महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे जसे संपूर्ण देशाचे लक्ष आहे, तशीच केरळमधील वायनाड लोकसभेची पोटनिवडणूकही चर्चेची बनलेली आहे. या मतदारसंघातून राहुल गांधी यांची बहिण व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रथमच निवडणूक लढवत आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात एक नवा चेहरा असलेली महिला इंजिनिअर मैदानात उतरवली आहे. प्रियंकांच्या विजयाबाबत देशात जेवढी उत्सुकता आहे तेवढीच त्यांना टक्कर देणारी महिला उमेदवार नाव्या हरिदास या नेमक्या आहेत तरी कोण? याविषयीची देशभर उत्सुकता आहे. आपण मिशन पॉलिटिक्समधून जाणून घेऊ या महिला उमद्या नेतृत्वाविषयी व वायनाडच्या पोटनिवडणुकीविषयी…
प्रियंका गांधींच्या विरोधात इंजिनिअर महिला…
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड व उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणाहून ते विजयी झाले. पण नियमानुसार, त्यांना एका जागेची राजीनामा द्यावा लागला. रायबरेली हा गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ आहे. सोनिया गांधी इथूनच निवडून यायच्या. त्यामुळे राहूल यांनी वायनाडचा राजीनामा दिला. २०१९ मध्येही राहूल वायनाडमधून विजयी झाले होते. आता त्यांच्या जागी बहिण प्रियंका गांधी या पोटनिवडणूक लढवत आहेत. खरे तर प्रियंका यांचे १९९९ मध्ये सक्रिय राजकारणात पदार्पण झाले. त्यावेळी त्या आई सोनिया गांधी यांच्या निवडणूक प्रतिनिधी बनल्या होत्या. तेव्हापासून प्रियंका या निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. पण त्यांनी खूपच संयम राखला. तब्बल २५ वर्षानंतर आता त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. जिथे कुठे गांधी घराण्याचा उमेदवार उभा असतो तिथे भाजप आपला उमेदवार देतोच. डाव्यांचे वर्चस्व असलेल्या केरळमध्ये पाय रोवण्याचा भाजप अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अजूनही अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र तिथे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने सोडलेला नाही. त्यामुळेच वायनाड मतदारसंघात प्रियंका गांधी यांच्याविरोधात भाजपने एका इंजिनिअर महिलेला निवडणूक मैदानात उतरवले आहे. तिच्या नावाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे.
नाव्या प्रथमच लोकसभेच्या रिंगणात…
नाव्या हरिदास असे भाजपच्या महिला उमेदवाराचे नाव आहे. 39 वर्षीय नाव्या या व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांचे पती शोभीन श्याम आहे. नाव्या यांनी केएमसीटी इंजिनियरिंग कॉलेजमधून 2007 मध्ये बी.टेक केले. त्या भाजप महिला मोर्चाचे राज्य महासचिव आहेत. 2021 मध्ये केरळमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोझीकोड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी नशिब आजमावले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. तरीही भाजपने त्यांना पुन्हा वायनाड लोकसभेतून उमेदवारी दिली. एक महिला चेहरा, महिलांच्या प्रश्नावर लढणारी तरुण राजकारणी म्हणून भाजपने त्यांना प्रोेजेक्ट केले आहे. नाव्या यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांची मालमत्ता १ कोटी ३० लाख रुपयांच्या जवळपास आहे. मात्र त्यांच्यावर १ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज आहे. कोझिकोड महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांची ओळख आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेत्या, बीजेएमएमच्या राज्य सरचिटणीस आदी जबाबदाऱ्याही त्या सांभाळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रथमच नाव्या उतरल्या असल्या तरी प्रियंका गांधींसोबत त्यांची लढत असल्यामुळे नाव्या यांचे नाव देशभर माहित झाले आहे. आता या निवडणुकीत त्या प्रियंका यांना कितपत लढत देऊ शकतात.. ते २३ नोव्हेंबरला कळेलच.