फडणवीसांचा डाव फसला, तावडेंच्या शिफारशीने पंकजांना आमदारकी

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी भाजपने ५ उमेदवारांची यादी जाहीर

भाजपच्या यादीत सर्वाधिक चर्चेचे नाव आहे ते पंकजा मुंडे यांचे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडे पराभूत झाल्या. पाच वर्षात सलग दुसरा पराभव हाेऊनही भाजपने त्यांचे पुनर्वसन केले. खरे तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरच पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे, त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद द्यावे, अशी मागणी मुंडे समर्थकांकडून होत होती. मात्र पक्षाने त्याला फारसे महत्त्व दिले नाही. याचे महत्त्वाचे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यातील पक्षांतर्गत शितयुद्ध तसेच पंकजांचा वारंवार पक्षाविरोधीत बोलण्याचा स्वभाव.

अमित शाह यांनी स्विकारला नवा फॉर्म्युला…

मात्र मधल्या काळात पंकजा यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेतल्याने का होईना त्यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाली. मात्र तिथेही त्या पराभूत झाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे पुन्हा पंकजा सांसदीय पदापासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. मात्र आता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसल्याने भाजपमधील राजकीय परिस्थितीही बदलली. राज्यात एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महत्त्व देण्यापेक्षा सामूहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला स्वीकारण्यावर अमित शाह यांनी भर दिला. त्यातच मराठा व ओबीसी आरक्षण आंदाेलन तापल्यामुळे भाजप संकटात आला आहे. मराठा समाज तर भाजपविरोधात गेलाच. त्याचे परिणामही लोकसभेत दिसून आले. आता ओबीसी समाजाची व्होटबँक तरी आपल्याकडे कायम राहावी म्हणून भाजपने ओबीसी नेत्यांना महत्त्व द्यायला सुरुवात केली.

यामुळे पक्षाने घेतली पंकजा मुंडेंच्या लोकप्रियतेची दखल…

मराठा समाजाच्या तीव्र विरोधामुळे बीडमध्ये पंकजा पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्या मागे एकसंघपणे उभा राहिला. इतकेच नव्हे तर मराठवाड्यातील चार- पाच समर्थकांनी पराभवाच्या नैराश्यात आत्महत्याही केल्या. असे प्रकार देशात फक्त दक्षिणेतील राजकारणात व्हायचे. मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या नेत्यासाठी प्रथमच आत्महत्येचे प्रकार घडले. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानही त्याची व पंकजांच्या लोकप्रियतेची दखल घेतली व त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे आदेश दिले.

असा फसला फडणवीसांचा डाव…

चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. मात्र २०१४ व २०१९ मध्ये जसे एकट्या फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली तसे यावेळी होणार नाही. कारण मोठ्या संख्येने असलेला मराठा समाजाचा फडणवीसांवर रोष आहे. परिणामी भाजपला यंदा सामूहिक नेतृत्वावर विश्वास टाकावा लागेल. यात पंकजा मुंडे यांचे नाव अग्रस्थानी येते. म्हणजे उद्या भाजपची सत्ता आलीच तर फडणवीस यांच्याबरोबरच पंकजा मुंडे याही मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार राहू शकतात. हाच धोका लक्षात घेऊन चाणाक्ष फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या नावाची राज्यसभेसाठी शिफारस केली होती. म्हणजे पंकजा दिल्लीच्या राजकारणात जातील व इकडे महाराष्ट्रात आपल्यासमोरील अडथळा दूर होईल, अशी त्यामागची रणनिती असल्याचे सांगितले जाते. मात्र भाजपला पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाची खरी गरज केंद्रापेक्षा राज्यात जास्त आहे. त्यामुळे भाजप हायकमांडने पंकजा मुंडे यांचे राज्यसभेपेक्षा विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यास प्राधान्य दिले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंची वर्णी?

पंकजा मुंडे या ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. मुंडेंना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळे पंकजा यांना आमदारकी देऊन त्याबदल्यात विधानसभेच्या प्रचारासाठी राज्यभर फिरवण्याचा व त्यांच्या माध्यमातून ओबीसी वर्ग पुन्हा एकसंघ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. ज्या मतदारसंघातून ही यात्रा गेली तेथे भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. मुंडे नावाच्या लोकप्रियतेचा पुन्हा असाच वापर करुन घेण्याचा व भाजपला विधानसभेत पुन्हा नंबर वन पक्ष बनवण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच उद्या दोन- तीन महिन्यांसाठी का होईना महाराष्ट्रात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी त्यात पंकजा मुंडे यांची वर्णी लागू शकते.

पुनर्वसनात विनोद तावडेंचा महत्त्वाचा वाटा…

पंकजा मुंडे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात खच्चीकरण करण्यात आले, असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून वारंवार केला जातो. केंद्रीय नेतृत्वाकडेही पंकजा यांच्याबाबत नकारात्मक फीडबॅक गेल्याने आतापर्यंत त्यांच्या पुनर्वसनात अडथळे येत होते. मात्र आता भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या रुपाने केंद्रीय नेतृत्वाकडे शब्द टाकणारा एक भक्कम पाठीराखा पंकजा मुंडे यांच्या मदतीला धाऊन आला आहे. त्यामुळे कालपर्यंत ‘देवेंद्र फडणवीस म्हणतील ती पूर्वदिशा’ हे जे चित्र महाराष्ट्र भाजपात होते, तिथे आता तावडेंच्या शब्दालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच फडणवीस यांना कंटाळून भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंना परत पक्षात घेण्याचा निर्णय असो की पंकजा मुंडे यांचे राज्यातच पुनर्वसन करणे असो, या दोन्ही निर्णयामागे तावडेंची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत मावळते मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचे तिकिट कापले होते. तर परळीतून पंकजांच्या पराभवासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय मुंडे यांना फडणवीस यांनी हातभार लावला असल्याचा आरोप होत होता. मात्र त्याच तावडेंचा शब्द महाराष्ट्रात फडणवीस यांचे राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी भाजप नेतृत्वाकडे महत्त्वाचा ठरत अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics