कबर, कामरा अन् आता कुत्र्यावरुन राजकारण

जनतेला भेडसावणाऱ्या मुळ गंभीर प्रश्नांपासून लोकांचे लक्ष भरकटवायचे असेल तर दुसरे कुठले तरी निरर्थक मुद्दे शोधून काढायचे किंवा इतिहासातील जुने वाद उकरुन काढायचे व त्यावरुन राजकारण तापवायचे.. ही आता महाराष्ट्राची राजकीय परंपराच बनत चालली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण औरंगजेबाची कबर जेसीबीने हटवायची का तिचे संवर्धन करायचे या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांमधील संघर्ष पाहिला. शेतकरी कर्जमाफीपेक्षा या मुद्द्यावर चर्चेसाठी जास्त वेळ खर्ची पडला. अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून केलेल्या टीकेवरुन वातावरण तापले. अन‌् आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यावरुन राजकारण सुरु झाले आहे. त्यावरुन वेगवेगळे समाज, व संघटना आपापले राजकीय हेतू साध्य करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत… काय आहे या वादाची पार्श्वभूमी आणि काय होईल याची फलनिष्प्रती.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…

रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याची मागणी…

या वादाची सुरुवात कशी झाले ते आपण आधी पाहू या.. राज्यसभेचे माजी खासदार व रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वात आधी रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी पुरातत्व विभाग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. त्यात म्हटले की, ‘शिवकालीन इतिहासात या वाघ्या कुत्र्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ सापडत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही या समाधीबद्दल किंवा वाघ्या कुत्र्याबद्दल कोणतीही ऐतिहासिक माहिती किंवा पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी एका कल्पनेतल्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं म्हणजे हे महाराष्ट्राचं दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महाराजांशी केलेली घोर प्रतारणा आहे.

संभाजीराजेंची पत्रातून मागणी…

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्ष पूर्ण होण्याआधीच ती हटवण अत्यंत आवश्यक अाहे,’ अशी मागणी संभाजीराजेंनी आपल्या पत्रात केली. संभाजीराजेंच्या मागणीला पाठिंबा देत संभाजी ब्रिगेडनेही या वादात उडी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी तर राज्य सरकारला १ मेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत जर हा पुतळा काढला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तो हटवू,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. वाघ्या या पाळीव कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीत उडी घेतली असल्याचे म्हटले जाते. त्याच्या स्मरणार्थ ही वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर उभारली असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी 1906 मध्ये इंदूरचे राजे, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज तुकोजी होळकर यांनी देणगी दिल्याचेही समाधी स्थळावर नोंद आहे. त्यामुळे धनगर व ओबीसी समाजाचा ही समाधी हटवण्यास विरोध आहे. यापूर्वीही २०११ मध्ये हा वाद उफाळला होता तेव्हा संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा हटवला होता. पण त्यानंतर धनगर समाजाच्या भूमिकेनंतर तो परत आणून बसवण्यात आला. आताही ओबीसी संघटनांनी छत्रपती संभाजी राजे व संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेला विरोध करुन वाघ्याची समाधी रायगडावरच राहू द्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे.

सरकारचे अद्यापही मौनच…

धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध केला. गरज पडली तर यासाठी तीव्र आंदोलन करू, न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष तीव्र झालेला असताना पुन्हा वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावरुन दोन समाजात संघर्ष तीव्र होऊ नये या उद्देशाने सरकारने याबाबत अजून तरी मौन बाळगणे पसंत केले आहे. वाघ्या कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या चितेवर उडी घेऊन स्वत:चे बलिदान दिले होते, ही एक दंतकथा असल्याचे संभाजीराजेंचे म्हणणे आहे. शिवकालिन इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनीही हा दावा योग्य असल्याचे म्हटले आहे. इतक्या वर्षांच्या कालावधीत कुत्र्याच्या स्मारकाचा पुरावा कुठेच उपलब्ध झालेला नाही. उलट, स्मारक नव्हतं असं सांगणारे अनेक लिखित आणि फोटो पुरावेही उपलब्ध आहेत असे सावंत यांचे म्हणणे आहे. 1936 ला रायगडावर या कुत्र्याचं स्मारक बांधलं गेलं असं तिथला शिलाफलक सांगतो. या शिल्पासाठी इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी अर्थसाह्य केल्याचे इतिहास अभ्यासक मान्य करतात. पण त्याकाळी होळकर संस्थानकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. पण जर हा कामासाठी निधी दिला तर ब्रिटिश आपल्यावर रागावतील म्हणून होळकरांनी स्मारक समितीतील लोकांच्या आग्रहास्तव कुत्र्याच्या समाधीला निधी दिला, असे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे म्हणणे आहे.

भिडेंच्या वक्तव्याने नव्या वादाला फोडणी…

छत्रपतींच्या गड किल्ल्यात सातत्याने राहून महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवणारे शिवप्रतिष्ठाने हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे मात्र कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी अमान्य करतात. ते म्हणाले, ‘संभाजी राजे म्हणतात ते पूर्णपणे चुकीचे आहे. वाघ्या कुत्र्याने महाराजाच्या चितेत उडी घेतली होती हे पूर्णपणे सत्य आहे. मी त्याबाबत वाचलेही आहे. त्यामुळेच स्मारक केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे. याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मत बदलणाऱ्या माणसांना माझे मत पटणार नाही पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेले नाही’ असा टोलाही भिडेंनी लगावला. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे नेला,’ अशी जोडही त्यांनी दिली. त्यामुळे आता भिडेंच्या वक्तव्यावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

उदयनराजे भोसलेंनी खोडून काढला राणेंचा मुद्दा…

आतापर्यंत सत्ताधारी पक्षाचे नेते यावर मौन बाळगून हाेते. पण संभाजी भिडेंची प्रतिक्रिया आल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी मात्र भिडेंच्या भूमिकेवर टीका केली. सध्या आंब्याचा सिझन आला आहे. त्यामुळे संभाजी भिडे बेताल बरळत आहेत. त्यांनी बहुजन समाजातील पोरांना हाताशी धरून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका मिटकरी यांनी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्माचे लोक सुखाने नांदत होते. शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते. रयतेचे राजे होते. सर्वांनीच राजा म्हणून त्यांचे नेतृत्व स्वीकारले होते, असे सांगत भिडे यांचे वक्तव्य खाेडून काढले. यापूर्वी भाजपचे नेते व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता, असा दावा केला होता. पण खुद्द छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीच तो खाेडून काढला होता.