Rajyasabha Election : दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
मुंबई : महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसने १४ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेला व फाटाफुटीच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी पक्षाने अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेले दलित समाजाच्या नेत्याला (Dalit Leader) संधी दिल्याचे मानले जाते.
विधानसभेतील आमदारांमधून या ६ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भाजपचे ३, शिंदेसेनेचा व अजित पवार गटाचा प्रत्येकी १ व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसने आपल्या वाट्याचा एक उमेदवार जाहीर केला आहे. महायुतीनेही आपल्या कोट्यानुसार ५ उमेदवार जाहीर केले तर १५ फेब्रुवारी रोजीच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या शह- काटशाहच्या राजकारणाचा भाजपने पुन्हा कित्ता गिरवून चौथा उमेदवार दिला तर मात्र २७ फेब्रुवारी रोजी मतदान घ्यावे लागेल.
कोण आहेत हंडोरे?
चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे माजी महापौर, चेंबूर मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
* हंडोरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ दलित पॅंथरमधून झाला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा भारिप- बहुजन महासंघ, रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्षात मार्गक्रमण करुन त्यांनी काँग्रेसचा हात पकडला होता.
* २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यावेळी काँग्रेसचीच मते फुटल्याने हंडोरेंचा पराभव झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने पुन्हा एकदा दलित नेत्याला पसंती देऊन या व्होटबँकेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आक्रमक नेते म्हणून ओळख
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांची आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. मुंबई काँग्रेसमध्ये त्यांना जेव्हा जेव्हा दुय्यम वागणूक मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी पक्षाविरोधात आवाज उठवताना कुणाचीही भीडभाड ठेवली नव्हती. शिवसेनेतील बंडानंतर ते शिंदेसेनेत जाणार असल्याच्याही चर्चा होत्या. आता अशोक चव्हाणांसोबत तेही पक्षांतर करणार असल्याची चर्चा होती. मात्र याच दरम्यान काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केल्याने या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
काँग्रेसचा विजयाचा दावा Congress claims victory
राज्यसभा निवडणुकीत सहापैकी प्रत्येक जागेवर विजयासाठी पहिल्या पसंतीची ४१ किंवा ४२ मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. अशोक चव्हाण गेल्यानंतर काँग्रेसकडे आता ४३ मते आहेत. त्यामुळे त्यांच्या जोरावर हंडोरे सहज निवडून येऊ शकतात, असा विश्वास पक्षाला वाटतो. मात्र भाजपने २०२२ च्या निवडणुकीप्रमाणे ‘क्रॉस वोटिंग’चा Congress cross voting गेम खेळला तरी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समर्थक आमदारांचा पाठिंबाही आपल्यालाच मिळवून कोणत्याही परिस्थितीत हंडोरे यांना निवडून आणायचेच अशी रणनिती काँग्रेसने आखली आहे.
[…] […]