महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राज्य सरकारने मागील ३ मंत्रिमंडळ बैठकांत निर्णयाचा धडाका लावून अनेक समाजांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. मात्र या सर्व गदारोळात थोडेशे मागे पडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मेळावा घेऊन आपला पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. आता राज यांनी २८८ मतदारसंघात सक्षम उमेदवार तरी मिळतील का? हा प्रश्न आहेच. आणि मिळालेच तर वारंवार भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाला मतदार कितपत प्रतिसाद देतील याबाबत शंकाच आहे. हे खरे असले तरी राज ठाकरेंनी मेळाव्यात जे मुद्दे मांडले ते खरोखरच सर्वसामान्यांच्या मतदारांना भावणारे होते… कुणाचीही भीडभाड न ठेवता त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेण्याचे धाडस दाखवले.
राज ठाकरेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग…
लाडकी बहिण, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परखड वास्तव मांडून दिशाभूल करणाऱ्या सरकारचा समाचार घेतला. लोकांना ते आवडते, पण अशा परखड माणसाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देण्याची रिस्क राज्यातील जनता घेत नाही. याचे कारण म्हणजे मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरे कधीच एका भूमिकेवर ठाम राहिलेले नाहीत. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका बदललेली असते. तरीही त्यांच्या भाषणाकडे करमणुकीचे साधन म्हणून जनता पाहतेय. मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता ना कुणाची युती ना कुणाशी आघाडी, मनसे स्वबळावर लढणार अशी घोषणा त्यांनी या मेळाव्यात केली, त्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला. राज्यातील २८८ पैकी किती आणि कोणत्या जागा लढवणार यावर मात्र राज यांनी भाष्य केले नाही. मात्र त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे ते या निर्णयावर तरी कितपत ठाम राहतात याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करणाऱ्या राज यांनी आता मात्र ‘मनसेला सत्ता दिली तर महाराष्ट्र कधी दिल्ली पुढे झुकणार नाही,’ असा टोला त्यांनी मोदी- शाह यांच्या भाजपला लगावला.
मुख्यमंत्र्यांचा उल्लेख पुष्पा असा…
‘उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नाहीत. सारखे अब्दाली अफजलखान असे बोलत असतात, सारखे वाघ नखं काढत असतात. महाराष्ट्राबद्दल काही तरी बोल..’ असे सांगत त्यांनी आपल्या भावाचीही खिल्ली उडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख तर राज यांनी अगदी अॅक्शन करुन “पुष्पा ’ असा केला. तिकडे पुष्पाचे वेगळेच सुरू आहे, मी असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही. येणाऱ्या पिढ्यांवर काय संस्कार करणार आहोत. महाराष्ट्र कोणत्या दिशेने येणार आहोत? असे सवालही राज यांनी केले. शरद पवार व अजितदादांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणतात पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केले. 1978 ला काँग्रेस फोडली, 1991 ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता. अजित पवार भाजपमध्ये येण्याआधी मोदी म्हणतात 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू, पण त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी मंत्रिमंडळात टाकलं हे का होतय. आता ते गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहित नाही. भाजप त्यांना स्वीकारतो तरी कसा ? असे सर्वसामान्यांच्या मनातील अनेक प्रश्न राज यांनी व्यासपीठावरुन विचारण्याचे धाडस दाखवले.
त्यामुळेच मी लोकांना परवडत नसेल..!
लाडक्या बहीण योजनेवरूनही राज यांनी सरकारला फटकारले. लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर पैसे येणार नाही. जानेवारी, फेब्रुवारीत पगार द्यायला सरकारकडे पैसे नसतील. महिलांच्या हातांना काम द्या, कामातून त्या पैसे उभे करतील. त्यांना सक्षम बनवा. एवढ्या सक्षम महिला आहेतच. फुकट कसले पैसे देताय. राज्यात कोणी काही मागत नाही, यांना फुकट दिनाच्या सवयी लावायच्या आहेत एकदा सवय लागल्या तर इतर राजकीय पक्ष तेच करतील. राज्यात गुन्हे वाढले आहेत, लहान मुलींवर बलात्कार सुरू आहेत. राज्यात गेल्या वर्षी ९ हजारांवर वर मुली पळवल्या, हा समृद्ध महाराष्ट्र ? असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. हे खरं बोलण्याचं धाडस फक्त राज ठाकरे करू शकतो. त्यामुळेच मी लोकांना परवडत नसेल. समुदात पुतळा उभा करायचा असेल तर किमान 15 ते 20 हजार कोटी खर्च करावे लागेल. समुद्रात पुतळा उभा करण्यापेक्षा ताे पैसा गडकिल्ल्यांवर खर्च करा असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.