महाजन व दादा भुसे या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. यात कोण बाजी मारेल ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

गिरीश महाजन असणार दावेदार?

गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाशिक शहर हे महाराष्ट्रातील मोठे धार्मिक स्थळ. शेजारीच असलेल्या त्र्यंबकेश्वरमुळेही या जिल्ह्याला वेगळे एेतिहासिक महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सोहळा असलेला कुंभमेळा जसा दर बारा वर्षांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये साजरा हाेतो तसाच तो नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्येही होतो. महाराष्ट्रात नाशिक हे एकमेव शहर आहे जिथे हा सोहळा साजरा होतो, त्यामुळे या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा झाला हेाता. तेव्हाही राज्यात भाजप- शिवसेना युतीचे सरकार होते. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे तेव्हा नाशिकचे पालकमंत्रीपद हाेते. केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध करुन दिल्याने या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला होता. याचे श्रेय तत्कालिन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या खात्यात गेले होते. त्यामुळे यंदाही हे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी भाजपची धडपड सुरु आहे.

शिंदेंच्या पॉवरने दादा भुसेंना बसवले पालकमंत्रिपदावर…

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रत्येक पक्ष आणि मातब्बर नेते आपापल्या पद्धतीने वजनदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी महायुतीने 14 जागा लढविल्या होत्या आणि सर्व जागा विजयी झाल्याने सर्व पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ महत्वाचे शहर म्हणून नाशिककडे बघितले जात असल्याने नाशिकचा पालकमंत्री होण्यासाठी कायमच रस्सीखेच बघायला मिळते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री भूषविले आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे देण्यात अाली होती. याच काळात नाशिकमध्ये कुंभमेळा भरला होता. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा सुनियोजितपणे पार पडला होता. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळातच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर आगामी 2027 च्या कुंभमेळाची जबाबदारी दिली आहे. अडीच वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची पॉवर वापरून दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री केले होते. त्यामुळे आता महायुतीत भाजप, शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही समावेश झाला आहे. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही पुन्हा पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी प्रयत्नरत आहेत.

अडीच वर्षात भुसेंची चांगली छाप…

नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन आमदार असतानाही दादा भुसे याना मंत्रिपद देण्यात आले होते. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली दादा भुसे यांनी आपल्या कामाची मोहर उमटविली आहे. त्यामुळे शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळेल, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करतात. तर भाजपचे गिरीश महाजन यांनी कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्रीपदावर केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत. राष्ट्रवादीकडूनही पालकमंत्रीपदावर आपलाच अधिकार असल्याचा दावा केला जात आहे. येथील विमानतळ, मुंबई-नाशिक महामागार्वरील उड्डाणपूल अशी विविध कामे छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास आल्यानं कुंभमेळाचे नियोजनही त्यांनाच देण्यात यावे, अशी राष्ट्रवादीकडून मागणी होत आहे.

यंदाच्या निवडणुकीत 7 जागा जिंकत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं राष्ट्रवादीचा पालकमंत्रीपदावर अधिकार असल्याचा दावाही केला जात आहे. या स्पर्धेत पालकमंत्रिपद मिळवण्यात कुणाला यश येते, ते पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र या प्रश्नावर तोडगा काढणे महायुतीच्या नेत्यांसाठी सोपे नाही. त्यामुळे गिरीश महाजन, छगन भुजबळ व दादा भुसे या तीन ज्येष्ठ मंत्र्यांची एक समिती तयार करुन त्यांच्याकडे कुंभमेळ्याच्या नियोजनाची सूत्रे सोपवण्याचा एक मध्यम मार्ग काढला जाऊ शकतो. नाशिक जिल्ह्याच्या विकास व सामान्य जनतेसाठी सुविधा वाढवण्यासाठी आपल्याला पद हवे अशा गप्पा तिन्ही पक्षाचे नेते करत असले तरी त्यांचे लक्ष आहे तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीकडे. यातून आपल्या लोकांचे कल्याण कसे होईल? यासाठी हा सारा खटाटोप सुरु आहे हे आता लपून राहिलेले नाही.