शिवसेनेचे नेते रामदास कदम हे कोकणातील एक फायरब्रॅन्ड नेते. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता तोंडावर स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव. संयुक्त शिवसेनेत असताना अलिकडच्या काळात ते जेव्हा अडगळीत पडले होते तेव्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार करण्यासही त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. आता शिंदेसेनेत आहेत. तिथेही त्यांनी अनेकदा पक्षाच्या चुकीच्या निर्णयावर बोट ठेवलेय. आता मात्र त्यांन थेट मुख्यमंत्रीपुत्राच्या निर्णयालाच आव्हान देण्याचे धाडस केलेय. एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत यांनी आपल्या मेहुण्याला गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी केलीय. पण रामदासभाईंनी त्याला तीव्र विरोध केलाय. इतकेच नव्हे तर शिंदेंनी जर मेहुण्याला बळजबरीने उमेदवारी दिलीच तर शिवसैनिकच त्याला पाडतील, असा गर्भित इशाराही त्यांनी दिलाय.
शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांनी काही ऐकले नाही…
शिवसेनेचे जुने निष्ठावान नेते रामदासभाई कदम यांनी बंडानंतर एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले. मात्र जशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांची उपेक्षा झाली तशीच शिंदेसेनेतही त्यांना फार काही महत्त्व मिळाले नाही, ही खंत भाईंना नेहमीच वाटतेय. त्याचा संताप ते अधूनमधून बोलून व्यक्त करत असतात. भाईंना आता स्वत:च्या राजकीय कारकिर्दीपेक्षा मुलगा सिद्धेश कदम यांच्या कारकिर्दीची जास्त काळजी आहे. २०१९ मध्ये सिद्धेश दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. आता तेही वडिलांसोबत शिंदेगटात गेलेले आहेत. आपल्या मुलाला मंत्रिपद मिळावे यासाठी रामदासभाईंनी खूप प्रयत्न केले, पण शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही एेकले नाही. अखेर अलिकडेच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावर सिद्धेश यांची बोळवण करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही रामदासभाईंनी सिद्धेशसाठी वायव्य मुंबईतून गजानन किर्तीकर यांच्या जागी उमेदवारी मागितली होती, पण एकनाथ शिंदेंनी तीही दिली नाही. म्हणून ते सतत शिंदेंवर नाराज असतात. अधूनमधून मित्रपक्ष भाजप व अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचाही ते जाहीरपणे समाचार घेऊन आपल्याच पक्षाला अडचणीत आणत असतात.
तर रामदासभाई प्रचारात पायही ठेवणार नाही…
आता थेट मुख्यमंत्री पुत्राच्या निर्णयालाच रामदासभाईंनी आव्हान दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपूल कदम यांना गुहागरमधून उमेदवार देण्यासाठी श्रीकांत हे अाग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचा हट्ट म्हणून शिंदेसेना ही उमेदवारी फायनल करण्याच्या तयारीत आहे. मात्र रामदासभाईंनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. विपुल कदम यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल, असे वाटत नाही. अचानक उमेदवारी दिली तर नियमित काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होईल. मुख्यमंत्र्यांनी आपले नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना तिकिट दिले तर त्याचा पराभव नक्कीच आहे. मी स्वत: गुहागर मतदारसंघात त्यांच्या प्रचारासाठी पायही ठेवणार नाही, असे सांगत रामदासभाईंनी निवडणुकीआधीच आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाची एकप्रकारे घोषणा केलीय.
मुख्यमंत्री शिंदे यात काय तोडगा काढणार?
भाईंचा विरोध असला तरी श्रीकांत शिंदे मात्र विपूल यांना उमेदवारी देण्यावर ठाम आहेत. या मतदारसंघात सध्या उद्धव सेनेचे भास्कर जाधव हे आमदार अाहेत. भास्कर जाधव यांचा या मतदारसंघावर चांगलाच होल्ड आहे. ते कुठल्याही पक्षात गेले तरी इथून निवडून येतात. अशा दिग्गज नेत्याविरोधात शिंदेसेनेने विपूलसारख्या नवख्या उमेदवाराला उभे करणे म्हणजे पराभव ओढून आणणे आहे, असे रामदासभाईंचे मत आहे. श्रीकांत शिंदे यांनी मात्र विपूल यांच्यामागे आपली संपूर्ण ताकद लावण्याचा निर्धार केला आहे. कोकणात शिंदेसेनेचे प्रमुख नेते असलेले दीपक केसरकर, उदय सामंत, भरतसेठ गोगावले यांच्याकडे श्रीकांत यांनी विपूल यांच्या विजयाची जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे रामदासभाई मात्र सामान्य शिवसैनिकांच्या मनातील भाषा बोलून विपूल यांना विरोध करत आहेत. भाईंचा हा विरोध उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांच्या पथ्यावर पडणार यात शंकाच नाही. बघू या.. एकनाथ शिंदे यात काय तोडगा काढतात ते….