अपात्रतेला घाबरुन प्रफुल पटेलांचा ४ वर्षे आधीच राज्यसभेचा राजीनामा; पुन्हा नव्याने अर्ज भरुन बिनविरोध खासदार

Rajyasabha Election- Praful Patel scared of disqualification action

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा १५ फेब्रुवारी रोजी अखेरचा दिवस होता. भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), डॉ. अजित गोपछडे (Dr. Ajit Gopchade) व मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री प्रफुल पटेल (Praful patel) यांनी, शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा (Milind Deora) व काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे  (Chandrakanat Handore) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने सर्वांची बिनविरोध निवड झाली. पण २०२२ मध्ये राज्यसभेवर गेलेल्या प्रफुल पटेल (Praful patel) यांचा अजून ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनाच पुन्हा उमेदवारी का देण्यात आली,  दोनच वर्षात एका खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा सहा वर्षांसाठी ते त्याच सभागृहात नव्याने खासदार म्हणून का चालले आहेत या मागची कारणे आपण जाणून घेऊ या….

 

अशोक चव्हाण, प्रफुल पटेल, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडे, चंद्रकांत हंडोरे, मिलिंद देवरा राज्यसभेवर बिनविरोध

तटकरे म्हणाले तांत्रिक अडचण

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी १४ फेब्रुवारीला प्रफुल पटेल (Praful patel) यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी विद्यमान राज्यसभा खासदार असताना पुन्हा त्यांना उमेदवारी कशी दिली? या प्रश्नावर तटकरेंनी ‘तांत्रिक कारण’ एवढेच उत्तर दिले. मात्र खरे कारण आपल्या हाती लागले आहे ते खालीलप्रमाणे….

अपात्रतेची टांगती तलवार

शरद पवारांशी (Sharad Pawar) बंड करुन अजित पवारांसोबत ४० हून अधिक आमदार बाहेर पडले. प्रफुल पटेल (Praful Patel) व सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे अनुक्रमे राज्यसभा व लोकसभेचे खासदारही अजितदादांसोबत गेले. कालांतराने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षच अजितदादांच्या ताब्यात दिला. मात्र बंडानंतर शरद पवार गटाने दादांसोबत गेलेल्या आमदार, खासदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र विधिमंडळ संसदेत दिले आहे. आता विधानसभेत पक्षाच्या ५४ आमदारांपैकी ४१ आमदार दादांसोबत आहेत. बहुमताच्या आधारे या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. मात्र संसदेत उलटे चित्र आहे. लोकसभेत राष्ट्रवादीचे ५ खासदार आहेत. त्यापैकी तटकरे दादांकडे तर उर्वरित ४ शरद पवारांसोबत आहेत. बंडाच्या वेळी राज्यसभेतही पक्षाचे ३ खासदार होते, त्यापैकी एकटे पटेलच दादांसोबत गेले, उर्वरित दोघे पवारांसोबत राहिले. या सभागृहातील बहुमत पवारांकडे असल्याने त्यांचा व्हीप न मानल्याबद्दल पटेल व तटकरेंवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

तटकरेंचा कार्यकाळच संपला

आता लोकसभेच्या कार्यकाळ संपत आल्याने तटकरेंना ही भीती नाही. पटेल यांचा कार्यकाळ मात्र ४ वर्षे बाकी आहे. त्यापूर्वीच त्यांच्यावर अपात्रतेची नामुष्की ओढावू शकते. म्हणून या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नव्याने निवडून येण्याची खेळी प्रफुल पटेल यांनी खेळली आहे. त्यावेळचे सदस्यत्वच राहिले नाही तर मग कारवाई होणार नाही, असे आडाखे बांधले जात आहेत.

काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या : पटेल

चार वर्षे कार्यकाळ शिल्लक असतानाही पुन्हा राज्यसभेची उमेदवारी का घेतली? या पत्रकारांच्या प्रश्नावर पटेल (Praful patel) हसले. ‘राजकारणात दरवेळी नवीन काही तरी घडत असते. मात्र काही गोष्टी गुलदस्त्यातच राहिलेल्या बऱ्या. एवढे मात्र खरे की माझ्या उमेदवारीचा आणि अपात्रतेच्या कारवाईचा काहीही संबंध नाही. माझ्या उमेदवारीने पक्षात कुणावरही अन्याय झालेला नाही. कारण मी आता ज्या जुन्या जागेचा राजीनामा देणार आहे तिथे आमच्याच पक्षाचा दुसरा नेता निवडून येणार आहे. त्यामुळे तिथे अन्य एकाला संधी मिळणारच आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics