लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरने भल्याभल्यांचे धाबे दणाणले. महायुतीच्या ज्या उमेदवारांच्या विजयाची पक्की गॅरंटी होती, त्यांनाही मतदारांनी धूळ चारली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवारांची कधी नावेही मतदारांनी एेकली नाही तेही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याचे कारण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याबद्दल या समाजात सरकारविषयी असलेला रोष. आता विधानसभेलाही याच पॅटर्न चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर बहुतांश नेते पक्षाच्या भूमिकेची वाट न पाहता आपापली आमदारकी सुरक्षित करण्यासाठी मनोज जरांगेंची भेट घेऊन प्रयत्न करत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरचे पालकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे पूत्र माजी खासदार सुजय विखे पाटील. ओबीसी मतदारांना खूश करण्यासाठी सुजय यांनी अलिकडेच पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली. त्यामुळे मराठ्यांचा रोष वाढला. आता हा रोष कमी करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. असे दोन्ही डगरीवर हात ठेवण्यामागे काय अाहे विखे पाटलांचे राजकारण जाणून घेऊ…
‘नगर म्हणजे विखे अन विखे म्हणजे नगर’…
नुकतेच नामांतर झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यावर विखे पाटील घराण्याचे अनेक वर्षांपासूनच वर्चस्व आहे. स्वत: राधाकृष्ण विखे पाटील सध्या मंत्री आहेत. त्यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हेही खासदार, केंद्रात मंत्री होते. राधाकृष्ण विखे पाटील यांचे डॉक्टर पूत्र सुजय हेही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले होते. पाच वर्षापूर्वीपर्यंत काँग्रेसमध्ये असलेल्या विखे पिता- पूत्रांनी बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखून २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय हे निवडून आले तर राहता- शिर्डी या आपल्या पारंपारिक मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हेही सातत्याने निवडून येत अाहेत. नगर म्हणजे विखे अन विखे म्हणजे नगर असे एक राजकीय समीकरणच बनले आहे. पण २०२४ च्या लाेकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांना नगर लोकसभेतून मतदारांनी पराभवाचा धक्का दिला. यामागे अनेक कारणे आहेत, पण महत्त्वाचे कारण सांगितले जाते ते म्हणजे भाजपविरोधात असलेला मराठ्यांचा रोष. शेजारच्या बीड जिल्ह्यातही भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अशीच पराभवाची धूळ चाखावी लागली होती. याच पंकजा सुजय यांच्या प्रचारासाठी नगर जिल्ह्यात फिरल्याने मराठ्यांचा राेष अजूनच वाढला होता. त्याचा फटका विखेंना बसला.
अन् सुजय विखेंना बसला पराभवाचा झटका!
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे राज्यात मराठा व ओबीसी समाजाच मोठा संघर्ष सुरु झालाय. आता नगर जिल्ह्यातील बहूतांश मराठा समाज हा अधिकृतपणे कुणबी असल्याने त्यांना आधीपासूनच ओबीसीचे आरक्षण मिळते. या समाजाच्या जीवावरच विखेंनी आतापर्यंत यशस्वी राजकारण केले. पण यावेळी भाजपविरोधात सर्वच मराठा समाजाच संतापाची लाट असल्याने सुजय विखेंना पराभवाचा झटका बसला. आता या पराभवाने खचून न जाता सुजय यांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात लढण्याचे धाडस यांनी दाखवले आहे. दुसरीकडे त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने पुन्हा शिर्डी- राहात्यातून उमेदवारी दिलीच आहे. सुजय यांची उमेदवारी अजून जाहीर झालेला नाही,पण पक्ष आपली मागणी डावलणार नाही अशी त्यांना खात्री आहे.
सुजय विखे चांगलेच ट्रोल…
दरम्यानच्या काळात ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथे घेतलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दरवर्षीप्रमाणे यंदाही सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली. नगर जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटलेला असताना मराठा नेते असलेल्या विखेंनी ओबीसींच्या व्यासपीठावर हजेरी लावणे मराठा समाजाला आवडलेले नाही. त्यामुळे त्यांनी सुजय विखेंना चांगलेच ट्रोल केले. आता हा समाज अजून नाराज झाला तर त्याचा फटका संगमनेरमध्ये सुजयला व शिर्डी- राहत्यात आपल्यालाही बसू शकतो, हा धोका चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी आेळखला. मराठा समाजाच्या दृष्टीने सुजयने केलेली चूक सुधारण्यासाठी मग मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी एका रात्री मनोज जरांगेंची आंतरवली सराटी गाठली. सरकारचे दूत म्हणून ते चर्चेसाठी गेले असे भासवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या चर्चेमागे मुलाची व आपल्या विजयाची चिंता विखेंना जास्त वाटत होती. नगर जिल्ह्यातील मराठा समाजाचा आपल्याविरोधातील रोष कमी करण्यासाठी व पिता- पुत्रांची आमदारकी सुरक्षित करुन घेण्यासाठी विखेंनी ही खेळी खेळल्याचे बोलले जाते. नगर जिल्ह्यात वंजारी व ओबीसी मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे सुजय यांनी एकीकडे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला मान दिला. विधानसभेलाही पंकजा मुंडे या विखेंच्या प्रचाराला येतील. अन् दुसरीकडे मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी विखे पाटील जरांगेंना भेटले.. असे दोन्ही डगरीवर हात ठेऊन विखे पिता- पूत्रांचे राजकारण चालू आहे.