मला शिर्डीतून उमेदवारी द्या, खासदार लोखंडेना राज्यसभेवर घ्या; रामदास आठवलेंचा प्रस्ताव
प्रकाश आंबेडकर तुम्हीही भाजपसोबत या
शिर्डी : रिपाइंचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर्षीही शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. ‘माझे राज्यसभेची अजून दोन वर्षे बाकी आहेत. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना माझी राज्यसभेची जागा द्या आणि मला लोकसभेला शिर्डीतून लढण्याची संधी द्या’, असा फॉर्म्युला त्यांनी महायुतीला दिला आहे.
शिर्डीत पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की २००९ साली मी लोकसभेला शिर्डीतून पराभूत झालो असलो, तरी माझी शिर्डीबद्दल अजिबात नाराजी नाही. शिवसेेनेचे खासदार लोखंडे माझे चांगले मित्र आहेत. मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मी लोकसभेत यावे, ही देशातील लोकांची व माझीही इच्छा आहे. भाजपच्या वरिष्ठांकडे मी ही इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीला ४५ जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची गरज आहे. माझी राज्यसभेतील जागा खा. लोखंडे यांना देऊन मला शिर्डीतून संधी द्यावी. शिर्डीची जागा भाजपच्या कोट्यात आली, तर ती माझ्याच कोट्यात आल्यासारखी आहे. शिर्डीच्या जागेसाठी भाजप माझा नक्की विचार करील, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. शिर्डी मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी माझे चांगले संबध असल्याने, मला चांगल्या मतांनी निवडून येण्याची संधी असल्याचेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर, भाजपसोबत या
प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आल्यास चांगलेच, मात्र ते येणार नाहीत. तसेच, ते महाविकास आघाडीसोबतही जाणार नाहीत. त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची सवय आहे. सगळ्या जागांवर ते लढतील. महाविकास आघाडी त्यांचा अपमान करीत असल्याचा आरोपही आठवले यांनी केला.
https://missionpolitics.com/maharashtra-politics-do-not-attend-mva-meeting-prakash-ambedkar-appeal-to-vanchit-bahujan-aghadi/
शाहू महाराजांनी महायुतीत यावे
छत्रपती संभाजीराजे आमच्यासोबत असताना आम्ही त्यांना खासदार केलं. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीच्या तिकिटावर उभे राहून पराभूत होणे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी महायुती बरोबर यावे, असे आठवले म्हणाले.