राज्यसभा निवडणूक : केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकरांना भाजप देणार डच्चू

मुंबई : राज्यसभेच्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम (Rajyasabha election in Maharashtra) जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या रिक्त जागांसाठीही निवडणूक होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यांनतर पहिलीच राज्यसभा निवडणूक होत असून त्यात संख्याबळानुसार महायुतीचे ५ व काँग्रेसचा १ खासदार निवडून येण्याची शक्यता दिसत आहे.

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे या राज्यसभा सदस्यांची निवड होणार आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), प्रकाश जावडेकर (Prakash jawadekar), व्ही. मुरलीधरन (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (उद्धव सेना) आणि विद्या चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट) या खासदारांच्या जागा रिक्त होत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेत २८८ आमदार आहेत. त्यातील एक जागा रिक्त असल्याने एकूण २८७ आमदार या निवडणूकीत मतदान करतील. राज्यसभेच्या एका जागेवर निवडून येण्यासाठी ४२ आमदारांच्या मतांचा कोटा (42 Votes quota For Rajya sabha election) ठरवण्यात आला आहे. भाजपकडे १०४ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे २ खासदार सहज निवडून येऊ शकतात. तर भाजपला पाठिंबा देणारे १० अपक्ष, शिंदेसेने सोबत आलेले १० अपक्ष व इतर छोट्या मित्रपक्षांच्या जोरावर तिसरी जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे डावपेच सुरु आहेत. अजित पवार गटाकडे ४२ तर शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत. त्यामुळे थोडा जोर लावून तेही प्रत्येकी एक- एक जागा निवडून आणू शकतात. म्हणजे महायुतीचे ५ खासदार निवडून येऊ शकतात.

मविआत काँग्रेसच फायदेशीर

शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने या दोन्ही पक्षांकडे अनुक्रमे १५ व १२ आमदार राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा स्वतंत्र तर सोडाच पण संयुक्त उमेदवारही निवडून येऊ शकत नाही. काँग्रेसकडे ४५ आमदारांचे संख्याबळ आहे. ते एक उमेदवार सहज निवडून आणू शकतात. काँग्रेसकडे जास्तीची असलेली ३ मते व मविआतील इतर छोट्या पक्षांची मतेही आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते क्रॉस वोटिंगचीही खेळी खेळू शकतात. असे झाले तर भाजप, काँग्रेस आपले संख्याबळ राज्यसभेत कायम ठेऊ शकते. बंडखोरीत उदयास आलेली शिंदे सेना व अजित पवार गट यांना प्रत्येक एका जागेचा फायदा होऊ शकतो. तर पक्षफुटीमुळे उद्धव सेना व शरद पवार गटावर एक-एक जागा गमावण्याची नामुष्की ओढावू शकते.

भाजप : तरुण चेहऱ्यांना देणार संधी (BJP will give opportunity to youth in Rajya Sabha)

ज्येष्ठांचे सभागृह असलेल्या राज्यसभेत आजवर बहुतांश वेळा ज्येष्ठ नेत्यांनाच संधी देण्याची सर्वच राजकीय पक्षात परंपरा आहे. मात्र यावेळी भाजपने हा पायंडा मोडून तरुणांना राज्यसभेत पाठवण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देऊन भाजप ५० वर्षे वयाच्या आतील नेत्यांना संधी देऊ शकते. (Narayan Rane, Prakash Javadekar have no chance in Rajya Sabha again)

शिंदे सेना व जित दादा गट सोबत आल्याने राज्याच्या सत्तेपासून भाजपचे अनेक नेते उपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून भाजप करु शकते. किंवा ज्या विद्यमान खासदारांचे तिकिट कापायचे आहे त्यापैकी काहींना राज्यसभेवर पाठवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो.

शिंदे सेना : जागा एक, इच्छूक अनेक

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा नुकतेच शिंदे सेनेत आले आहेत. त्यांना या पक्षाकडून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशी पक्षात चर्चा आहे. मात्र शिंदे सेनेत सध्या १३ खासदार आहेत, त्यापैकी काही जणांवर ‘नॉन परफॉर्मेन्स’चा शिक्का मारुन यंदा तिकिट नाकारले जाऊ शकते किंवा भाजप त्यांचा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेऊ शकते. अशा मावळत्या खासदाराची राज्यसभेवर वर्णी शिंदे लावू शकतात.

अजित पवार गट : मुंबई की विदर्भ हा पेच

शरद पवारांची साथ सोडून अनेक दिग्गज नेते अजित पवारांसोबत आले आहेत. त्यापैकी कोणाची राज्यसभेवर वर्णी लावायची हे निवडण्याचे दादांसमोर आव्हान असेल. मात्र मुंबई किंवा विदर्भ या भागात पक्षाचे बळ कमी असल्याने पक्ष बळकटीसाठी तेथील नेत्याला राज्यसभेवर संधी देण्याचा विचार दादा करु शकतात.

काँग्रेस : निष्ठावंत की कुंपनावरचे

शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता काँग्रेसचा नंबर असल्याचे इशारे भाजप नेते देत आहेत. त्यामुळे राज्यसभेवर संधी देताना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला नेता निवडायचा की भाजपकडे आकर्षित होऊन सध्या पक्षांतरासाठी कुंपनावर उभा असलेल्या नेत्याला संधी द्यायची या पेचात काँग्रेस हायकमांड अडकलेली आहे. मात्र सर्व ज्येष्ठ नेत्यांचा कौल हा निष्ठावंतांनाच असल्याने एखाद्या जुन्या नेत्याला हा पक्ष संधी देऊ शकतो. महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचा एकही लोकसभा खासदार नाही. त्यामुळे विचारवंत किंवा थिंक टँकमधील नेत्याला संधी देण्यापेक्षा मासलिडर नेत्याचाच विचार पक्ष करु शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics