नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी नेते, माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकला. खरे तर अगदी अलिकडेच म्हणजे सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या हात सोडून त्यांनी भाजपचे कमळ कोटावर लावले होते. राहुल गांधी नंदूरबारमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी येण्याचा मुहूर्त शोधून त्यांनी मार्च महिन्यात काँग्रेसला धक्का दिला होता. त्याची राज्यभर चर्चाही झाली. पण वळवी भाजपमध्ये सहा महिनेही रमले नाहीत. नुकताच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. अजून त्यांनी कोणत्या पक्षात जाणार हे सांगितले नसले तरी ते पुन्हा काँग्रेसमध्येच जातील, अशी आशा त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते. सहाच महिन्यात वळवी यांनी घरवापसीचा निर्णय का घेतला हे जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून….
पु्न्हा एकदा वळवींची धडपड सुरु…
पदमाकर वळवी हे १९९९ मध्ये अक्कलकुवा – तळोदा मतदारसंघातून सर्वप्रथम काँग्रेसचे आमदार झाले. त्यानंतर २००४ व २००९ मध्येही ते सातत्याने निवडून येत होतेे. २००९ मध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. क्रीडा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. नंदूरबारचे पालकमंत्रीपदही त्यांनी भूषवले. क्रीडा मंत्री म्हणून त्यांची कामगिरी काही विशेष प्रभावी नव्हती. गेल्या १० वर्षात मात्र ते आमदारकीपासून दूर राहिले. आता पुन्हा हे पद मिळवण्यासाठी वळवींची धडपड सुरु आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेसमध्ये राहून आपण काही आमदार होऊ शकत नाही, याची खात्री पटल्याने दळवींनी भाजपात प्रवेश केला होता. या पक्षाकडून आपल्याला तिकिट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण लोकसभा निवडणुकीत भाजपची जी धूळधाण उडाली ते पाहून वळवींना पुन्हा आमदार संभाव्य उमेदवारी व आमदारकी धोक्यात येत असल्याचा साक्षात्कार झाला.
उमेदवारीचा शब्द नाही, तोपर्यंत राजकीय भूमिका अस्पष्ट…
मग आादिवासी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्धार केला. धनगर समाजाला अनुसुचित जमातीतून आरक्षण हवे आहे. मात्र तसे झाले तर आादिवासींच्या हक्कांवर गदा येईल, म्हणून आादिवासी नेते आंदोलन करत आहेत. नंदूरबारमधील या अआंदोलनाचे नेतृत्व पदमाकर वळवी करत आाहेत. जे सरकार आमच्या आरक्षणाच्या मुळावर उठले आहे ते सत्ताधारी पक्ष भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आदिवासींनी उमेदवारी घेऊ नये , असे आवाहन त्यांनी केले होते. हाच मुद्दा पुढे करुन वळवींनी भाजपला रामराम ठोकला. आता महाविकास आघाडीत त्यांचा अक्कलकुवा – तळोदा मतदारसंघात कोणत्या पक्षाला सुटतो, त्यावर वळवींचा पुढील राजकीय वाटचाल ठरेल. २०१४ पासून मागील १० वर्षे या मतदारसंघात काँग्रेसचे के.सी. पडवी हे विजयी होत आहेत. त्यामुळे यंदाही हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिल. स्वत: वळवी व त्यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी याही मतदारसंघात दावेदारी करत आहेत. पण आता काँग्रेस विद्यमान आमदार के.सी. पडवी यांचे तिकिट कापून पद्माकर वळवी किंवा त्यांच्या कन्येला उमेदवारी देतील का? हा प्रश्न आहेच. त्यामुळे जोपर्यंत उमेदवारीचा शब्द मिळत नाही तोपर्यंत पदमाकर वळवी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार नाहीत, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.