बीडच्या पालक पंकजा मुंडे मौन कधी सोडणार?

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या, एक संवेदनशील लोकप्रतिनिधी व बीडच्या माजी पालकमंत्री तसेच राज्याच्या विद्यमान कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे राज्यात जिथे कुठे संकट येते तिथे पीडितांचे अश्रू पुसायला जात असतात. मात्र बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पंकजा मुंडे यांना अजून वेळ का मिळाला नाही? हा प्रश्न बीड जिल्ह्यातील जनता विचारत आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी त्यांच्याकडून काहीच पाठपुरावा का होत नाही? केवळ राजकीय सोयीसाठी त्यांनी सोयीस्कर मौन बाळगलेले दिसतेय. काय आहे या मागचे राजकारण.. जाणून घ्या मिशन पॉलिटिक्समधून

बीडच्या जनतेत निर्माण झाली चीड…

बीड जिल्हा माझे कुटुंब आहे. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी मला तुमच्या सर्वांची जबाबदारी दिली आहे. पद असो वा नसो मी तुमची सेवा करत राहिल, असे भाषण दसरा मेळाव्यातून करणाऱ्या पंकजा मुंडे सध्या खूपच शांत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मागण्यासाठी संपूर्ण जिल्हा रस्त्यावर उतरलेला असताना पंकजा मुंडे मात्र पाच वर्षांनी मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मुंबईतच व्यग्र आहेत, याबद्दल बीड जिल्ह्यातील जनतेत चीड निर्माण झाली आहे.

पंकजा मुंडेंची संवेदनशील नेत्या म्हणून ओळख…

गेली २५ ते ३० वर्षे बीड जिल्ह्यातील जनतेने मुंडे कुटुंबीयांना भक्कम आधार दिला. गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात संपूर्ण मुंडे परिवार शोकाकूल असताना याच जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या मुलींना कधी एकटे पडू दिले नाही. कुटुंबातील व्यक्तींनी, चुलत भावाने राजकीय वैर पत्कारले तरीही बीडच्या जनतेेने कुठलाही राजकीय अनुभव नसलेल्या प्रितम मुंडे यांना दोनदा खासदारकीला निवडून दिले. पंकजा मुंडे यांनाही परळीतून निवडून दिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जातीय राजकारणाचे स्तोम माजलेले असताना निम्मा मतदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राहिला. या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या असल्या तरी हा फरक फारच कमी होता. याचाच अर्थ अजूनही पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. पंकजा मुंडे याही संवेदनशील नेत्या म्हणून ओळखल्या जातात. लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानंतर दोन तरुणांनी आत्महत्या केल्या. याचं डोंगराएवढं दु:ख झालेल्या पंकजा मुंडे यांनी तातडीने या शोकूकूल कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांची ही संवेदनशीलता आजही चर्चिली जाते. पण मग सरपंच संतोष देशमुख यांची इतकी क्रूर हत्या झालेली असताना पंकजा मुंडे अजून देशमुख परिवाराच्या सांत्वनासाठी का गेल्या नाहीत? हा प्रश्न आहे.

बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा…

या खून प्रकरणात आता पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडे व त्यांचे राईट हॅन्ड वाल्मीक कराड यांचे नाव गुंतले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. बीडचे माजी व भावी पालकमंत्री धनंजय मुंडे कदाचित या कारणामुळे देशमुख परिवाराचे अश्रू पुसायला धजावले नसतील. पण पंकजा यांनीही गेली १० वर्षे आपल्याशी राजकीय शत्रुत्व पत्कारणाऱ्या भावाच्या प्रेमापोटी एका शोकाकूल कुटुंबाचे साधे सांत्वन करण्याची माणुसकी दाखवली नाही, याबद्दल जनतेत संताप आहे. देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी बीडमध्ये नुकताच एक सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यात भाजपसह सर्वच सत्ताधारी विरोधी पक्षाचे आमदार हजर होते. अपवाद होता फक्त पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचा. धनंजय मुंडेंनी तर वाल्मीक कराड माझा निकटवर्तीय असल्याचे सांगून या प्रकरणात आपण कुणाच्या बाजूने आहोत हे दाखवून दिले आहे. पण पंकजा मुंडे यांचे मौन खूप काही सांगून जाते.

फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?

धनंजय मुंडे यांना त्या उघड समर्थनही देऊ शकत नाहीत व देशमुख परिवाराचे अश्रू पुसण्यासाठी पुढाकार घेऊन त्या भाऊ धनंजय यांना दुखावूही शकत नाहीत. याच कारणामुळे त्यांनी सध्या तापलेल्या बीड जिल्हयाापासून दूर राहून मौन बाळगणे पसंत केले आहे. पाच वर्षानंतर मिळालेले कॅबिनेट मंत्रिपदाचे सोपस्कार पूर्ण करण्यातच त्या व्यग्र आहेत. कदाचित, वाल्मीक कराड प्रकरणाची जबाबदारी थोपवून फडणवीस सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवतील का नाही हे माहित नाही. कदाचित किमान बीडचे पालकमंत्रीपद तरी मुख्यमंत्री पुन्हा धनंंजय मुंडे यांना देणार नाही? अशीही भोळी आशा बीडच्या जनतेला आहे. असे झाले तर बीडमधील दुसऱ्या मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रिपद येऊ शकते. या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना या पदाची लॉटरी लागू शकते. मग भावी पालकमंत्री म्हणून का होईना त्यांनी देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करण्याची माणुसकी दाखवायला हवी.

देशमुखांचे मारेकरी पकडले जावेत यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करायला हवा. या संघर्षात आपण जनतेसोबत आहोत, ही हमी कृतीतून द्यायला हवी. तरच बीडची जनता खऱ्या अर्थाने पंकजा मुंडे यांचा ‘पालक’ म्हणून स्वीकार करतील. नाहीतर धनंजय मुंडेंना झाकून पंकजा मुंडेंना पुढे आणणे, एवढेच सोपस्कार सरकारने केले. मुंडेशाहीच्या दादागिरीचे चटके मात्र बीड जिल्ह्याला बसत राहिले तर मग धनंजय काय अन‌् पंकजा काय? यांच्यात फरक तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच.. पंकजाताई किमान एकदा तरी देशमुख परिवाराचे अश्रू पुसण्यासाठी बीड जिल्ह्यात या.. एवढीच बीडकर जनतेची माफक अपेक्षा आहे.