देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘पॅचअप’ करुनही पंकजा मुंडे यांच्या अडचणी संपेनात

बीड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून भाजप पक्षांतर्गत अप्रत्यक्ष ‘बंड’ पुकारलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना त्याची गेली साडेचार वर्षे मोठी किंमत चुकवावी लागली. मात्र उशिरा का होईना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बंडाचा पवित्रा मागे घेत भाजपच्या वरिष्ठांशी पॅचअप केले. तरीही त्यांच्या मागील संकटाचा ससेमिरा अजून संपलेला दिसत नाही. यापूर्वी जीएसटी विभागाने १९ कोटींच्या थकबाकी वसूलीसाठी पंकजा (Pankaja Munde) अध्यक्ष असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे (vaidyanath sugar factory) बँक खाते सील केले होते. त्यापाठोपाठ आता २०३ कोटींच्या थकीत कर्जवसूलीसाठी युनियन बँकेने हा कारखाना विक्रीस काढला आहे.

खरे तर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना गतवर्षी केंद्र सरकारतर्फे भरीव आर्थिक मदत देण्यात आली. याचा लाभ काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील काही कारखान्यांनाही मिळाला. पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) वैद्यनाथ कारखान्यानेही त्यावेळी केंद्राकडून अर्थसाह्य मिळावे म्हणून अर्ज केला होता, मात्र केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मंत्रालयाने तो फेटाळून लावला. याचा अर्थ पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असूनही भाजपमध्ये पंकजा यांच्या शब्दाला किंमत नसल्याचे दिसून येते. याबाबत पंकजा यांनी यापूर्वी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केली होती. मात्र प्रत्येक वेळी पक्षाविरोधात जाहीर बोलण्याची त्यांनी किमत मोजावी लागली.

ही चूक लक्षात आल्यानंतर आता पंकजा यांनी राज्यातील त्यांचे ‘हाडवैरी’ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे. परळीत झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात फडणवीसांसह व्यासपीठावर हजेरी लावून त्यांनी तसा संदेशही जनतेला व पक्षाला दिला. यात पंकजा यांचे बंधू कृषीमंत्री धनंजय मुंडे (dhananjay Munde) यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आता धनंजय व पंकजा यांच्यातील वित्तुष्टही कमी झाले आहे. असे असताना गोपीनाथराव मुंडे (gopinath munde) यांनी परळीत उभारलेला वैद्यनाथ कारखाना थेट लिलावात काढून पंकजांच्या नेतृत्वाचे अपयश जनतेसमोर आणण्याची खेळी केली जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्याबद्दल पंकजा यांनी अद्याप अवाक्षरही काढलेले नाही. २५ जानेवारीला या कारखान्याची ई- लिलाव प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. त्यापूर्वी काही हालचाली करुन पंकजा ही लिलाव प्रक्रिया थांबवू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics