काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी राजकीय जीवनात सक्रिय झाल्यानंतर २५ वर्षांनी प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे वायनाड व रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडून अाले होते. नियमानुसार त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता रिक्त झालेल्या केरळमधील वायनाड या मतदारसंघातून राहूल यांच्या भगिनी प्रियंका यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही बहिण भावंडांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्राची तुलना केल्यास बहिण प्रियंका या आपले बंधू राहूल गांधी यांच्यापेक्षा २ कोटी रुपयांनी गरीब असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही भावंडांकडे नेमकी किती संपत्ती हे जाणून घेऊयात.
अन् वायनाडच्या पोटनिवडणूकीत प्रियंका गांधी…
इंदिरा गांधी यांचे वंशज असलेले संजय गांधी, राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्यापाठोपाठ राहूल गांधी व प्रियंका गांधी हेही आता संसदीय राजकारणात उतरले आहेत. राहूल हे २०१४, २०१९ व २०२४ मध्ये खासदार झाले. २०१९ मध्ये त्यांचा अमेठीतून पराभव झाला होता, मात्र केरळच्या वायनाडमधून ते विजयी झाले होते. यावेळी मात्र राहूल यांनी अमेठी सोडली, तिथे काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपाचा पराभव केला. पण राहूल यावेळी आपली आई सोनिया गांधी यांच्या रायबरेलीतून व आपल्या वायनाड अशा दोन मतदारसंघातून उभे होते. दोन्ही जागांवरुन ते निवडून आले. संसदीय कामकाजाच्या नियमानुसार, कुठल्याही आमदार, खासदाराला दोन ठिकाणी विजय मिळाला असेल तर निकालानंतर एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार राहुल गांधी यांनी वायनाडचा राजीनामा दिला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत वायनाडचीही पोटनिवडणूक लागली. या रिक्त जागेवर प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
प्रियंका गांधींची तब्बल २५ वर्षांची प्रतीक्षा
खरे तर प्रियंका यांचे १९९९ मध्ये सक्रिय राजकारणात पदार्पण झाले. त्यावेळी त्या आई सोनिया गांधी यांच्या निवडणूक प्रतिनिधी बनल्या होत्या. तेव्हापासून प्रियंका या निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. पण त्यांनी खूपच संयम राखला. तब्बल २५ वर्षानंतर आता त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रियंका यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार त्यांच्या नावावर एकूण फक्त १२ कोटींची संपत्ती आहे. यात ७.७४ कोटी रुपयांची स्थावर तर ४.२४ कोटींची जंगम मालमत्ता आहे. तसेच प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे मात्र ६६ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. यात जंगम मालमत्ता 37.9 कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता 27.64 कोटी रुपयांची आहे.
प्रियंका यांच्या नावावर कर्ज सुद्धा…
प्रियंका यांचे 2023-2024 या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न 46.39 लाख रुपये आहे. इमारतीतून मिळणारे भाडे, बँकांचे व्याज व इतर गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न याचा त्यात समावेश आहे. प्रियंका यांच्या ३ बँक खात्यात, म्युच्युअल फंड आदी मिळून ४ कोटी २४ लाख रुपये आहेत. पती रॉबर्ट वाड्रा यांनी भेट दिलेली एक होंडा सीआरव्ही कारही त्यांच्याकडे आहे. ४ किलो ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत. याची किंमत १ कोटी १५ लाख रुपयांच्या जवळपास आहे. वारसाहक्काने मिळालेल्या दोन शेतजमिनी आणि नवी दिल्लीच्या मेहरौली परिसरात बांधलेल्या फार्महाऊसचा अर्धा हिस्सा प्रियंका यांच्या नावावर आहे. ज्याची किंमत २ कोटी रुपये आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एक बंगलाही त्यांच्या नावे आहे, ज्याची किंमत अंदाजे साडेपाच कोटी रुपये आहे. नुसती संपत्तीच एेकत बसू नका… तर प्रियंका यांच्या नावावर १५ लाख ७५ हजार रुपयांचे कर्जही आहे. दरवर्षी त्या 15 लाख रुपयांपेक्षा जास्त आयकरही भरतात.
राहुल गांधींच्या संपत्तीचा आढावा…
आता राहूल गांधींनी एप्रिलमध्ये सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे १४ कोटी ८५ लाख रुपयांची संपत्ती आहे. म्हणजे बहिणीपेक्षा राहूल २ कोटी रुपयांनी श्रीमंत आहे. याचे कारण म्हणजे २०१४ ते २०२४ या १० वर्षात त्यांच्या संपत्तीत ४ कोटी ८५ लाखांनी वाढ झालीय. २०१४ मध्ये जेव्हा अमेठीतून अर्ज भरला तेव्हा राहूल यांनी आपली संपत्ती १० कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. यात राहूल यांची जंगम मालमत्ता सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची आहे तर स्थावर मालमत्ताही पावणे आठ कोटी रुपयांची आहे. त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडून 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. राहूल यांच्यावर एकूण 72 लाख रुपयांचे इतर कर्जही आहे. राहुल गांधींनी बाँड्स आणि शेअर्समध्ये 5 कोटींची गुंतवणूक केली आहे.तसेच बँक व इतर गुंतवणूक स्किममध्ये त्यांची ४० लाखांची बचत आहे. राहूल यांच्याकडे २ लाख ९१ हजार रुपयांचे दागिने आहेत राहुल आणि प्रियांका यांच्या नावावर नवी दिल्लीतील मेहरौलीत 2.34 एकर शेतजमीन आहे. गुरुग्राममधील सिलोखेरा येथे 5 हजार 838 स्केअर फूट कमर्शिल एरिया राहुल गांधींच्या नावावर असून, त्याची किंमत 8 कोटी 75 लाख 70 हजार रुपये आहे. बघा.. हे बहिण- भाऊ किती श्रीमंत आहेत ते… राजकारणात आल्यावर अशीच दिवसेंदिवस सर्वांची संपत्ती वाढत जातेय… अर्थात कागदोपत्री दाखवण्यात येणारी संपत्ती व प्रत्यक्षात असणारी संपत्ती यात किती तफावत असते ? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सामान्य मतदारांना मिळालेले नाही.