लोकसभेच्या रिंगणातून राणे पिता-पूत्राची माघार, जागा शिंदेसेनेला सुटणार
सिंधुदुर्ग : केंद्रातील मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची रणनिती भाजपने आखली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे सिंधदुर्ग- रत्नागिरी (sindhudurg ratnagiri Loksabha) मतदारसंघातून लढतील, असे आडाखे बांधले जात होते. मात्र नारायण राणे यांनी वयाच्या मुद्द्यावरुन आधीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पूत्र माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी ही माहिती दिली. तसेच आपल्यालाही लोकसभेत रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघात सध्या उद्धव सेनेचे विनायक राऊत (vinayak Raut) हे खासदार आहेत. त्यांना राणेंचे पूत्र नीलेश यांचा पराभव केला होता. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सावंत (Kiran Samant) यांच्यासाठी शिंदे गट आग्रही आहे. तर भाजपने राणेंसारख्या दिग्गज नेत्याला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून कोकणातील एकतरी मतदारसंघ जिंकण्याची तयारी केली होती. तसेच कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचाही या मतदारसंघावर डोळा आहे. त्यात आता राणेंनी स्वत:हून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे, त्यावरुन हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटण्याची संकेत मिळत आहेत. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीही आग्रही आहेत. महायुतीच्या जागावाटपात शिंदेगटाच्या काही जागा भाजप ताब्यात घेऊ शकते, मात्र शिंदेगटाला काही जागा तरी सोडाव्याच लागतील. उदय सामंत यांचे भाजपसह सर्वच पक्षात चांगले संबंध आहेत. ते या मतदारसंघावर चांगली पकड जमवून विजय मिळवू शकतात. त्यामुळे ही जागा शिंदेसेनेला सोडण्यावर भाजपचीही सहमती झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील निवडणूक उद्धव सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत (Vinayak raut) व किरण सामंत (Kiran Samant) यांच्यात होण्याची शक्यता आहे.