सोलापूरचे तिसरे मोहिते पाटीलही भाजपची साथ सोडणार

असं म्हणतात की.. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. महाशक्तीशाली पक्ष राहिलेला भाजप पक्ष सध्या महाराष्ट्रात हाच अनुभव घेत आहे. लोकसभा निवडणुकीत आलेल्या धक्कादायक अपयशानंतर भाजपचे अनेक नेते पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यात एक नाव आहे ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या मोहिते पाटलांचे. १० वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला कंटाळून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपचा झेंडा हाती धरला होता. मात्र सोलापूर- माढ्यातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी आता भाजपची साथ सोडलीय. मोहिते पाटलांचे एक पुतणे धैर्यशील यांनी लोकसभेला शरद पवार गटात प्रवेश करुन माढ्यातून खासदार म्हणून निवडून आले. आता मोहिते पाटलांचे पूत्र व भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही धैर्यशील यांच्या पावलावर पाऊल ठेऊन भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे भक्कम आधारस्तंभ विजयसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर दिसत आहेत. एकूणच, मोहिते पाटलांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी दर्शवली आहे. काय आहे या मागचे राजकारण… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

रणजितसिंह मोहिते पाटीलांचे  राजकीय सीमोहलंघनाचे संकेत…

चार दिवसांपूर्वी सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहिते पाटलांच्या पुढाकारातून हा मेळावा साजरा करण्यात आला. भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या मेळाव्यातून आपल्या राजकीय सीमोहलंघनाचे संकेत दिले. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाचे तोंड भरुन कौतुक करतानाच सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला, कुठलीही राजकीय तडजोड करायला आपण मागे पुढे पाहणार नाही,’ असे जाहीर वक्तव्य करुन त्यांनी भाजपची साथ सोडण्याचे संकेत दिले.

मोहिते पाटील भाजप सोडणार असल्याचे स्पष्ट…

खरे तर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच मोहिते पाटील भाजप सोडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. याचे कारण म्हणजे, माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी हवी होती. पण भाजपने तेव्हाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली, त्यामुळे मोहिते पाटील नाराज झाले. २०१९ मध्येही मोहितेंनी निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता, पण भाजपने आपला निर्णय रेटून नेला. तो मोहितेंनी पाच वर्षे पचवला. यंदा मात्र धैर्यशील यांनी सर्वात आधी बंडाचे निशाण फडकावले. माढा लोकसभा मतदारसंघात साताऱ्याचाही काही भाग येतो. तेथील अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र भाजपने कुणाचेही एेकले नाही. अखेर धैर्यशील यांनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली अन‌् निंबाळकरांचा पराभव केला. आता लोकसभेतील या विजयामुळे मोहिते पाटलांचा विश्वास दुणावला आहे.मोहिते पाटलांचे अकलूज- माळशिरस मतदारसंघावर वर्षानुवर्षे वर्चस्व आहे. मात्र सध्या माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यामुळे मोहितेंच्या घरातून तेथे कुणीच आमदार नाही. मोहिते भाजपमध्ये आल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरुन त्यांनी राम सातपुते या तरुण भाजप कार्यकर्त्याला माळशिरसमधून आमदार केले. मात्र नंतरच्या काळात सातपुतेही मोहितेंना विचारत नव्हते.

अन् मग मोहिते पाटलांनी घेतला भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय…

मोहिते पाटील भाजपवर नाराज असण्याचे अजून एक कारण म्हणजे अडीच वर्षे राज्यात सत्ता येऊनही त्यांनी रणजितसिंह मोहितेंना मंत्रिपद दिलेले नाही. या पक्षाने मोहिते पाटील कुटुंबीयांचा फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर करुन घेतल्याची त्यांची तक्रार आहे.
चोहोबाजूंनी आपली कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोहितेंनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. आता भाजपची आमदारकी सोडून रणजितसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादीची तुतारी वाजवण्याच्या तयारीत आहेत. माळशिरस मतदारसंघ एवढ्या निवडणुकीपुरता तरी राखीवच असेल. त्यामुळे माढा या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याचा मोहिते पाटलांचा प्रयत्न असेल. माढा मतदारसंघाशी शरद पवारांचा मोठा कनेक्ट आहे. शेवटची लोकसभा निवडणूक पवारांनी माढ्यातून लढवून जिंकलीही होती. सध्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच बबनराव शिंदे हे आमदार आहेत. पक्षफुटीनंतर शिंदे यांनी अजितदादा गटासेाबत जाणे पसंत केले. त्यामुळे आता शिंदे यांना पाडणे हेच शरद पवारांचे लक्ष्य आहे. त्यासाठी मोहिते पाटलांशिवाय अन्य कुणी दिग्गज प्रतिस्पर्धी असूही शकत नाही, हे त्यांनी ओळखले आहे. त्यामुळेच रणजितसिंह मोहिते पाटलांना माढ्यातून बबनदादा शिंदेंविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी शरद पवारांनी केल्याचे सांगितले जाते.

यालाच म्हणतात राजकारण..!

पण, गेल्या काही दिवसांत बबनदादा शिंदे यांनाही आपल्या बंडाची उपरती अालेली दिसतेय. आपली आमदारकी वाचवण्यासाठी तेही शरद पवारांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र बंडखोरांना क्षमा नाही, ही शरद पवारांची भूमिका कायम आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होताच रणजितसिंह मोहिते पाटलांना पक्षात घेऊन बबनदादाविरोधात उभे करण्याचा शरद पवारांचा प्लॅन दिसताेय. एकूणच ज्या शरद पवारांना कंटाळून १० वर्षांपूर्वी मोहिते पाटील घराण्याने भाजपचा झेंडा हाती घेतला हेाता त्याच शरद पवारांच्या पक्षाची ‘तुतारी’ वाजवण्याची वेळ त्यांच्यावर आलीय.. यालाच म्हणतात राजकारण..!