सुमारे २५ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम केलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून परिचित आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुमारे एक वर्षभर त्या ठाकरेंसोबत निष्ठावंत राहिल्या. पण नंतर मात्र सत्तेच्या आमिषाने त्यांनीही इतरांप्रमाणे शिंदेंच्या गटात जाणे पसंत केले. आता नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी ‘उद्धव ठाकरेंना दोन मर्सिडिझ दिल्या की एक पद मिळते’ असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे दोन्ही गटाकडून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. पण गेली २५ वर्षे शिवसेनेत असलेल्या नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरेनी चार वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली, पक्षाचे उपनेतेपद दिले, विधान परिषदेचे उपसभापतीपद दिले. मग या पदांसाठी गोऱ्हेंनी ‘मातोश्री’वर १०- १२ मर्सिडिझ कार दिल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कालपर्यंत ‘मातोश्री’ला दैवत मानणाऱ्या गोऱ्हे आज इतक्या कृतज्ञ का झाल्या की खरेच उद्धव ठाकरेंवर त्यांनी केलेले आरेाप खरेच आहेत? याबाबत जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून….
साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण्यांची गरज आहे का?

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच दिल्लीत थाटात पार पडले. स्वत: शरद पवार स्वागताध्यक्ष असल्यामुळे या संमेलनाच्या आयोजनामध्ये कुठलीही कसर सुटली नव्हती. महाराष्ट्रापासून दूरवर असलेल्या या संमेलनासाठी मराठी साहित्याची रसिक कमी अन् राजकारण्यांचीच गर्दी जास्त होती. यानिमित्ताने पुन्हा एकदा साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण्यांची गरज आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण जर देशाला हेवा वाटावा अशी झकपक संमेलने करायची असतील तर पैसा लागतो? अन् सरकारच्या तुटपुंज्या २५-५० लाखांच्या अनुदानात अशी संमेलने होऊ शकत नाहीत. म्हणूनच राजकारण्यांचा आधार संमेलनाच्या आयोजकांना लागतो. म्हणून कुणी कितीही बोंबा ठोकल्या तरी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन राजकारणांना हद्दपार करणे किमान या जन्मी तरी साहित्यिकांना शक्य नाही. तर मुद्दा हा आहे की यंदाच्या साहित्य संमेलनातही अशीच राजकारण्यांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर जमली होती.
गोऱ्हेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप..!

संमेलन दिल्लीत असल्यामुळे त्याचे उद्घाटन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार व्यासपीठावर होतेच. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्याेग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व्यासपीठावर होते. वेगवेगळ्या परिसंवादात आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भाेसले यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. पण या सर्व भाषणात सर्वात चर्चेत राहिली ती शिंदेेसेनेच्या उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे मुलाखत. ‘असे घडलो आम्ही’मधून प्रवास उलगडताना नीलम गोऱ्हे यांनी आपल्या मनातील २५ वर्षांपासूनची खदखद व्यक्त केली. ‘कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की नेत्यांना संपर्क नको असेल तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हता’ असा गंभीर आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
शिवसेनेत प्रवेश अन् नीलम ताईंच्या राजकारणाची प्रगती…

आता नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झालाय. मुळात २५ वर्षे ज्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत घालवली, या पक्षाने त्यांना चार टर्म विधान परिषदेची आमदारकी दिली, विधान परिषदेचे उपसभापतीपद दिले, शिवसेनेचे उपनेतेपद दिले या सर्व पदांसाठी नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरेंना किती मर्सिडिज द्याव्या लागल्या? हे मात्र नीलम गोऱ्हे यांनी सांगितले नाही. आयुर्वेदिक विषयात डॉक्टर झालेल्या बीएएमएस डॉक्टर असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात तशी रिपब्लिकन पक्षापासून केली. १९८७ पासून त्या कामगार, मजूर, शोषित लोकांसाठी, महिलांसाठी काम करत होत्या. रिपाइं रामदास आठवलेंसोबत काम केल्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप- बहुजन महासंघ या पक्षात प्रवेश केला. त्या पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली, पण पराभूत झाल्या. काही काळ त्यांनी शरद पवार यांच्यासोबतही काम केले. पण आक्रमक स्वभावाच्या नीलम गोऱ्हे या पक्षांमध्ये फार काळ रमल्या नाहीत. १९९८ मध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला. तेथून पुढे मात्र त्यांची राजकीय प्रगती होत गेली. शिवसेनेत महिला संघटन म्हणून गोऱ्हे यांनी उत्तम काम केले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी २००५ मध्ये त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद देऊन सन्मान केला. २००७ मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या. २०१० मध्ये पुणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनीच त्यांच्यावर विश्वास टाकला. म्हणूनच एकदा- दोनदा नव्हे तर आतापर्यंत चार वेळा म्हणजे २४ वर्षे त्यांना विधान परिषदेची आमदारकी शिवसेनेकडून मिळाली आहे. इतकेच नव्हे तर विधान परिषदेच्या उपसभापतीपदही त्यांना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
नीलम गोऱ्हेंनी एकेकाळी बंड करणाऱ्यांचाही घेतला होता समाचार…

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत विधान सभेचे ४० आमदार गेले, पण विधान परिषदेचा मात्र एकही अामदार फुटला नव्हता. त्यांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास हेाता. नीलम गोऱ्हे पण त्यापैकीच एक. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू उद्धव सेनेचे अनेक नेते सत्तेच्या आमिषाने त्यांच्याकडे सरकू लागले. जून २०२२ ते जुलै २०२३ या वर्षभराच्या काळात नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंसोबत बंड करणाऱ्या आपल्याच पक्षातील नेत्यांचा भरपूरचा समाचार घेतला, ‘गद्दार’ म्हणून त्यांचा उल्लेखही केला. पण आता ठाकरेंसाेबत राहून उपयोग होणार नाही, याची खात्री पटल्याने जुलै २०२३ मध्ये म्हणजे बंडानंतर एक वर्षाने त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंनीही त्यांना विधान परिषदेचे उपसभापतीपद, उपनेतेपद कायम ठेवून त्यांचे स्वागत केले. पण पक्ष सोडल्यानंतरही नीलम गोऱ्हे यांनी कधी उद्धव ठाकरेंविरोधात फार जहाल भाषा बोलली नाही. त्या नेहमी सावध प्रतिक्रियाच देत राहिल्या. पण आता दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावरील परिसंवादात मात्र त्यांनी थेट दोन मर्सिडिज दिल्या की ठाकरेंच्या शिवसेनेते पदे मिळतात हा गौप्यस्फोट करण्यामागचे कारण काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. उद्धव सेनेने हे आरोप फेटाळून लावत गोऱ्हेंचा समाचारही घेतला आहे.
नीलम गोऱ्हे यांनी मातोश्रीवर किती मर्सिडिज दिल्यात?

चार टर्म आमदारकी, उपनेतेपद, प्रवक्तेपद अशी वेगवेगळी पदे शिवसेनेत घेताना नीलम गोऱ्हे यांना मातोश्रीवर नेमक्या किती मर्सिडिज द्याव्या लागल्या? हे मात्र त्यांनी काही सांगितले नाही. सध्याचे उद्धव सेनेचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही‘, असे दानवेंनी सांगितले. तर अलिकडेच उद्धव सेनेत आलेल्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘नीलम गोऱ्हे आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या आहेत. 30 वर्षे त्यांनी आमच्या पक्षात काम केले. नीलम गोऱ्हे यांनी जे आरोप केलेत, त्यात काही तथ्य असेल, तर सर्वात जास्त कमाई नीलम गोऱ्हे यांनीच केली असावी. नीलम गोऱ्हे मातोश्रीवर कायम पडीक असायच्या. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत आणि मातोश्रीवर कधी कोणी जावं, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचं, कोणाला पद द्यायचं नाही, प्रवेश सुद्धा, सगळं त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल,’ असा पलटवार अंधारे यांनी केला. एकूणच नीलम गोऱ्हे यांच्या आरोपामुळे दोन्ही शिवसेनेत आरेाप- प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे.
नीलम गोऱ्हेंच्या आरोपात नवे असे काय?

उद्धव ठाकरेंवर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्या नीलम गोऱ्हे या काही पहिल्या नेत्या नाहीत. अातापर्यंत जे जे नेते शिवसेनेतून बाहेर पडले ते नारायण राणे असो की राज ठाकरे, एकनाथ शिंदे असो की छगन भुजबळ या सर्वांनीच उमेदवारीसाठी ठाकरे पैसे घेतात? असे आरोप केलेले आहेत. त्यामुळे गोऱ्हेंच्या आरोपात नवे असे काही नाही. उलट आता प्रत्येकच राजकीय पक्षात कमी अधिक प्रमाणात निधी गोळा करणे सुरु असते, हे जाहीर झालेल्या निवडणूक रोख्यांच्या तपशीलावरुन उघड झाले आहेच. पण २७ वर्षे शिवसेनेत असताना हा गौप्यस्फोट करण्याचे धाडस नीलम गोऱ्हेंसारख्या फायरब्रॅन्ड नेत्यांनी काय दाखवले नाही? तसेच ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वर्षभर मूग गिळून गप्प बसलेल्या गोऱ्हेंना आताच मर्सिडिजची आठवण कशी काय आली? की दिल्लीच्या व्यासपीठावर त्यांना हे बोलण्यास कुणी भाग पाडले? असे तर्क- वितर्क आता लावले जात आहेत. त्याची उत्तरे अर्थातच नीलम गोऱ्हे देणार नाहीत. पण फक्त त्यांनी मातोश्रीवर किती मर्सिडिज दिल्या एवढे जरी जाहीर केले तरी त्यांच्या आरोपात तथ्य आहे असे महाराष्ट्रातील जनता समजून घेईल अन्यथा इतरांप्रमाणे गोऱ्हेताईंचे आरोपही अळवावरचे पाणी ठरतील, यात शंका नाही.