२०२२ मध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार फोडून भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यांचे सरकारही पायउतार केले. २०२३ मध्ये अजित पवारांसह ४० आमदार फोडून शरद पवारांना धक्का दिला. त्यांची बारामतीही काबिज करण्याचा प्रयत्न केला. पण तो सफल झाला नाही. उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये भाजपला धोका देऊन काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मदतीने उभारलेले सरकार भाजपच्या धुरिणांनी पाडून टाकले व पुन्हा अडीच वर्षातच महायुतीचे सरकार आणले. हे सारी किमया महाशक्तीच्या जोरावर घडवून आणली. तरीही सत्ताधारी पक्षातील नेते, पदाधिकारी भाजप का सोडत आहेत? हा प्रश्न आहे. पण महाशक्तीने केलेली ही ‘किमया’च निष्ठावंतांच्या मुळावर आल्याने ते पक्षापासून दूर जाण्यास भाग पाडत आहे, असे जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याचे उदाहरण म्हणजे, २०२२ मध्ये शिवसेना- भाजप युतीचे सरकार पुन्हा सत्तारुढ झाले तेव्हा दोन्ही पक्षांना प्रत्येकी १०- १० मंत्रिपदे मिळाली. नंतरच्या विस्तारात दोन्ही पक्षांना अजून १०-१० मंत्रिपदे मिळतील अशी अपेक्षा होती. विधान परिषदेच्या आमदारकीतही समसमान वाटा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र २०२३ मध्ये अजितदादांचा सरकारमध्ये शिरकाव झाला अन् भाजपच्या वाट्याची १० मंत्रिपदे त्यांच्याकडे गेली. त्यामुळे भाजपचे १० आमदार उपेक्षित राहिले.
म्हणून राजू शिंदे यांनी सोडली भाजपची साथ…
तिन्ही पक्षांच्या वादात व रस्सीखेचीत इतर मंत्रिपदाचे वाटपही रखडले. त्यामुळे भाजपचे अनेक निष्ठावंत सत्ता मिळूनही उपेक्षितच राहिले. याउलट दुसऱ्या पक्षातून आलेल्या अशोक चव्हाणांसारख्या ‘उपऱ्यां’ना पक्षाने लगेचच खासदारकी दिली. अशी अनेक उदाहरणे आहेत. यामुळेच १० वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता अस्वस्थ आहे. भाजप स्वबळावर वाढला पाहिजे, पक्ष स्वबळावर सत्तेत आला पाहिजे, .. भलेही त्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागली तरी चालेल अशी जुन्या भाजप कार्यकर्त्यांची व संघाचीही भूमिका आहे. पण सत्तेसाठी उतावीळ झालेल्या भाजपच्या काही नेत्यांनी जी पक्षफोडाफोडी करुन सत्तेत वाटेकरी निर्माण केले, त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या संधी हिरावल्या जात आहेत, अशी निष्ठावंतांची भावना आहे. याच नाराजीतून संभाजीनगरच्या राजू शिंदे यांनी सत्तेत असूनही भाजप सोडला.
असा राहिला राजू शिंदेंचा प्रवास…
राजू शिंदे गेल्या २५ वर्षांपासून भाजपात सक्रिय आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे ते निष्ठावंत मानले जातात. भाजपने त्यांना नगरसेवक, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशी पदे दिली. त्यांनीही पक्षासाठी झोकून देऊन काम केले. राजू शिंदेंना आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. पण शिवसेनेशी युतीमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाहीए. म्हणून २०१९ मध्ये त्यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात बंड करुन अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना ४२ हजार तर शिरसाटांना ८० हजार मतेे पडली. यावेळी आणखी जोर लावून राजू शिंदेंनी पश्चिम मतदारसंघात तयारी केली, पण युतीत ही जागा शिंदेसेनेेला गेल्याने त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेला सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर चांगले वातावरण निर्माण झाले आहे, याची खात्री पटल्याने मग आता शिंदेंनी उद्धव सेनेत प्रवेश केला. जो पक्ष विधानसभेपर्यंत संपेल, अशा वल्गना भाजप नेते करत होते त्यांच्याच पक्षाचे नेते आता उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारत आहेत. उद्या राजू शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल न मिळेल, ते विजयी होतील न होतील.. तो भाग वेगळा. पण महायुतीत शिंदे गट व अजितदादा गट आल्याने आपली मुस्कटदाबी होतेय, अशी जी अस्वस्थता राजू शिंदेंसारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे ती आता विधानसभेच्या तोंडावर बाहेर पडत आहे. आज संभाजीनगरमध्ये राजू शिंदेंनी भाजपला जो धक्का दिलाय तो राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील अस्वस्थ भाजप नेता, पदाधिकारी देईल यात शंका नाही.
अजित दादांना सोबत घेऊनच लढण्याचा निर्धार…
अजित पवारांना सोबत गेल्याची किंमत भाजपला लोकसभेत मोजावी लागली. त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते मित्रपक्ष शिंदेसेनेनेही भाजपचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण तरीही विधानसभेला अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचा निर्धार भाजपने केला अाहे. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपातही अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार यात शंकाच नाही. लोकसभेच्या जागावाटपातही तो झाला, पण त्यावेळी विजयाचे मेरिट लक्षात घेऊन मित्रपक्षांना आमच्या जागा देत आहोत, असे भाजप सांगत होते. पण हे ‘मेरिटबाज’ लोक निवडूनच आले नाहीत. मग पराभूतच व्हायचे होते तर मग हा जुगार आपल्या निष्ठावंतांच्या नावावर भाजपने का नाही खेळला? असा त्यांचा सवाल आहे. मात्र याचे उत्तर ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ना अमित शाहंकडे. म्हणूनच आता या नेत्यांवर विश्वास न ठेवता भाजपचे निष्ठावंत पर्यायाची चाचपणी करुन नवीन वाट निवडण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि लोकसभेचा निकाल पाहता त्यांना आपल्या विचारांशी जुळणारा व भविष्यात यशाची खात्री देणारा उद्धव सेनेपेक्षा दुसरा जवळचा पक्ष नसेल.