विधानसभा निवडणुकीत अगदीच सुपडा साफ झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निकालाच्या दोन महिन्यानंतर आपल्या मनातील सल कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. यात मनसेच्या पराभवाचे फारसे दु:ख दिसले नाही, कदाचित त्यांना तो अपेक्षितच असेल. पण लोकसभेत दमदार कामगिरी करणारी काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इतके कमी आमदार कसे काय विजयी झाले? हा प्रश्न मात्र त्यांनी गांभीर्याने उपस्थित केला. वारंवार भूमिका बदलणारे नेते म्हणून राज ठाकरे बदनाम झाले आहेत, याच टीकेला प्रत्त्युत्तर देताना राज यांनी पत्रकारांचाही समाचार घेतला. ‘त्यांनी केले ते प्रेम अन् आम्ही केला की बलात्कार’ असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी इतर पक्षही भूमिका बदलतात मग मनसेने बदलली तर त्यात वागवे काय? असा प्रश्न उपस्थित करुन राज ठाकरेंनी स्वत:लाही इतरांच्या रांगेत आणून बसवले आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी त्यांनी केलेल्या भाषणाचा रोख पाहता आगामी मनपा निवडणुकीत भाजपशी युतीचे सर्व दोर त्यांनी तोडून टाकले आहेत, असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता मनसेची पुढची दिशा अन् दशा काय असेल याबाबत जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…
२०२४ या वर्षात महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या. एप्रिल- मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला धक्का देत काँग्रेस- राष्ट्रवादी व उद्धव सेनेच्या महाविकास आघाडीला भरभरुन कौल दिला. त्यांचे ४८ पैकी ३१ खासदार निवडून आले. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी राज ठाकरेंचा पाठिंबा भाजपच्या काहीच कामी आला नाही. त्यानंतर सहा महिन्यांनी झाल्या विधानसभेच्या निवडणुकात. या निवडणुकीतही मनसेशी युती करण्यास भाजप उत्सुक होती. पण राज ठाकरेंचा ताठरपणा आडवा आला. मनसेने स्वबळावर उमेदवार उभे केले. या वेळी प्रथमच राज ठाकरेंनी स्वत:चा मुलगा अमितलाही विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. पण मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. खुद्द अमित ठाकरे व शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांच्या लढाईत उद्धव सेनेचा उमेदवार माहिममधून निवडून आला. गेली दोन निवडणुकात मनसेचे पानिपत झालेले होेत. पण त्यांचा किमान एक तरी आमदार निवडून यायचा. यावेळी मनसे अगदी शून्यावर बाद झाली, त्याचा राज ठाकरेंना मोठा धक्का बसला. भाजपशी युती केली असतील तर चार- दोन जागा तरी निवडून आल्या असत्या, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागली. एकूणच राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. त्यातून आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करणाऱ्यांचा समाचार घेण्याची ठाकरी वृत्ती राज ठाकरेंनी जोपासली.
शिंदेंविषयी राज ठाकरेंच्या मनात राग?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी राज ठाकरेंनी मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. आगामी मनपा निवडणुकीची ही तयारी असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे, भाजप व अजित पवार यांची नवीन महायुती अस्तित्वात आल्यापासून या नेत्यांचा राज ठाकरेंशी स्नेह वाढत आहे. भाजपला मुंबईत उद्धव ठाकरेंवर मात करण्यासाठी मनसेची गरज आहे. एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्री झाल्यापासून राज ठाकरेंशी अनेकदा भेटले, कुणीतरी ठाकरे अापल्या शिवसेनेसोबत असावा असा त्यांचा प्रयत्न राहिला.
पण विधानसभेच्या निकालाने हे सारे गणितच बिघडले. शिंदेंनी अमित ठाकरेंसाठी माहिम मतदारसंघ न सोडल्याचा राग ठाकरेंना राग आहे. तर भाजपशी युती न केल्याची खंतही त्यांना आहे. याच रागातून राज यांनी नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या नेतृत्वावर टीका करत ईव्हीएमवरही शंका उपस्थित केल्या आहेत. एकूणच राज ठाकरेंच्या भाषणाचा एकूण रोख पाहता त्यांना मनसेच्या पराभवापेक्षा काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पराभवाचा जास्त धक्का बसल्याचे दिसते. ज्या काँग्रेसचे लोकसभेला १३ खासदार निवडून येतात, त्यांना सहाच महिन्यात इतके अपयश कसे येईल? एका खासदाराच्या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असतात. त्यापैकी निम्मे जरी पकडले तरी त्यांचे किती आमदार निवडून यायला हवेत? पण इथे आले किती तर १५ , हे कसे शक्य आहे?
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे वाढवले मनोबल…
ज्या शरद पवार यांच्या जीवावर आजपर्यंत अजित पवार आणि छगन भुजबळ राजकारण करत आले. त्या शरद पवार यांच्या लोकसभेत १० पैकी ८ जागा निवडून येतात, त्यांचे फक्त १० आमदार निवडून आले? ही न समजण्याची गोष्ट आहे. अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले, ही सर्वात आश्चर्याची गोष्ट असल्याचे ते मानात. लोकसभेत ज्या अजितदादांचा एकच खासदार निवडून येतो, त्यांचे इतक्या मोठ्या संख्येने आमदार कसे विजयी होतात? चार -पाच महिन्यातच मतदारांचा कौत्यल इतका बदलू शकतो? असा प्रश्न विचारुन राज ठाकरेंनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तर सात- सात वेळा निवडून आलेले नेते. किमान ४० -५० हजार मतांच्या लीडने ते विजयी व्हायचे, त्यांचा १० हजार मतांनी पराभव कसा होतो? ही उदाहरणे सांगून राज म्हणाले, मतदारांनी मनसेलाही मते दिली आहेत फक्त ती आपल्यापर्यंत पाेहोचलेली नाहीत. असे सांगून राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.
राज ठाकरेंच्या ईव्हीएमविषयी शंकेंने सगळीकडेच आश्चर्य व्यक्त…
कालपर्यंत काँग्रेस- राष्ट्रवादी- उद्धव सेनेचे नेते ईव्हीएमवर टीका करायचे तेव्हा राज ठाकरे त्यांची टिंगल करायचे, पण आता त्यांनाच ईव्हीएमबाबत शंका येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात वारंवार बदलणारी भूमिका हेच राज ठाकरेंच्या अपयशाचे कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण स्वत: राज ठाकरेंना अजून तरी हे मान्य नाही. उलट आपल्या बदलत्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांचाच ते समाचार घेतात. इतर पक्ष भूमिका बदलतात ते चालते मग मी का नाही? असा प्रश्नही ते सरळ विचारतात तेव्हा कार्यकर्त्यांच्या भुवयाही उंचावतात. एकूणच, लोकसभेला भाजपला पाठिंबा व विधानसभेत स्वबळ आजमावणारी मनसे मनपा निवडणुकीतही स्वबळावरच लढण्याचे संकेत राज यांनी दिले आहेत. भाजपच्या नेत्यांवर, थेट मोदींवर टीका करुन त्यांनी आपली पुढची दिशा स्पष्ट केली आहे.
सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या अजित पवारांवर जे मोदी टीका करतात, त्यात अजित पवारांना काही दिवसांत महायुतीत घेतले जाते. आदर्श घोटाळ्यात फडणवीस व इतर भाजप नेत्यांनी ज्या अशोक चव्हाणांवर आरोप केले त्या चव्हाणांनाच भाजपात घेतले. राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकरसिंह, बबनराव पाचपुते असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरेाप केले व नंतर त्यांनाच भाजपात घेतले. ही भाजपच्या दुटप्पी भूमिका अधोरेखित करताना मग आपण भूमिका बदलली तर बिघडले कुठे? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. एकूणच, इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी काही तरी करणारा पक्ष म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जात होते. पण जर आता ते स्वत:च इतर राजकीय पक्षांच्या पंगतीत मनसेला नेऊन बसवणार असतील तर मग राज ठाकरेंच्या पक्षाची दिशा ठरवण्यापेक्षा दशा काय होईल? यावरच जास्त चिंतन करण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.